जरा इकडे लक्ष द्या : सेट टॉप बॉक्स नसेल तर उद्यापासून टीव्ही पाहता येणार नाही. Print

प्रतिनिधी, मुंबई

केबल टीव्ही पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स बसवण्याची मुंबईतील मुदत बुधवारी संपली. त्यामुळे गुरुवारपासून हे बॉक्स न बसवलेल्या केबलधारकांच्या टीव्हीवर अंधार पसरणार आहे, त्यांना कोणत्याही वाहिन्या दिसणार नाहीत. त्यावर तोडगा म्हणून आयत्यावेळी धावपळ करणाऱ्या ग्राहकांसाठी केबलचालकांनी आपल्या कार्यालयांमध्ये बॉक्स सज्ज ठेवले आहेत. तर डिजिटायझेशनच्या या सक्तीविरोधात शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सायंकाळी केबलचालकांचा मेळावा बोलावला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाने डिजिटायझेशनच्या धोरणानुसार मुंबईसह देशाच्या चार महानगरांत केबल टीव्ही पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स बसवणे सक्तीचे केले व त्यासाठी ३१ ऑक्टोबरची मुदत दिली होती. ती मुदत आज संपली. मुंबईत मुदतवाढीबाबतची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे गुरुवार एक नोव्हेंबरपासून केबल टीव्ही प्रक्षेपणासाठीचे अॅनालॉग सिग्नल नियंत्रण कक्षातूनच बंद केले जाणार आहेत. केवळ डिजिटल सिग्नल प्रक्षेपित होतील. त्यामुळे सेट टॉप बॉक्स नसलेल्या टीव्हीवर कोणतीही वाहिनी दिसू शकणार नाही.