नवी मुंबईत रेल्वे अपघातात ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू Print

लोकलच्या छतावर चढण्याचा प्रयत्न भोवला?
खास प्रतिनिधी, नवी मुंबई

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावरून पनवेलकडे जाणाऱ्या लोकल रेल्वेच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन महाविद्यालयीन तरुणांचा गुरुवारी दुपारी जुईनगर-नेरुळदरम्यानच्या प्रवासात पडून मृत्यू झाला. या तरुणांच्या मृत्यूबद्दल रेल्वे पोलिसांना साशंकता असून या तरुणांचा लोकल ट्रेनच्या छतावर चढताना पडून मृत्यू झाला की रेल्वे ट्रक ओलांडताना याचा तपास रात्री उशिरापर्यंत सुरूहोता. राकेश पोटे व राहुल घोडके अशी या तरुणांची नावे असून तिसऱ्या तरुणाची ओळख पटलेली नाही
सीएसटी स्थानकावरून पनवेलकडे जाणारी लोकल ट्रेन दुपारी दोन वाजून १० मिनिटांनी जुईनगर-नेरुळ मार्गावर धावत असताना हा अपघात झाला. हे तिघे तरुण नेरुळमधील एका महाविद्यालयात बारावीला होते. त्यामुळे या मार्गावरील रुळ ओलांडताना भरघाव आलेल्या रेल्वेचा एकाच वेळी धक्का लागून या तरुणांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे, तर तरुणांना झालेल्या जखमांमुळे ते ट्रेनमधून पडून मृत्यू झाला असावा, असाही अंदाज आहे. रात्री उशिरापर्यंत या मुलांच्या नातेवाईकांचा शोध सुरू होता.