महिलांसाठी ‘बेस्ट’च! Print

लवकरच विशेष बसची सुविधा
प्रसाद रावकर

मुंबई
महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांना सुरक्षित आणि सुकर प्रवास घडविण्यासाठी ‘बेस्ट’ उपक्रम ‘महिला विशेष बस’ सुरू करण्याच्या विचारात असून ही बस रेल्वेच्या महिला विशेष गाडय़ांची वेळ पाहून सोडण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या बसगाडय़ांमधून दररोज ४० ते ४५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या सुमारे ३० ते ४० टक्के आहे. अगदी थेट विरार-डोंबिवली आदी परिसरांतून महिला छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेट, नरिमन पॉइंट आदी भागांतील कार्यालयांत येत असतात. खच्चून भरलेल्या उपनगरी गाडय़ांमधून मुंबईत आल्यावर महिलांना आपले कार्यालय गाठण्यासाठी बेस्ट बसने प्रवास करावा लागतो. गर्दीच्या वेळी पुरुष प्रवाशांनी खच्चून भरलेल्या बसमध्ये महिलांना प्रवेशही करता येत नाही. महिला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने बेस्टने यापूर्वीच बसगाडय़ांमध्ये त्यांच्यासाठी १२ आसने आरक्षित केली आहेत; परंतु आंबटशौकिनांमुळे बसगाडय़ांमधून प्रवास करताना महिलांची कुचंबणा होते. त्यामुळे महिलांना सुरक्षित आणि सुकर प्रवास घडावा यासाठी बेस्ट उपक्रमातील उच्चपदस्थांचा ‘महिला विशेष बस’ सुरू करण्याचा विचार आहे.
काही वर्षांपूर्वी बेस्टने महिला विशेष बस सुरू केली होती; परंतु महिला प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने ती बंद करावी लागली होती. त्या वेळी पुरेसा अभ्यास न करताच ही बस सुरू करण्यात आली होती, त्यामुळेच ती योजना बंद पडली. आता ‘महिला विशेष बस’ नेमकी कोणत्या वेळी सोडल्यास त्याचा महिलांना फायदा होईल याचा अभ्यास बेस्टमधील काही अधिकारी करीत आहेत. त्यामुळे ही बस सुरू करण्यासाठी थोडा अवधी लागेल. मात्र ती सुरू झाल्यानंतर महिला प्रवाशांचा प्रवास सुकर होईल, असा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला.