सेट टॉप बॉक्स सक्तीला सेना-मनसेचा विरोध Print

मुदत संपतासंपता  आली जाग!
विशेष प्रतिनिधी, मुंबई

गेले काही महिने गाजत असलेल्या सेट टॉप बॉक्सच्या सक्तीची मुदत आता अवघ्या दोन दिवसांवर आली असताना ‘गरिबांच्या कळवळ्या’ने शिवसेना आणि मनसेला जाग आली आहे. ‘वाढत्या महागाईत आणि दिवाळीच्या तोंडावर’ ही सक्तीची मुदत आणखी पुढे ढकलावी, अशी मागणी करीत या दोन्ही पक्षांनी ‘इशारे’ दिले आहेत. मात्र या दोन पक्षांसह अन्य पक्षांच्याही अनेक नेत्यांच्या ताब्यात असलेल्या ‘केबल व्यवहारा’चे पितळ उघडे पडण्याच्या भीतीनेच त्यांना ‘गरिबां’चा कळवळा आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
कोणत्याही प्रकारची सक्ती करून सर्वसामान्यांचे टीव्ही बंद करण्याचे उद्योग खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा सेना-मनसेने दिला आहे. वास्तविक मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चार महानगरांमध्ये सेट टॉप बॉक्स बसविणे ३१ ऑक्टोबरपासून सक्तीचे करण्याचा निर्णय अनेक महिन्यांपूर्वीच झाला आहे. यापूर्वी दोन-तीनदा ही सक्तीची मुदत वाढवून देण्यात आली होती. मात्र ३१ ऑक्टोबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सुमारे तीन महिन्यांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र ही मुदत अगदी दोन दिवसांपर्यंत येईस्तोवर राजकीय पक्ष जागे का झाले नाहीत, असा सवाल आता विचारला जात आहे.
त्यातच सध्या बहुतांश ग्राहकांच्या घरांत असणाऱ्या केबलच्या जाळ्यावर राजकीय नेते, त्यांचे नातेवाईक अथवा निकटवर्तीयांचेच नियंत्रण आहे. केबल ग्राहकांची खोटी संख्या सांगून सरकारचा महसूल बुडविण्यात या केबल ऑपरेटरांचा मोठा वाटा आहे. सेट टॉप बॉक्स लावले गेल्यानंतर प्रत्येक ग्राहकाची अधिकृत नोंद होणार असल्याने या केबलचालकांना आपले सर्व उत्पन्न अधिकृतपणे दाखवावे लागणार आहे. स्वाभाविकच आजवर लपवलेले उत्पन्न त्यांना जाहीर करावे लागणार आहे. यामुळेच राजकीय पक्षांनी ‘इशाऱ्या’चे हत्यार उपसल्याचे बोलले जात आहे.  दिवाळी तोंडावर आली असून आधीच महागाईमुळे सर्वसामान्य माणूस पोळला गेला आहे. अशावेळी सेट टॉप बॉक्स बसविण्यासाठी हजार-बाराशे रुपयांची सक्ती करणे अयोग्य आहे, असे मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले. मुंबईत अजूनही ३५ ते ४० टक्केलोकांनी सेट टॉप बॉक्स बसविलेला नसून त्यांना किमान जानेवारीपर्यंतची मुदत मिळण्याची गरज असल्याचे सेना व मनसेचे म्हणणे आहे.