विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचे पंजाबमध्ये अपघाती निधन Print

alt

जालंधर, २५ ऑक्टोबर २०१२
हास्यकलाकार जसपाल भट्टी यांचे आज (गुरूवार) पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या रस्ता अपघातात निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते. भट्टी हे आपला आगामी चित्रपट 'पॉवर कट'च्या प्रसिद्धीसाठी नाकोदार येथून भटिंडा येथे जात होते, त्यावेळी हा अपघात घडला. अपघातात भट्टी यांचा मुलगा जसराज आणि अभिनेत्री सुरिली गौतम हे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना जालंधऱमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जालंधर जवळील शाहकोट भागात भट्टी यांच्या कारने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला.
जसपाल यांचा मुलगा जसराज गाडी चालवत होता. जालंधर जवळील शाहकोट भागात भट्टी यांच्या कारने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
जसपाल भट्टी यांचा जन्म अमृतसरमध्ये ३ मार्च १९५५ मध्ये झाला होता. दूरचित्रवाणी आणि चित्रपटांमधील हास्य अभिनेते अशी भट्टी यांची विशेष ओळख होती. भट्टी यांच्या 'फ्लॉप शो' आणि 'उल्टा पुल्टा' हे दोन विनोदी कार्यक्रम खूप लोकप्रिय झाले होते.
जसपाल यांनी कुछ ना कहो, तुझे मेरी कसम, जानी दुश्मन, शक्ति : द पावर, हमारा दिल आपके पास है, आ अब लौट चलें, जानम समझा करो यांसह सुमारे २४ चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या. त्यांचा 'पावर कट' हा चित्रपट उद्या (२६ ऑक्टोबर) प्रदर्शित होणार आहे.