टेस्टी टेस्टी : पान नैवेद्याचे Print

शेफ देवव्रत जातेगावकर

घरी गणपती असल्यावर रोज काय नैवेद्य करायचा हा एक गहन प्रश्न गृहिणींना सतावतो. खास म्हणूनच आज मी नैवेद्याच्या पानात कुठले पदार्थ असावेत याच्या रेसिपीज तुम्हाला सांगतोय. त्यामुळे नैवेद्याची तयारी करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही.


दुधी भोपळ्याची भाजी
साहित्य : दुधी भोपळा- १ (पाव किलो वजनाचा), गोडतेल- २ चमचे, मोहरी, कढीपत्ता, हळद, हिरवी मिरची, मीठ चवीनुसार,
धणेपावडर, कोथिंबीर, दाण्याचे कूट, हिंग.
कृती : प्रथम तेल गरम करून त्यामध्ये राई, जिरे, कढीपत्त्याची फोडणी द्या. फोडणीमध्ये चिमूटभर हळद, हिरवी मिरची, धणेपावडर घालून त्यामध्ये दुधी भोपळ्याचे तुकडे परतून घ्यावेत. दाण्याचा कूट टाका. चवीनुसार मीठ घालावे. भाजी वाफेवर शिजवून नंतर त्यावर कोथिंबीर टाका.
अॅपल मोदक
साहित्य : सफरचंद- १, बदाम, काजू, मनुका, जायफळ, साखर, तांदळाचे पीठ, साजूक तूप- २ चमचे.
कृती : सफरचंदाचे बारीक तुकडे करून घ्या. आता साजूक तूप गरम करून त्यामध्ये सफरचंदाचे तुकडे, काजू, बदाम तुकडे साखर घालून थोडे परतून घ्या. शेवटी जायफळ पूड टाकून घ्या. सारण घट्टसर झालं की काढून थंड करून घ्या. एक वाटी पाणी उकळून घ्या. त्याच्यात दोन चमचे तूप टाका. तांदळाचे पीठ टाका. गॅसवरच थोडे ढवळून घ्या. (उकड काढून घ्या.) मग ही उकड काढून घेऊन थोडी मळून घ्या. आता पिठाचे छोटे गोळे करून प्रत्येक गोळ्यामध्ये साधारण दोन चमचे सारण भरून त्याचे मोदक करून घ्या. वाफेवर १० मिनिटे शिजवून गरमागरम तुपाबरोबर सव्र्ह करा.

चण्याची वाटलेली डाळ
साहित्य : चणाडाळ- १ वाटी, गोडतेल, राई, हिंग, खवलेला ओला नारळ, कोथिंबीर, साखर व मीठ चवीनुसार, हळद , हिरवी मिरची, लाल तिखट
कृती : प्रथम भिजवलेल्या चणाडाळीला मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घ्या. तेल गरम करून त्यामध्ये िहग-मोहरीची फोडणी करावी. मग हळद, हिरवी व लाल मिरची टाकावी. आता ही फोडणी वाटलेल्या डाळीला द्यावी. कोिथबीर, ओले खोबरे, मीठ घाला. एक चिमूट साखर घाला.
टिप्स : आवडत असल्यास किसलेली कैरी पण टाकू शकता.
२) फोडणी न देतापण वाटली डाळ करतात.

पंचामृत
साहित्य : साजूक तूप-  २ चमचे, जिरे, मेथीदाणे, कढीपत्ता, शेंगदाणे, तीळ, सुके खोबरे,  गूळ, चिंच, िहग, हळद, लाल तिखट
कृती : प्रथम तीळ, खोबरे आणि शेंगदाणे भाजून त्यांचा कूट करून घ्यावा. नंतर एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करून त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, मेथीदाणे, हळद, लाल तिखट यांची फोडणी द्यावी. चिंच आणि गूळ थोडय़ा पाण्यात एकत्र करून घ्यावे. तो या मिश्रणामध्ये टाकून चांगली उकळी येईपर्यंत ठेवावे. त्यामध्ये तयार केलेला कूट घालावा. आवडत असल्यास भिजवलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे तुकडे घाला. दहा मिनिटे उकळू द्यावे. चवीनुसार मीठ टाकून चांगले परतून घ्यावे.

बटाटा भाजी
सामग्री : उकडलेले बटाटे- २, तेल, मोहरी, कढीपत्ता, मिरची पावडर, मीठ- चवीनुसार, हळद, धणेपावडर, जिरेपावडर, कोथिंबीर, उडदाची डाळ.
कृती : एक टी स्पून तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता याची फोडणी द्यावी, फोडणी झाल्यावर उडदाची डाळ टाकावी. ती लालसर परतून त्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर लाल तिखट, जिरे पावडर, धणेपावडर टाकावे. हे मिश्रण परतवून त्यामध्ये एक वाटी पाणी घालावे. उकळलेल्या पाण्यामध्ये उकडलेल्या बटाटय़ाच्या फोडी करून घालाव्यात. नंतर चवीनुसार मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालावी.

नारळाची चटणी!
साहित्य : हिरवी मिरची, नारळाची- १ वाटी, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे, चवीनुसार मीठ.
कृती : प्रथम नारळाचे तुकडे, हिरवी मिरची, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे, थोडे पाणी हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून ते व्यवस्थित बारीक करून घ्या.

मूगडाळ मेथी भजी!
साहित्य : मूगडाळ-  १ वाटी, तेल- २ चमचे, मेथी, जिरे, हळद, लाल तिखट, मीठ, गोडतेल.
कृती : प्रथम मूगडाळ १५ ते २० मिनिटे भिजवून घ्यावी. मेथी बारीक चिरून धुवून घ्यावी. मग मेथीला थोडे मीठ लावून ठेवून द्या. थोडय़ा वेळाने पिळून घ्या, म्हणजे मेथीचा कडवटपणा थोडा कमी होईल. नंतर मूगडाळ बारीक करून घ्यावी. त्यामध्ये मेथी, हळद, लाल तिखट, जिरे, चवीनुसार मीठ घालावे. त्या मिश्रणाचे गोळे बनवून ते तापवलेल्या तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यावे.

अळू-आंबटचुक्याची भाजी
साहित्य : अळूची पाने- ३, आंबट चुका- १ गड्डी, शेंगदाणे, चणाडाळ, सुकं खोबरं, चिंच, गूळ, तेल, कढीपत्ता, मोहरी, मीठ, हळद, लाल तिखट, धणेपावडर.
कृती : प्रथम चणाडाळ, खोबऱ्याचे तुकडे, शेंगदाणे दहा ते पंधरा मिनिटे पाण्यामध्ये भिजवून घ्या. एका कढईत चिरलेली अळूची पाने व आंबट चुका थोडय़ा तेलात परतून घ्यावे व मग पाणी टाकावे. उकळी आली की पाण्यात घोळलेले बेसन टाकावे व १० मिनिटे उकळू द्यावे. भाजीला घट्टपणा येईल. आता भिजवलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे तुकडे व चणाडाळ उकळत्या पातळभाजीत टाका. आवश्यक असेल तर थोडं पाणी टाका व उकळू द्या. आता गूळ व मीठ टाका. आता वरून फोडणी द्या. फोडणीसाठी तेल गरम करून मोहरी टाका. कढीपत्ता, िहग, लाल तिखट, धणेपूड टाका. आवडत असल्यास थोडा गोडा मसाला टाका व भाजीला फोडणी द्या.
टीप : आंबट चुका नसेल तर थोडी चिंच वापरा.

* संपादन सहाय्य : प्रभा कुडके
* डिझाइन : संदेश पाटील