कट्टा Print

डी. के. बोस - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘देवा श्रीगणेशा.. देवा श्री गणेशा’ हे गाणं हलकंच कानावर पडत होतं. चोच्या त्या तालावर डुलत होता. आगमनाच्या दिवशी मिरणुकीत या गाण्यावर कट्टेकरांनी जाम धमाल केली होती, या गाण्याला वन्स मोअर देत, त्यांनी चोच्याला मस्त नाचवला होता. आणि चोच्यालाही त्याचं काही वाटतं नव्हतं. कारण नाचणं त्यालाही आवडायचं (नाही तरी कट्टय़ावर त्याला रोज हे कट्टेकरी नाचवतच असतात, त्याची आता त्याला सवय झाली होती). अगदी एकदम जोशात चोच्या स्वत:ला हृतिक रोशन समजत नाचत होता. आणि सारेच त्याच्या या नाचाचा आनंद घेत होते. बाकीचे कट्टेकरीही या वेळी नाचले होते, पण चोच्याची सर कोणालाच नव्हती.
ए चोच्या, च्यायला, आहेस सिंगल फसली, पण नाचताना एवढा स्टॅमिना आणतोस कुठून, असं सहज सुप्रियाने विचारलं आणि याला संधीच मिळाली. अगं त्याचं काय आहे माहिती आहे का, माझ्या रक्तातच नाच आहे, बोले तो अपून जब पैदा हुआ ना तो पहिला वर्ड अपूनने डान्स बोला था, असं चोच्या बोलतो न बोलतोच, त्यावर अभ्या म्हणालाच, आधी मेल्या अंगात रक्त आहे का तुझ्या, वारा आणि पाणी या दोन गोष्टींवर जगणारा तू. अभ्याला शांत करीत सुश्या म्हणाली, अभ्या ते सोड यार. पण आपण जो गणपती आणलाय ना तो चोच्यामुळेच. गणपतीच्या तीन दिवस आधी सांगितलं या टीचर्सने आपल्याला, की इको फ्रेंडली मूर्ती पाहिजे, मग काय आपण जंग जंग पछाडलं, पण साऱ्या मूर्ती बुक झाल्या होत्या. चोच्याची ओळख निघाली आणि चक्क शाडूच्या मातीचा गणपती आपल्या कॉलेजमध्ये आला, असं बोलून सुश्या थांबते न थांबतेच तोच स्वप्ना म्हणाली, अगं ते तर आहेच, पण डेकोरेशन बघा या चोच्याने किती सॉलीड केलंय, यावर संत्याने आपली पिंक टाकलीच, ये बात माननी पडेगी की, चोच्या के पास दिमाख है, पण च्यायला अभ्यास करताना याच आयडिया कुठे जातात याच्या काय माहीत. चोच्या त्यावर काय बोलणार, एकीकडे स्तुती चालू होती, ती कोणाला ऐकायला आवडतं नाही? आणि चोच्याला तर अशी स्तुती बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळत होती. त्यामुळे मनातल्या मनात तो खूश होता, आता बोलून हे सर्व घालवायचं नाही, हे त्याला चांगलं माहिती होती.
कॉलेजमध्ये गणपतीच्या निमित्ताने मस्त, थोडंसं धार्मिक म्हणा, वातावरण निर्माण झालं होतं, मुलंही त्यामध्ये चांगला एन्जॉय करीत होती. प्रत्येक कामात हिरिरीने सहभाग घेत होती. कालच झालेला अर्चनाचा नाच, हा साऱ्या कॉलेजसाठी चर्चेचा विषय ठरला होता, ती काही बोल्ड गाण्यावर नाचली नव्हती, कथ्थक तिने तब्बल २५ मिनिटे न थांबता केला होता आणि सारेच तिच्यावर खूश होते.
 एरव्ही कोणामध्ये कोणते कलागुण आहेत, हे कळत नाही, पण यानिमित्ताने ते कळतात, बघा ना यार, आपण अर्चनाला काय समजायचो आणि तिने काल कमाल केली यार, असं सुप्रिया म्हणाली. हां यार, ते तर खरंय, गणपतीमध्ये आतापर्यंत तर धमाल आलीय, सगळ्यांना. पहिला दिवस आगमनात गेला, दुसरा दिवस डान्स आणि बाकीच्या स्पर्धामध्ये, आता पुढचे दोन दिवस अजून काही कॉम्पिटिशन्स आहेतच, मस्त फेस्टिव्हलच झाला यार आपल्यासाठी. त्यावर सुश्या म्हणाली, आतापर्यंत सर्व काही मस्त झालंय आणि यापुढेही मस्त होईल, पण विसर्जनाचा काय प्लॅन केलाय. चोच्या म्हणजे या दिवसांतला सगळ्यात हॉट मुलगा होता, आत्तापर्यंत केलेली सगळी दुनियादारी त्याच्या कामी येत होती. अगं, माझा एक पुण्याचा मित्र आहे, त्याच्या सर्व मित्रांनी मिळून खास गणपतीसाठी नवीन बँड तयार केला आहे, म्हणजे आपल्या लोकल भाषेत बोलायचं तर पुणेरी बाजा आपण आणणार आहोत. मस्त पुणेरी ढोल आणि ताशा, धम्माल उडवूया यार.
चोच्या सही यार, तू ना खरंच असा शहाण्यासारखा वागत राहिलास ना, तर किती सुधारशील माहितीए, यावर सर्वानाच काही ना काही तरी बोलायचं होतं, कारण चोच्या कसाही असला तरी तो त्यांचा मित्र होता. पण एवढय़ातच ‘आरतीला सर्वानी पाच मिनिटांत जमायचं आहे’ अशी अनाऊन्समेंट झाली आणि चोच्याला नेता बनवत सर्वच मंडपाच्या दिशेने आरतीसाठी रवाना झाले.