पिता-पुत्राच्या भांडणात विद्यार्थी टांगणीवर! Print

जोंधळे पॉलिटेक्निकमधील गोंधळ
रेश्मा शिवडेकर, मुंबई
डोंबिवलीतील जुन्या ‘समर्थ समाज’ या शिक्षणसंस्थेवर आपलाच वरचष्मा राहावा यासाठी शिवाजीराव जोंधळे आणि समीर जोंधळे या पितापुत्रांमध्ये जुंपलेल्या भांडणाचा नाहक मनस्ताप संस्थेच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या १३४ विद्यार्थ्यांना सोसावा लागतो आहे. संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे यांनी संस्थाचलित ‘एस. एच. जोंधळे पॉलिटेक्निक’मध्ये मेकॅनिकल, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन या तीन अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या मान्यतेची फाईलच अडवून ठेवली आहे. त्यामुळे, प्रवेश होऊन दोन महिने झाले तरी या विद्यार्थ्यांच्या सूचीला तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मान्यता मिळालेली नाही. ही मान्यता मिळत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश अधिकृत मानले जाणार नाहीत. त्यामुळे संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक हवालदिल आहेत.
 ‘समर्थ समाज’ या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळावर जोंधळे कुटुंबियांचा भरणा आहे. पण, संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव यांचे संस्थेचे सदस्य असलेल्या समीर जोंधळे या मुलाशी बिलकुल पटत नाही. संस्थेच्या सचिव आणि शिवाजीरावांच्या पत्नी वैशाली जोंधळे या मुलाच्या बाजूने आहेत. जोंधळे कुटुंबियांमधील वादांचे रूपांतर अखेर न्यायालयीन वादात झाले.
संस्थेच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांचे प्रवेश ‘तंत्रशिक्षण संचालनालय’ या सरकारी नियमन संस्थेतर्फे होणाऱ्या ‘केंद्रीय प्रवेश प्रक्रिये’तून केले जावे, असे शिवाजीरावांचे म्हणणे होते. पण, मुलाने याला विरोध करून प्रवेश संस्थास्तरावर करण्यात यावेत, असा आग्रह धरला. न्यायालयात झालेल्या समेटात पॉलिटेक्निकच्या सहापैकी तीन अभ्यासक्रमांचे कॅपमधून तर उर्वरित तीन अभ्यासक्रमांचे प्रवेश संस्थास्तरावर करण्याचे ठरले. त्याप्रमाणे वर उल्लेखलेल्या तीन अभ्यासक्रमांच्या एकूण १८० जागा संस्थास्तरावर भरल्या जाणार होत्या.
तीन अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरावर झालेल्या या प्रवेश प्रक्रियेवर समीर यांचा वरचष्मा राहिला. आपल्याला यात विश्वासात घेतले गेले नाही, म्हणून शिवाजीरावांनी आपल्या पदाचा वापर करून वेळोवेळी अडवणूकही केली.
नियमानुसार प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची सूची साक्षांकित करून प्राचार्य, संस्थेच्या सचिव आणि अध्यक्ष यांच्या एकत्रित स्वाक्षरीने मान्यतेसाठी संचालनालयाकडे पाठवायची होती. त्याप्रमाणे प्राचार्य आणि सचिवांनी सह्य़ा करून ती अध्यक्षांकडे पाठविली. मात्र, दोनवेळा पोस्टाने तर दोनवेळा पॉलिटेक्निकच्या प्राचार्या संत यांनी प्रत्यक्ष भेटून सूची सादर करूनही अध्यक्षांनी त्यावर स्वाक्षरी केलेली नाही. जोंधळे स्वाक्षरी करीत नसल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आले आहे. याबाबत शिवाजीराव जोंधळे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही होऊ शकला नाही.