राज्यातील वृक्षांची माहिती आता ‘जीपीएस’द्वारे Print

प्रतिनिधी, पुणे

‘‘शंभर कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत राज्यात लावण्यात आलेल्या प्रत्येक रोपाची निश्चित जागा आता माऊसच्या एका क्लिकवर पाहता येणार आहे. राज्यात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची ‘जीपीएस’ पद्धतीद्वारे नोंद करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘‘राज्यात या पावसाळ्याच्या कालावधीत १८ कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, नंदुरबार, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्य़ांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तर अमरावती, औरंगाबाद या जिल्ह्य़ांची कामगिरी सर्वात कमी आहे. राज्यात नेमकी कुठे झाडे लावण्यात आली, ज्या ठिकाणी झाडे लावण्याची योजना होती, त्यापैकी किती ठिकाणी प्रत्यक्षात वृक्ष लागवड करण्यात आली, अशा विविध मुद्दय़ांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या झाडांची जीपीएसद्वारे नोंदणी करण्यात येणार आहे.  या बाबतचा कार्यपूर्तता आढावा १५ डिसेंबपर्यंत घेण्यात येणार आहे,  अशी माहिती कदम यांनी दिली.  सध्या लागवड केलेल्या रोपांची काळजी घेण्यासाठी स्थानिक सहकारी संस्थांशी सामंजस्य करार करण्यात येणार असून त्यासाठी नरेगामधून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.