नूरिया हवेलीवालाला पाच वर्षांचा कारावास Print

प्रतिनिधी, मुंबई
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एका पोलिसासह दोघांच्या मृत्यूस आणि चौघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरणारी नूरिया हवेलीवाला (३०) हिला सत्र न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवत पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला. मात्र अपघाताच्या वेळेस तिने अंमलीपदार्थाचे सेवन केले होते हे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आल्याने न्यायालयाने त्या आरोपात तिला निर्दोष ठरविले.
दरम्यान, शिक्षेनंतर जामिनावर असलेल्या नूरियाचा जामीन रद्द करीत न्यायालयाने तिला अटक करण्याचे आदेश दिले. २०१० मध्ये मद्याच्या धुंदीत नूरियाने बेदरकार व निष्काळजीपणे आपली ‘एसयुव्ही’ गाडी चालवून पोलिसासह सहाजणांना धडक दिली होती. यात पोलिसासह दोघांचा मृत्यू झाला होता.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आय. एम. बोहरी यांनी नूरियाला भारतीय दंडविधान, मोटर वाहन कायदा आणि सार्वजनिक मालमत्ता कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत बेदरकार व निष्काळजीपणे गाडी चालवून दोघांच्या मृत्यूसह चौघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा आरोपांमध्ये दोषी ठरवले. त्याचप्रमाणे दंडाच्या एकूण रक्कमेपैकी प्रत्येकी एक लाख रक्कम उपनिरीक्षक दीनानाथ शिंदे आणि मोटारसायकलस्वार अफझल इब्राहिम या दोघा मृतांच्या कुटुंबियांना देण्याचे तर जबर जखमी झालेल्या शैलेश जाधवला ५० हजार आणि अन्य तीन जखमींना प्रत्येकी १५ हजार रुपये देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. ज्या उपनिरीक्षकाचा या अपघातात मृत्यू झाला तो त्या वेळेस अन्य सहकाऱ्यांसोबत आपले कर्तव्य बजावत होता. याउलट खटल्यादरम्यान नूरियाचे वर्तन, तिचे तरूण वय, ८० वर्षांच्या आईच्या देखभालीची तिच्यावर असलेली जबाबदारी अशा दोन्ही बाजू विचारात घेऊनच आपण निर्णय दिला आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.