सण आला गौरीचा.. Print

संकलन- प्रियांका
प्राची भावे

गौरी आगमनाचा दिवस माझा  सगळ्यात आवडता, कारण या  दिवशी माहेरवाशीण म्हणून गौरी आणण्याची संधी मिळते. सारे कुटुंबीय गौरीसोबत माझेही लाड  पुरवण्यात दंग असते, आम्ही  खडय़ाची गौर पुजतो. गौरीची आरास  करताना तिला दागदागिन्यांनी सजवताना येणारी मजा काही निराळीच असते.

पूर्वा कोऱ्हाळकर
माहेरी आल्या गौरी..
त्यांचा मांडला सोहळा
पूर येतो सुखाला
उधाण येते घरातल्या आनंदाला
खरोखरच गौरीचे आगमन होताना  माझा व कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो. जो या कवितेच्या  दोन ओळींतूनसुद्धा पुरेपूर मांडता येत  नाहीये. या दरम्यान घरात पंचपक्वान्नापासून लाडू, चकल्या, करंजी,  शंकरपाळे वगैरे चटकदार गोड  खमंग पदार्थाची रेलचेल असते. आमच्याकडे घरीच सगळे पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आईला  पदार्थ बनवताना माझी मदत होतेच; परंतु ते संपवण्यासाठी मात्र अधिक  मदत होते. मी आणि माझी भावंडं  आम्ही सारे मिळून गौरीला नवेद्य  दाखविल्यानंतर पदार्थावर मस्त ताव  मारून गौरीपूजन सेलिब्रेट करीत  असतो.

सीमा गांधी
केव्हा तरी येणारा माणूस जसा  आपल्याला स्वागतार्ह वाटतो, त्याप्रमाणे अधूनमधून येणारे सण  आपल्याला आपलेसे वाटतात. त्यातल्या त्यात भाद्रपदात येणाऱ्या गौरी-गणपती सणाची आतुरतेने वाट पाहत  असते ती प्रत्येक घरातली स्त्री. आमच्याकडे गौरीपूजनानंतर गौर  जागवली जाते. त्यात आम्ही सारे  कुटुंबीय विशेषत: स्त्रिया तरुण मुली  सहभागी होतो. फुगडय़ा, फेर धरणं अंताक्षरी याशिवाय रात्री मंगळागौर  खेळण्याचा बेत आखला जातो.

अमृता प्रधान
आली आली गं गौराई..
तिला िलब लोण करा..
साजिरी गोजिरी दोन दिसाच्या माहेरा..
हा दोन दिवसांचा माहेरवाशिणीचा   सण प्रत्येक स्त्रीला मत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये मिसळू देणारा तसेच स्त्रीला माहेरची ऊब देणारा असतो. सणादरम्यान आमच्या घरी तिन्ही  दिवशी गौरीला दाखवल्या जाणाऱ्या नवेद्याची विशेष काळजी घेऊन तयारी केली जाते. विशेषत: पहिल्या दिवशी दमून आलेल्या गौरीला शेपू, पालक भाजीसोबत भाकरीचा नवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी पंचपक्वान्नाचा बेत असतो, तर तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर प्रामुख्याने गौरीला नवेद्य म्हणून दाखवली जाते. ती खीर मला अतिशय आवडते. मी आणि माझी बहीण दोघीही उत्साहात मनोभावे गौरीची पूजा करतो.