आमच्या गौरी... Print

शूटींगच्या वेळा सांभाळून आपले कलाकारही गौरीपूजनाची जय्यत तयारी करतात. प्रत्येकाच्या प्रथा वेगळ्या असल्या तरी मनात केवळ एकच भाव असतो तो म्हणजे भक्तीचा. संकलन- दिलीप ठाकूर
दीपाली सय्यद
माझ्या मुलुंडच्या बहिणीकडे गौरीपूजन असते त्यामुळे माझ्यासाठी हा दिवस अगदी खास असतो. एका वर्षी १८ सप्टेंबरला गौरीपूजन असताना मला त्याच दिवशी पुत्रलाभ झाला. दुहेरी सण म्हणून मी गौरी आगमनाचे स्वागत करते. मग तिला साडी नेसवणे, अन्य सजावट करणे व पूजा करणे अशा सगळ्याच गोष्टीत मी प्रचंड रस घेते. या दिवशी तरी शूटिंग-डबिंग वगैरे कोणतेही काम मी करीत नाही. खरं तर गौरीपूजनातून कामासाठी प्रेरणा मिळते. म्हणून मला तिचं सगळंच करायला आवडतं.
हेमांगी कवी
कोकणात गणपती पूजेला मान, तसं आमच्या घाटावर गौरी पूजनाचे महत्त्व. मी सातारा जिल्ह्य़ातील म्हसवड गावची. आमच्याकडे रिद्धी व सिद्धी अशा दोन गौरी माहेरवाशीण म्हणून येतात. पायऱ्यांची उत्तम आरास करण्यापासून तिचे थाटात स्वागत होते. बरेच गोड पदार्थ, सर्व प्रकारची मिठाई व फळे, भांडीकुंडी अशी अगदी जय्यत तयारी असते. गौरी पूजनाचा दिवस म्हणजे केवढे उत्साही वातावरण काही विचारू नका. मला मात्र प्रत्येक वर्षी त्यासाठी जायला मिळेलच असे नसते, अशा वेळी इकडूनच मी नमस्कार करते. मी स्वत: जाऊ शकले तर गौरीच्या तयारीत रमते.
शीतल पाठक
बेलापूरच्या आमच्या घरी गौरीपूजन नसले तरी मी मात्र इतरांकडे अतिशय श्रद्धेने त्यासाठी जाते. मी हरतालिकेचा उपवास करते, गणपती-गौरीच्या दिवसात कामातून मी सुट्टी घेते. पारंपरिक पद्धतीने जसे सगळीकडे गौरीपूजन चालते, तसेच मी करते. सणांच्या निमित्ताने आपण एकूणच वेगळ्याच भावनांमध्ये वावरतो, त्यातून एक प्रकारचे समाधान मिळते, गौरी पूजनात आपण एक स्त्री असल्याचा अभिमानही वाटतो.
प्राजक्ता दिघे
आमच्या दिघे कुटुंबातील गौरी सणाची परंपरा तब्बल दीडशे वर्षे जुनी व वैशिष्टय़पूर्ण आहे. आम्हा दिघे कुटुंबात तिचे फिरते आगमन होते. यावर्षी आमच्या सख्ख्या दिराकडे तिचे पूजन आहे. घराबाहेर पाटाखाली रांगोळी काढून तेरडाची गौरी उभी करून तिला सवासणीवाण दिले जाते, मग तिला घरभर फिरवले जात असताना ‘गौरी गौरी तू आत ये’, ‘गौरी गौरी घर बघ’ असे तिचे मन:पूर्वक स्वागत होते. आमचे कुटुंब प्रचंड मोठे असल्याने गौरीच्या नैवेद्यासाठी तब्बल अठरा किलो मटण लागते. मटण-वडे, तळलेली तुकडी, केशरी भात व उंची मद्याची वाटी असा आमच्या गौरीला आम्ही भरगच्च नैवेद्य दाखवतो. गौरी दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला प्रसाद म्हणून मटण-वडे देतोच. एकत्र नातेवाईंकाना भेटण्याची उत्तम संधी म्हणजे गौरीपूजन, गौरीचा मुखवटा, तिची साडी व तिचे दागिने हे सगळंच लक्षवेधी असतं.
गौरी कर्णिक
माझ्या अगदी खापर पणजोबांच्या काळापासून कर्णिक कुटुंबात गणपती-गौरी पूजन आहे, पण आमच्याकडे हा सण फिरता असतो. यावर्षी अंधेरीतील काकांकडे गौरी पूजन आहे. एकदा आमची गौरी चक्क अमेरिकेला जाऊन आली, बरं का! मुखवटा, साडी, दागिने अशा सगळ्याच गोष्टींनी आम्ही गौरीला सजवतो. अत्यंत प्रसन्न वातावरणात पूजनही होते. आम्हा कर्णिक कुटुंबियांत सण व त्यानिमित्ताने अनेकांनी एकत्र येणे याला खूप महत्त्व आहे. खूप छान वाटते, उत्साहही वाढतो.
स्मिता गोंदकर
मी मूळची दक्षिण भारतातील म्हैसूर येथील शिमोगा या गावची, आमचे कुलदैवत हौन्नुरअम्मा देवी, तिचे पूजन हेच आमचे गौरीपूजन! दक्षिण भारतातील मंदिरे व देवपूजन हे सर्वज्ञात आहे. मला जेव्हा शक्य होते तेव्हा गोवा व कर्नाटकच्या देवळांना भेटी देते. देवस्मरण रोजच सुरू असते, पण कामाच्या व्यस्ततेमुळे गौरी-गणपतीला कुठे जाता येत नाही.
शब्दांकन - दिलीप ठाकूर