जावईबापू निर्दोष! Print

वढेरांना हरयाणा सरकारची ‘क्लीन चिट’
पीटीआय, चंडिगढ/नवी दिल्ली

रॉबर्ट वढेरा यांनी डीएलफ कंपनीशी हरयाणात केलेले जमिनीचे सर्व व्यवहार पारदर्शी आहेत, त्यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही अशा प्रकारची ‘क्लीन चिट’ देत हरयाणा सरकारने शुक्रवारी सोनिया गांधींच्या जावईबापूंना ‘निर्दोष’ ठरवले. वढेरांना मिळालेल्या या ‘क्लीन चिट’वर मात्र भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे अध्वर्यू अरविंद केजरीवाल व भाजप यांनी कडाडून टीका केली आहे. रॉबर्ट वढेरा यांनी गुरगाव, फरिदाबाद, पलवाल आणि मेवात या हरयाणातील चार जिल्ह्य़ांत कोटय़वधी रुपयांचे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार केले होते. २००५ पासून झालेल्या या व्यवहारांत काळेबेरे असून जमिनी अत्यंत कमी दरांत वढेरा यांना विकण्यात आल्या, परिणामी सरकारी खजिन्याला कोटय़वधी रुपयांचा तोटा झाला असल्याचा दावा करत अरविंद केजरीवाल यांनी वढेरा व डीएलएफ कंपनीवर आरोपांची तोफ डागली होती. परंतु आता चौकशीत वढेरा यांनी सर्व कायदेकानूंचे पालन करतच जमिनीचे व्यवहार केल्याचे उघड झाले आहे! त्यांनी खरेदी किंवा विक्री केलेल्या जमिनींचे दर बाजारभावानुसारच होते, त्यामुळे या व्यवहारात सरकारला कोणताही आर्थिक तोटा झाला नसल्याचे प्रमाणपत्र चौकशी करणाऱ्या चारही जिल्ह्य़ांच्या उपायुक्तांनी दिले आहेत.
दरम्यान, वढेरांना मिळालेल्या ‘क्लीन चिट’मुळे तीळपापड झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसशासीत हरयाणा सरकारकडून हीच अपेक्षा होती अशी तिरकस प्रतिक्रिया दिली.  भाजपनेही वढेरांना ‘क्लीन चिट’ देण्याचा हरयाणा सरकारचा निर्णय म्हणजे स्वतलाचा प्रशस्तिपत्र देण्यासारखे असल्याची टीका केली.