पोलिसांवरील हल्लासत्र सुरूच Print

*  कुल्र्यात गुंडाकडून चाकूने वार
* गोवंडीत पोलिसांच्या गाडीवर दगडफेक
प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना सुरूच असून शुक्रवारी कुल्र्यात एका गावगुंडाने पोलिस शिपायावर चाकू हल्ला केला, तर दुसऱ्या घटनेत गोवंडी येथे दोन गटांमधील हाणामारी थांबवण्यास गेलेल्या पोलिसांच्या गाडीवर जमावाने दगडफेक केली.   मुंबईतील पोलिसांचा वचकच कमी होत चालला असल्याचे गंभीर चित्र त्यातून निर्माण झाले आहे.  कुल्र्यातील स्थानिक गुंड प्रदीप वाणी  याला पोलिस ठाण्यात बोलावण्यासाठी गेलेले पोलीस शिपाई संतोष भोई यांच्यावर वाणीने  चाकूने हल्ला केला. यात भोई गंभीर जखमी झाले. वाणी यास पोलिसांनी अटक केली आहे. अन्य एका घटनेत गोवंडी येथे कमला रमन्ना नगरमध्ये दोन गटांत हाणामारी सुरू झाल्याची माहिती  कळताच पोलिसांची गाडी तिकडे पाठवण्यात आली. पोलिसांचे वाहन पाहताच दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. सुदैवाने यात एकही पोलिस जखमी झाला नाही, पण वाहनाचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.