ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना १२ हजार रुपयांची दिवाळीभेट Print

प्रतिनिधी, ठाणे

ठाणे महापालिका तसेच परिवहन उपक्रमाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ११ हजार ७५० रुपये तर कंत्राटी कामगारांना पाच हजार पाचशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेवर सुमारे साडेतेरा कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. तसेच सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वीच देण्यात येणार असल्याने महापालिका अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महापालिकेतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय गटनेत्यांची गुरुवारी बैठक झाली. त्या वेळी आयुक्त राजीवही उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सानुग्रह अनुदानाबाबतच्या निर्णयाची माहिती दिली. ठाणे महापालिकेत अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे नऊ हजार ७२० इतकी असून परिवहन उपक्रमातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे दोन हजार ३७५ इतकी आहे.