वादळहाल Print

‘सॅण्डी’मुळे अमेरिका हतबल; ३३ ठार
पीटीआय, न्यूयॉर्क

जगाच्या पाठीवर कुठेही खुट्ट झाले तरी आपल्या नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देणारी जागतिक महासत्ता अमेरिका सोमवारी स्वत:च निसर्गाच्या प्रकोपापुढे अक्षरश: हतबल झाली. बहुचर्चित ‘सॅण्डी’वादळ सोमवारी सायंकाळी अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला येऊन थडकले आणि अवघ्या काही तासांतच या वादळाने निम्म्या अमेरिकेला आपल्या कह्य़ात घेतले. वादळाच्या या तडाख्यात ३३ हून अधिक नागरिकांचा बळी गेला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार खुंटीला टांगत अध्यक्ष बराक ओबामांनी तातडीने ‘राष्ट्रीय आणीबाणी’ जाहीर केली आणि ‘वादळवाटे’त उद्ध्वस्त झालेल्या अमेरिकनांना धीर दिला. आतापर्यंत सुमारे २० अब्ज डॉलरची वित्तहानी या वादळामुळे झाली आहे.  अमेरिकेच्या इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे सॅण्डी वादळ अपेक्षेप्रमाणे सोमवारी सायंकाळी (भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी सकाळी) अमेरिकेच्या पूर्व
किनारपट्टीला थडकले. न्यूयॉर्कसह न्यूजर्सी, कोलंबिया, मेरीलॅण्ड, पेनसिल्व्हानिया, कनेक्टिकट, नॉर्थ कॅरोलिना आणि वेस्ट व्हर्जिनिया ही शहरे व राज्ये या वादळाने आपल्या कह्य़ात घेतली. प्रशासनाच्या खबरदारीनंतरही ३३ हून अधिक जणांचा बळी या वादळाने घेतला. एकटय़ा न्यू यॉर्क शहरात वादळाने १० बळी  घेतले. त्यातील बहुतांशजणांचा मृत्यू अंगावर झाड कोसळल्याने झाल्याची नोंद आहे. लक्षावधी लोकांना आधीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असल्याने फारशी जीवितहानी झाली नाही. मात्र  वीज गेल्यामुळे सुमारे साडेसात कोटी लोक सोमवारी रात्री अंधारात गेले.   १९८८ नंतर पहिल्यांदाच न्यूयॉर्क स्टॉक एक्सेंज सलग दोन दिवस बंद राहिले.
‘ग्राऊंड झीरो’वरही पाणी
अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील ‘ग्राऊंड झीरो’ हे ठिकाणही पाण्याखाली गेले. न्यूयॉर्कमधील एका रुग्णालयातील पर्यायी वीजव्यवस्था ठप्प झाल्याने येथील २०० रुग्णांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.  
वेगाचे थैमान..
सॅण्डीचा वेग ताशी १३५ किलोमीटर असून या वादळाला तापमानातील बदलांमधून अधिकाधिक ऊर्जा मिळत असल्याने ते प्रचंड वेगाने पसरत चालले आहे. समुद्राच्या दिशेने त्याला बळ मिळत नसले तरी वादळाच्या घुसळणीमुळे समुद्रात १३ ते १४ फूट उंचीच्या लाटा निर्माण होत आहेत. त्यांचा तडाखा किनारपट्टीच्या भागाला बसत आहे.
तामिळनाडूवर नीलमभय
चेन्नई : चेन्नईच्या आग्नेयेला ५०० कि.मी अंतरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे आता चक्रीवादळात रूपांतर
झाले आहे. ते लवकरच तामिळनाडूतील नागपट्टीनम व आंध्र प्रदेशातील नेल्लोर यांच्या दरम्यानचा किनारा बुधवारी ओलांडण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या नामकरण पद्धतीनुसार पाकिस्तानने त्याला नीलम असे नाव देण्यात आले आहे. ते आता वायव्येकडे सरकत आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडूला व पुडुचेरीच्या किनारी प्रदेशात येत्या बारा तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे एरिया सायक्लोन वॉर्निग सेंटरने म्हटले आहे. येत्या ३६ तासांत या भागात २५ से.मी किंवा त्यापेक्षाही अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ४५-५५ कि.मी/तास राहील तो ६५ कि.मी/तास होऊ शकेल. उत्तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू व पुडुचेरीत वेगाने वारे वाहतील. चक्रीवादळ किनाऱ्याजवळ येऊ लागताच वाऱ्यांचा वेग आणखी वाढत जाईल.    
जन-वित्तव्यवहार ठप्प
सॅण्डी वादळाने अमेरिकेचे संपूर्ण जीवन आणि वित्तव्यवहार ठप्प केले आहेत. १८८८ पासून अविरत सुरू असलेल्या न्यूयॉर्क शेअर बाजाराला या वादळामुळे सलग दोन दिवस कामकाज बंद ठेवावे लागले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. न्यूयॉर्क शहरात वादळापाठोपाठ पावसानेही धुमाकूळ घातल्याने भुयारी रेल्वेमार्ग, पादचारी मार्ग पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी तर पाण्यामुळे वाहने वाहून गेल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. वादळाने वीजपुरवठा खंडित झाला असून कॅरोलिना ते ओहियो या  पट्टय़ातील शहरांमधील किमान  ६० लाख घरांतील लोक अंधारात आहेत. अमेरिकेच्या वीजवितरणाच्या इतिहासातले हे सर्वात मोठे वीजसंकटही आहे.
प्रचारधुरा क्लिंटन यांच्याकडे देऊन ओबामा धावले मदतीला
सॅण्डी वादळाच्या तडाख्यानंतर अध्यक्ष बराक ओबामा हे प्रचारदौरा अर्धवट सोडून सॅण्डी वादळाला तोंड देण्यासाठी नियोजन करण्यास पुढे सरसावले आहेत,  प्रचाराची धुरा त्यांनी माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याकडे दिली आहे. बिल क्लिंटन याचा करिष्माही सर्वज्ञात असून ते आता ओबामा यांच्या वतीने शेवटच्या टप्प्यात प्रचाराचे नेतृत्व करतील. प्रचाराच्या दृष्टीने शेवटचा आठवडा महत्त्वाचा असताना सॅण्डीच्या झंझावाताने तो आठवडा झाकोळला आहे.ओबामा यांनी सांगितले, की पुढील आठवडय़ात निवडणूक होईलच, पण वादळात सापडलेल्या लोकांचे प्राण वाचवणे, मदतकार्य करणे  आपले पहिले कर्तव्य आहे.

वीजप्रकल्प बंद
मॅनहॅटनला वादळाचा जास्तच तडाखा बसला. बांधकाम अवस्थेत असलेल्या एका उंच इमारतीवरील एक क्रेन कोसळली. मात्र, त्यात कोणालाही इजा झाली नाही. येथीलच एका विद्युत उपकेंद्रात स्फोटाचे आवाज झाल्याने शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. या पाश्र्वभूमीवर अमेरिकेच्या आण्विक नियामक आयोगाने न्यू जर्सीतील अणू ऊर्जा केंद्राला धोक्याचा इशारा दिला आहे. सध्या कोणताही आण्विक प्रकल्प बंद करण्यात आला नसला तरी चढय़ा उंचीच्या लाटा, वाऱ्याची बदलती दिशा आणि वादळाचा तडाखा यामुळे अनेक प्रकल्प ठप्प झाले आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून त्याच्या बरोबरीनेच अनेक ठिकाणी लहान-मोठय़ा इमारती तसेच विजेचे खांबही कोसळले आहेत. सोमवारी रात्री अमेरिकेतील अनेक शहरांमधील सुमारे साडेसात कोटी नागरिक अंधारामध्ये होते.