कसाबला पकडणाऱ्या पोलिसावर मालाडमध्ये गुंडांचा हल्ला Print

प्रतिनिधी
मुंबई
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना शिकविन चांगला धडा, अशी घोषणा नव्या पोलिस आयुक्तांनी केली असली, तरी त्याने पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रकार काही थांबलेले नाहीत. ‘२६/११’ च्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाबला पकडणाऱ्या पथकातील पोलीस हवालदार मंगेश नाईक यांच्यावर मालाड येथे तीन गुंडांनी हल्ला केला. विशेष म्हणजे जखमी अवस्थेतही नाईक यांनी दोन आरोपींना घटनास्थळावरून अटक केली. संदेश विलास कदम (२२) आणि फिरोज शेख (२०) अशी या आरोपींची नावे आहेत. जखमी नाईक यांच्यावर मालाडच्या खुराणा रुग्णालयात उपचार करण्यात आले.मालाडच्या स्वामी विवेकानंद मार्ग येथील सबवे वर शनिवारी रात्री काही तरुणांच्या गटात मारामारी झाली. बिनतारी यंत्रणेवर संदेश मिळताच गस्तीवर असणारे पोलीस हवालदार मंगेश नाईक मोटरसायकलीवर आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळावर गेले. त्यावेळी ‘आम्हाला मारहाण करुण तीन जण पळून जात आहेत,’ अशी तक्रार त्या तरुणांच्या गटाने केली. त्या तिघांना पकडण्यासाठी मंगेश नाईक मोटरसायकलीवर त्या दिशेने गेले. तेव्हा त्यापैकी एकाने दगडाने नाईक यांच्यावर हल्ला केला. रक्तबंबाळ अवस्थेत नाईक यांनी दोन आरोपींना पकडून ठेवले तर एक जण फरार झाला. दहशतवादी अजमल कसाबला पकडणाऱ्या पथकात नाईक यांचा समावेश होता.