केजरीवाल यांचे ‘स्विसलीक्स’ Print

अंबानी बंधूंसह अनेक उद्योगपतींचा काळा पैसा स्विस बँकेत असल्याचा आरोप
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली- शनिवार, १० नोव्हेंबर २०१२

रिलायन्स उद्योगसमूहाचे मुकेश आणि अनिल अंबानी तसेच जेट एअरवेजचे नरेश गोयल, राहुल गांधी यांच्या निकटस्थ मानल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या खासदार अनू टंडन, डाबर समूहाचे बर्मन बंधू यांच्यासह ७०० भारतीयांचे स्विस बँकांमध्ये हजारो कोटी रुपये जमा असल्याचा नवा गौप्यस्फोट इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला.मात्र, रिलायन्स समूहासह सर्वानीच त्यांचे आरोप फेटाळून लावले.

स्विस बँकांसह विदेशी बँकांमध्ये भारताचे २५ लाख कोटी रुपये जमा असल्याचे सीबीआयच्या विद्यमान संचालकांनी म्हटले आहे. अमेरिकेप्रमाणे भारत सरकारने तत्परता दाखविली तर हा काळा पैसा भारतात येऊ शकतो, असे सांगतानाच केंद्र सरकारकडे स्विस बँकेत खाते असलेल्या ७०० जणांची यादी उपलब्ध असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला.  
जुलै २०११ मध्ये मनमोहन सिंग सरकारला मिळालेल्या यादीत जिनेव्हाच्या एचएसबीसी बँकेत २००६पर्यंतची खाती व रकमेचा तपशील असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्याच एका नेत्याने आपल्याला ही माहिती सीडीद्वारे पुरवली, असेही ते म्हणाले. अंबानींसह काही नामवंत उद्योगपती, राजकारण्यांच्या एचएसबीसी बँकेतील खात्यांच्या रकमेचे आकडेही त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.     
काला रे, धन काला रे..?
मुकेश अंबानी - १०० कोटी रुपये, अनिल अंबानी - १०० कोटी रुपये, मोटेक सॉफ्टवेअर प्रा. लि. (रिलायन्स समूह) - २१०० कोटी रु., रिलायन्स इंडस्ट्रीज लि.- ५०० कोटी रु., संदीप टंडन - १२५ कोटी रुपये , अनू टंडन- १२५ कोटी रुपये., नरेश गोयल- ८० कोटी रुपये., बर्मन्स (तीन कौटुंबिक सदस्य) २५ कोटी
यशोवर्धन बिर्ला - रक्कम नाही.

प्रणव मुखर्जीवर आरोप
जुलै २०११ मध्ये फ्रान्स सरकारकडून भारताला ही यादी मिळताच आयकर विभागाने संबंधितांवर धाडी घालणे सुरू केले. मात्र, अंबानी बंधूंसह स्विस बँकेत मोठय़ा रकमा असलेल्या बडय़ांची घरे शाबूत राहिली. मुकेश अंबानी यांनी तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांची भेट घेऊन संभाव्य धाडी रोखण्याची विनंती केल्याचे म्हटले जाते, असाही दावा केजरीवाल यांनी केला. स्विस बँकेत मोठय़ा प्रमाणावर पैसा जमा करणाऱ्यांच्या मदतीसाठी मुखर्जी यांचा स्वैच्छिक संपत्ती घोषणा योजना (व्हीडीआयएस) आणण्याचाही विचार होता, असेही ते म्हणाले.

म्हाडाच्या कृपेने कंत्राटदार गब्बर!
मुंबई : गेली अनेक वर्षे रखडलेल्या धारावी प्रकल्पातील सेक्टर पाच येथे उभारण्यात येत असलेल्या १४ मजल्यांच्या इमारतीच्या बांधकाम चांगल्या दर्जाचे व्हावे म्हणून म्हाडाने कंत्राटदाराकडून हा प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ३०० चौ. फुटांच्या ३४४ घरांच्या बांधकामासाठी म्हाडाने बी.  जी. शिर्के या कंत्राटदार कंपनीला ठरलेल्या रकमेपेक्षा ३०० टक्के जादा रक्कम अदा केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रति चौरस फूट ८२४ रुपयाऐवजी शिर्के कंपनीला २४१५ रुपये दर मोजण्यात आला आहे. म्हाडातीलच अनेक निवृत्त अधिकारी या कंपनीच्या सेवेत असल्याची ही करामत असल्याचे बोलले जाते.