पुन्हा राममंदिर! Print

* रामजन्मभूमी न्यासाला मंदिर उभारण्याची परवानगी द्या * विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांची मागणी * विदेशी गुंतवणुकीला विरोध, ईशान्येतील परिस्थितीबद्दल इशारा
प्रतिनिधी , नागपूर
alt

कायदा करून रामजन्मभूमी न्यासाला भव्य राममंदिर बांधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करतानाच मुस्लिमांसाठी जे बांधकाम करायचे ते अयोध्येच्या सांस्कृतिक सीमेबाहेरच करण्यात यावे, अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी येथे केली. घुसखोरीच्या समस्येवर वेळीच उपाययोजना न केल्यास ईशान्य भारताची स्थितीही काश्मीरसारखी होऊ शकते, असा इशारा देतानाच, किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात एफडीआयला परवानगी देण्याच्या धोरणावरही त्यांनी या वेळी टीका केली. देशात सर्वत्र सुरू असलेल्या आरोपकल्लोळाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी आपल्या भाषणात, राष्ट्रीय चारित्र्य व संस्कारांच्या अभावामुळे भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची न संपणारी मालिका सुरू झाली आहे, अशी टिपणीही केली.   
रा. स्व. संघाच्या नागपूर महानगराचा विजयादशमी उत्सव बुधवारी रेशिमबाग मैदानावर झाला. या उत्सवात प्रमुख भाषण करताना सरसंघचालक बोलत होते. आर्ष विज्ञान संस्थेचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती हे प्रमुख पाहुणे म्हणून या वेळी उपस्थित होते.
विजयादशमी उत्सवाच्या गेल्या काही भाषणांमध्ये नसलेल्या राममंदिराच्या मुद्दय़ाचा आपल्या या वेळच्या भाषणात उल्लेख करताना डॉ. भागवत म्हणाले, की अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर परिसराजवळ बरीच मोठी जमीन ताब्यात घेऊन तिथे मुसलमानांकरिता काही तरी मोठे बांधकाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राममंदिर बांधण्याचे प्रकरण न्यायालयात असताना अशा कारवायांमुळे सांप्रदायिक सौहार्दाचे नुकसानच होईल. या ठिकाणी राममंदिर बांधण्याबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर भांडण कायम ठेवायला नको. या मुद्दय़ावर न्यायालयाचा निर्णय स्पष्ट असून, मंदिर बांधण्यासाठी सर्वानी सहकार्य केल्यास हा वाद कायमचा संपून जाईल. मात्र आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मतपेढीवर लक्ष ठेवून हे षड्यंत्र रचण्यात येत आहे. कायदा करून रामजन्मभूमी न्यासाला भव्य राममंदिर बांधण्याची परवानगी द्यावी आणि मुस्लिमांसाठी जे बांधकाम करायचे ते अयोध्येच्या सांस्कृतिक सीमेबाहेरच करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
देशासमोरील अंतर्गत आणि बाह्य़ आव्हानांचा सामना करण्यासाठी पुरेशी उपाययोजना होत नसल्याबद्दल डॉ. भागवत यांनी खंत व्यक्त केली. सैन्याला पुरेशी शस्त्रे मिळत नाहीत, सीमेपर्यंत आवश्यक ती रसद पोहोचवण्यासाठी योग्य रस्ते आणि संदेशवहनाची यंत्रणा नाही. शिवाय अलीकडील काळात सैन्याचे मनोधैर्य कमी करणारे काही प्रसंग घडले आहेत. सुरक्षेशी संबंधित वस्तूंचे देशातील उत्पादन वाढविण्याबाबत धोरण निश्चित नाही. सुरक्षा यंत्रणांनी दिलेले इशारे व सूचना यांची हवी तशी दखल घेतली जात नाही. सीमेच्या संरक्षणाबाबत ढिसाळपणा दाखवला जातो. आपल्या हद्दीत येणाऱ्या बेटांसह देशाच्या सीमांचे प्राधान्याने संरक्षण करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या १० वर्षांत सरकारने राबवलेल्या धोरणामुळे तेथील कट्टरपंथी कारवाया पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसत असल्याचा इशारा मोहन भागवत यांनी दिला. आसाम व बंगालच्या सीमेतून होणारी घुसखोरी, तसेच शस्त्रास्त्र, अंमली पदार्थ, बनावट नोटा यांची तस्करी याबाबत संघ अनेक वर्षांपासून सावधगिरीचा इशारा देत आहे. देशातील न्यायालये, गुप्तचर संस्था व काही राज्यपालांनीही या प्रकरणी धोक्याची जाणीव करून दिली होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष करून सत्तेच्या लांगूलचालनाच्या धोरणामुळे सरकारने चुकीचे निर्णय घेतल्याने आज तेथील परिस्थिती चिघळली आहे. तेथील समस्या दडपल्या जातात, परंतु त्यांच्यावर उपाययोजना होत नाही. तेथे लष्कराची उपस्थिती असल्याने आणि तेथील लोकांचे मनोधैर्य मोठे असल्याने सध्या स्थिती आटोक्यात असली, तरी अल-कायदासारख्या कट्टरवादी शक्ती तेथे शिरकाव करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे भविष्यात ईशान्य भारतातील परिस्थिती काश्मीरसारखीच होऊ शकते, हा धोकाही भागवत यांनी लक्षात आणून दिला.     

भ्रष्टाचाराला विरोध गडकरींबाबत मौन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे पूर्ण गणवेशात या कार्यक्रमात हजर होते. ‘पूर्ती’ प्रकरणात दिग्विजयसिंग यांनी त्यांच्यावर केलेले आरोप आणि कंपनी व्यवहारमंत्री वीरप्पा मोईली यांनी या आरोपांच्या चौकशीची दाखवलेली तयारी यामुळे पुन्हा प्रकाशझोतात आलेल्या गडकरी यांच्याशी बोलण्याचा देशभरातून आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु गडकरी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गडकरी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे संघ विचलित झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्याने या मुद्दय़ावर संघाची प्रतिक्रिया मिळावी अशी प्रसारमाध्यमांची इच्छा होती; परंतु सरसंघचालक मोहन भागवत यांनीही पत्रकारांशी बोलणे टाळले. गडकरी यांच्याबाबत होत असलेले आरोप म्हणजे ‘मीडिया ट्रायल’ असून, त्यांना स्वत:वरील आरोपांबाबत उत्तर देण्याची संधी मिळाली पाहिजे, असे मत संघाचे प्रसारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले.