काँग्रेसने कंबर कसली! Print

* एफडीआय समर्थनार्थ महारॅलीतून शक्तिप्रदर्शन
* ‘रामलीला’वरून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
महागाई, भ्रष्टाचार यांमुळे आक्रमक झालेले विरोधी पक्ष आणि आर्थिक सुधारणांच्या मुद्दय़ावर घटक पक्षांतूनही उमटत असलेला नाराजीचा सूर या दोन्ही गोष्टींमुळे राजकीय अस्थिरतेकडे वाटचाल करीत असलेल्या सत्ताधारी काँग्रेसने रविवारी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर विराट रॅलीद्वारे २०१४च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

किराणा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत केंद्र सरकारने अलीकडच्या काळात घेतलेल्या आर्थिक सुधारणांचे ठाम समर्थन करतानाच, भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर टीका करणारी भाजपच भ्रष्टाचारात रुतलेली असल्याचा प्रतिहल्ला काँग्रेसने केला. त्याच वेळी आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना ‘प्रोजेक्ट’ करण्याची मुहूर्तमेढही काँग्रेसने रामलीलावर रोवली.

विरोधकांचे दावे खोटे ठरतील
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीवरून विरोधी पक्षांनी चालविलेल्या अपप्रचाराचा समाचार घेतला. मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मितीसाठी आर्थिक सुधारणा अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हाला कटू निर्णय घ्यावे लागत असल्याचे सांगून ते म्हणाले की, आज आमच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांचे दावे खोटे ठरतील. एफडीआयमुळे अन्य देशांना फायदा झाला असून भारतातील शेतकऱ्यांनाही फायदाच होईल, असे ते म्हणाले. सारे जग विस्मयाने बघेल असा भारत आम्हाला घडवायचा असून नव्या भारताच्या निर्मितीसाठी धोरणांमध्ये बदल करावे लागतील, असे ते म्हणाले. पेट्रोलियम पदार्थाच्या दरवाढीचा कटू निर्णय देशहिताखातर घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.     

राजकीय प्रणाली हीच मोठी समस्या
देशाची सर्वात मोठी समस्या राजकीय प्रणाली असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. सामान्य आणि कमकुवत घटकांसाठी राजकीय प्रणालीची दारे बंद झाली आहेत. सर्वसामान्यांचा सहभाग नसलेल्या या प्रणालीमुळेच देशाचा विकास होऊ शकला नाही याची जाणीव गेल्या आठ वर्षांच्या राजकीय सक्रियतेतून आपल्याला झाली, असे राहुल गांधी म्हणाले. जगात भारतासाठी सकारात्मक वातावरण तयार होत असताना सरकारच्या प्रत्येक धोरणाचा विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. केवळ विरोध केल्याने होत नाही तर मार्गही दाखवावा लागतो, असे ते म्हणाले. मागच्या वर्षी विरोधकांनी लोकपाल विधेयक पारित होऊ दिले नाही, पण आम्ही ते पुन्हा मांडू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.     

भाजपच भ्रष्टाचाराच्या दलदलीत
देशापुढे असलेल्या हरतऱ्हेच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जाऊन यश मिळविण्याचा आणि सार्थक तोडगा काढण्याचा काँग्रेसचा दृढसंकल्प जाहीर करण्यासाठी आजच्या जाहीरसभेचे आयोजन करण्यात आल्याचे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्ष नेहमीच गरीब, आम आदमी, कमकुवत घटक, शेतकरी आणि कामगारांचा पक्ष राहिला आहे. धर्मनिरपेक्ष मूल्यांसह सर्वाना एकसूत्रात गुंफणाऱ्या काँग्रेसची त्याग, सेवा आणि राष्ट्रीय विकासाच्या बाबतीतील कामगिरी अतुलनीय ठरल्याचा दावा त्यांनी रामलीलावर झालेल्या रॅलीत केला. त्याच वेळी विरोधी पक्षांवर विशेषत: भाजपवर त्यांनी कडाडून हल्ला चढविला. लोकशाहीचा पाया कमजोर करण्यासाठी भाजप संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणीत असल्याचा, महत्त्वपूर्ण राष्ट्रीय मुद्दय़ांवर चर्चा होऊ देत नसल्याचा तसेच जनतेच्या कल्याणाचे कायदे पारित करू देत नसल्याचा त्यांनी भाजपवर आरोप केला.