काँग्रेस ‘कर्जा’च्या विळख्यात! Print

* पक्षाची मान्यता रद्द करा : स्वामींची मागणी, भाजपही आक्रमक
* ९० कोटी दिले, पण ‘परमार्था’साठी : काँग्रेसचा बचाव

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून ‘असोसिएटेड जर्नल्स’ला ९० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज द्यायला लावून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी दिल्लीतील बहादूरशाह जफर मार्गावरील १६०० कोटी रुपये किमतीचे ‘हेराल्ड हाऊस’ बळकावल्याचा आरोप करणारे जनता पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी निवडणूक आयोगाकडे काँग्रेस पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे. या मुद्दय़ावरून भाजपनेही काँग्रेसवर तिखट हल्ला चढविला आहे. ‘असोसिएटेड जर्नल्स’ला ९० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचा आरोप मान्य करणाऱ्या काँग्रेसने मात्र, ७०० कुटुंबांना मदत करण्यासाठी हे कर्ज दिल्याचा तसेच त्यातून कोणताही व्यावसायिक लाभ मिळविला नसल्याचा दावा केला.

व्यावसायिक हितसंबंधांचा प्रश्नच नाही : काँग्रेस
‘हेराल्ड हाऊस’चा पाया पंडित जवाहरलाल नेहरूंनी रचला होता. त्यांचे प्रयत्न काँग्रेस पक्ष व्यर्थ जाऊ देणार नाही, असे सांगून काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख जनार्दन द्विवेदी यांनी शनिवारी काँग्रेस तसेच सोनिया व राहुल गांधी यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा आक्रमकपणे प्रतिवाद केला. ‘असोसिएटेड जर्नल्स’वर अवलंबून असलेल्या ७०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारी ओढवून देशोधडीला लागण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेसने ९० कोटी रुपयांचे कर्ज दिले. हे कर्ज बिनव्याजी असल्यामुळे त्यात व्यावसायिक हितसंबंधांचा प्रश्नच कुठे उद्भवतो, असा प्रतिसवाल द्विवेदी यांनी केला. नेहरूंच्या काळात असोसिएटेड जर्नल्सतर्फे नॅशनल हेराल्ड, नवजीवन आणि कौमी आवाज ही इंग्रजी, हिंदूी व उर्दूतील वृत्तपत्रे प्रकाशित होत होती. कालांतराने ही सर्व वृत्तपत्रे बंद पडली.

हा काळे धन पांढरे करण्याचा प्रकार : भाजप
काँग्रेस पक्षाने असोसिएटेड जर्नल्सला कर्ज देऊन आयकर कायद्याचे उल्लंघन केले असून या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी याचिका डॉ. स्वामी यांना शनिवारी निवडणूक आयोगाकडे केली. काँग्रेसने असोसिएटेड जर्नल्सला हे कर्ज हेराल्ड हाऊसचे बाजारमूल्य विचारात घेऊनच दिले असून, हा सरळसरळ काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार आहे आणि त्यात झालेल्या आयकर कायद्यांच्या उल्लंघनाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली आहे. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांची नावे घेऊन काँग्रेसला आपली कृष्णकृत्ये झाकता येणार नाहीत. एक राजकीय पक्ष व्यावसायिक कंपनीला कर्ज देऊ शकत नाही, असे भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन म्हणाल्या.