गडकरींचा गड वांध्यात Print

 

संघातही भूमिकेबाबत दोन गट
विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली - शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांची स्थिती बुडत्याचा पाय अधिक खोलात अशी झाली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड होण्याचे त्यांचे मनसुबे शुक्रवारी वांध्यात आले. आतापर्यंत त्यांची पाठराखण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पत्रक प्रसिद्धीस देऊन त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या वादाबाबत तटस्थ असल्याचे स्पष्ट केले.
भाजपच्या शुक्रवारी रात्री झालेल्या कोअर ग्रुपच्या बैठकीतही गडकरी यांच्यावरून दोन तट पडले असल्याचे समजते. पक्षात चटकन पर्याय उपलब्ध नसल्याने यासंदर्भात आस्ते कदम भूमिका अवलंबण्यात येत असल्याचे समजते.


गेल्या दहा दिवसांपासून सतत भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये गुरफटलेले गडकरी शुक्रवारी रात्री भाजपच्या कोअर ग्रुपच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. गडकरी यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचे शेवटचे सात आठवडे उरले असताना त्यांनी राजीनामा देऊ नये, याविषयी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये दुमत नाही. पण गडकरींची अध्यक्षपदी फेरनिवड होऊ नये, यासाठीही आता भाजपच्या अनेक नेत्यांनी कंबर कसली आहे.
पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेड या कंपनीतील गुंतवणुकीत झालेल्या कथित गैरव्यवहारांचे प्रकरण गाजत असताना या वादाशी संबंध नसल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शुक्रवारी रात्री स्पष्ट करण्यात आले. मात्र गडकरी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत.
काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी गडकरी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे कानाडोळा करीत त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे म्हटले जाते, तर काही पदाधिकाऱ्यांनी औचित्याचा मुद्दा
उपस्थित करून गडकरी यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी संघाच्या वतीने निवेदन प्रसिद्धीला देऊन भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
 गडकरींच्या नावाचा उल्लेख टाळताना या प्रकरणाला राजकीय रंग दिला जात असल्याबद्दल संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सर्वाचीच नि:पक्ष चौकशी करून दोषींना दंडित करण्यात यावे, अशी तटस्थ भूमिका घेतली.
गेल्या काही दिवसांपासून काही राजकीय नेत्यांच्या उद्योगांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप प्रसिद्धीमाध्यमांकडून करण्यात येत आहेत. या आरोपांमुळे सर्वसामान्य जनतेत आश्चर्य
आणि चिंता व्यक्त होत आहे. या आरोपांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या  प्रतिष्ठित संघटनेचे नाव ओढून त्यावर प्रश्नचिन्ह लावण्याचे प्रयत्न व्यथित करणारे आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.