अशी सजवा तुमची गौरी Print

राधिका कुंटे

गणपतीपाठोपाठ आगमन होतं ते गौरींचं. गौरीचे मुखवटे, साडी, दागिन्यांची जमवाजमव करायला जणू शोधमोहीम काढावी लागते. गेल्या काही वर्षांपासून मात्र दादर येथील ‘साडीघर’च्या गौरींचं संपूर्ण पॅकेज देण्याच्या कल्पनेमुळे अनेकांना दिलासा मिळालाय. गणेशोत्सवात गौराईचं आगमन म्हणजे दुग्धशर्करा योग ! गौराईच्या आगमनाच्या तयारीसाठी कालमानानुसार काही बदल घडल्येत. गौरी पूजनाची तयारी करताना गौरींना साडय़ा नेसवण्यासाठी काही तास खर्ची पडतात. दागिन्यांची जमवाजमव करावी लागते. या धावपळीत मदतीचा हात दिलाय ‘साडीघर’नं, गौरींचं पॅकेज देऊन.
बऱ्याचजणांना बदल नकोसे असतात. पिढय़ान् पिढय़ा चालत आलेल्या गोष्टी स्वीकारण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे अनेकदा गौरीच्या पोशाखात बदल होतो, पण मूर्ती आणि दागिने सहसा तेच राहतात. मुखवटे तेच असले तरी बॉडी कापडी किंवा फायबरची करून घेऊन बदल केला जातो. त्यात सुबकता येते नि मूर्ती चांगली दिसते. मराठी माणूस जगभरात जिथं पोहोचला आहे, तिथं या गौरींना मागणी असून जानेवारीपासूनच बुकिंगला सुरुवात होते.
‘साडीघर’च्या गौरींचं वैशिष्टय़ म्हणजे एकाच छताखाली गौरी, तिच्या साडय़ा आणि दागिने मिळतात. कापडी, पीओपी, फायबर, लाकडी प्रकारच्या आणि मोठी, मध्यम, छोटी अशा आकारांतल्या या गौरी आहेत. फोिल्डगच्या असल्यानं त्या बॉक्समध्ये पॅक करता येतात. लाकडी गौर ४५ हजारांची असून तिला बघताच क्षणी पसंती मिळतेय. बुकिंग होतंय आणि खूप मागणीही आहे. अखंड लाकडातली ही मूर्ती घडवायला दोन-तीन महिने लागतात. तिचे बोलके डोळे जर्मन बनावटीचे असून खुर्ची सागाची आहे.  
गौरीच्या साडय़ांमध्ये पारंपरिक आणि डिझाइनर वेअर असे दोन्ही प्रकार आहेत. त्यांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्या निऱ्या जास्त येतात नि त्यांचा पदरही मोठा असतो. कारण प्रत्येकाकडच्या गौरींची पद्धत वेगवेगळी असते. कुठं स्टँण्डवरच्या, कुठं डब्यावरच्या, कुठं गणपतीच्या डोक्यावरून गौरीचा पदर खाली घेतला जातो. या सगळ्या पद्धती लक्षात घेऊन साडय़ा तशा डिझाइन केल्या जातात. त्यांना पठणी बॉर्डर, नॅक्सी बॉर्डर असते. साडी म्हटली की तिचा रंग कोणता, हा प्रश्न येतोच. पूर्वी हिरवा, लाल आणि पिवळ्या रंगांच्या साडय़ांना पसंती दिली जायची. सध्या चिंतामणी, जांभळा, करवंदी, मजंटा रंग इन आहेत. गौरीचा पोशाख केवळ साडय़ांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. आता चनिया-चोलीसारख्या गुजराती पद्धतीच्या पोशाखांची आणि भरतनाटय़मच्या ड्रेसची मागणीही काहीजणांकडून होतेय. त्या मागणीची पूर्तता करता करता एक प्रकारचा नवा ट्रेण्ड रुजू पाहतोय. प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे त्यांच्या गौरीची सजावट करण्यात येते.   
दागिने नि तेही माहेरवाशिणीचे म्हटल्यावर सगळा साज सजायलाच हवा. गौरीचे हे दागिने िबदीपासून ते जोडव्यांपर्यंत अनेक डिझाइन्समध्ये मिळतात. पारंपरिक पद्धतीच्या लक्ष्मीहार, पोहेहार, एकदाणी, बोरमाळेपासून ते भरतनाटय़मच्या ड्रेसला मॅच होणाऱ्या खडय़ाच्या ज्वेलरीपर्यंतचे प्रकार उपलब्ध आहेत. परंपरेला धक्का न लावता त्यात नावीन्य आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा स्वीकार होतो. हे लक्षात घेऊन पुढल्या वर्षी शिवकालीन दागिन्यांच्या पद्धतीचा अभ्यास करून तशा प्रकारे डिझाइन केलेले दागिने घडवण्याचा मानस ‘साडीघर’च्या गौतम राऊत यांनी व्यक्त केलाय.