भारताकडून स्वागत.. पाकिस्तानकडून आढेवेढे Print

पीटीआय, नवी दिल्ली
अमेरिकेसह अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या ओबामा-रोम्नी लढतीचा रोमांच भारतानेही अनुभवला. ओबामांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा भारताने व्यक्त केली. तर उद्योगविश्वानेही ओबामांवर शुभेच्छांचा वर्षांव केला. ओबामांच्या विजयाचा परिणाम शेअर बाजार आणि रुपयाच्या तेजीमध्येही दिसून आला.
पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रपती प्रणब मुखर्जी व परराष्ट्र मंत्रालयाने ओबामांना अभिनंदनपर संदेश पाठवला. ‘अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश जगातील सर्वात मोठे लोकशाही देश आहेत. हे दोन्ही देश सहकार्याचे धोरण अवलंबून भविष्यात मार्गक्रमणा करतील, ओबामांच्या फेरनिवडीमुळे त्यात अधिक दृढता येईल’ असे त्यांनी म्हटले.
पाकिस्तानने मात्र थोडे आढेवेढे घेतच ओबामांचे अभिनंदन केले. ओबामांचा विजय निश्चित झाल्यानंतर तातडीने या देशाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यानंतर अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी थोडय़ा उशिराने का होईना ओबामांचे अभिनंदन केले. दहशतवादविरोधी लढाईसंदर्भात अमेरिका आणि पाकिस्तान यांचा दृष्टिकोन समान असून यापुढेही तो कायम असेल असे झरदारी यांनी ओबामांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे.
ओबामांच्या फेरनिवडीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीचे संबंध अधिकाधिक दृढ होतील. त्यांचे अभिनंदन.
मनमोहन सिंग,  पंतप्रधान