कसोटी क्रिकेटमध्ये क्रांती! Print

रंगीत चेंडूसह दिवसरात्र कसोटीला आयसीसीची मान्यता
पी.टी.आय., दुबई

वाढते व्यावसायिकीकरण आणि क्रिकेटपटुंची वाढती झळाळी यामुळे क्रिकेटमध्ये झपाटय़ाने बदल होत गेले तरी ‘कसोटी क्रिकेट’शी खेळ करण्याची कल्पना कुणी केली नव्हती. मात्र वनडे आणि आता ट्वेन्टी-२० तून होत असलेले बक्कळ उत्पन्न आणि शिगेला पोहोचलेल्या प्रसिद्धीवलयाने तुलनेत ‘पठडीबद्ध’  आणि ‘संथ’ वाटणाऱ्या कसोटी क्रिकेटलाही हात लावला असून दिवस-रात्र कसोटीसह अनेक बदलांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मान्यता दिली आहे. रंगीत चेंडूसह दिवसरात्र कसोटीला आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) मान्यता दिली आहे.

चेंडूचा प्रकार आणि रंग याबाबतचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य सदस्य बोर्डाना देण्यात आले आहे. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकारासाठी आयसीसीने नवीन प्लेइंग कंडिशन्सची घोषणा केली. न्यूझीलंड-श्रीलंका मालिकेपासून नवीन नियम लागू होणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलिया तसेच इंग्लंडमध्ये दिवसरा़त्र कसोटींचा पर्याय आजमवण्यात आला होता. आयसीसीच्या निर्णयामुळे या पर्यायांना अधिकृत मान्यता मिळाली आहे. ज्या दोन संघांदरम्यान कसोटी खेळली जाणार आहे ते दिवसरात्र कसोटीसाठी सहमती देऊ शकतात. यजमान तसेच पाहुणा संघ खेळासाठीचे सहा तास निश्चित करू शकतात. दोन्ही बोर्ड मिळून चेंडूचा प्रकार आणि रंग याबाबत निर्णय घेतील असे आयसीसीने पत्रकात म्हटले आहे.
दिवसरात्र कसोटीसह आयसीसीने पॉवरप्ले, क्षेत्ररक्षण र्निबध, आखूड टप्प्याच्या चेंडूना परवानगी, अंपायर डिसीजन रिव्ह्यू सिस्टम, नोबॉल, डेड बॉल, ओव्हर रेट यासंबंधीच्या नियमांत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले.