रंग मिरवणुकीचे.. Print

प्रियांका पावसकर ,शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
alt

गणपती बाप्पा अनंत चतुर्दशीला परतीच्या प्रवासाला निघतील. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. अशी आळवणी देत ढोल-ताशांच्या गजरात, हजारो भक्तगणांच्या साक्षीने, तरु णाईच्या जल्लोषात रंगेल बाप्पाची भव्य मिरवणूक.. विशेष म्हणजे बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण, दिवस उत्साहात सेलिब्रेट करणारी ही तरुण मंडळी सध्या या उत्सवाच्या प्रत्येक टप्प्याचे आकर्षण ठरतेय.
गणेशोत्सवातील मानाच्या गणपतीच्या मिरवणुका सर्वाचं आकर्षण ठरतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत या मिरवणुकांमध्ये ढिंचॅक पद्धतीची गाणी लावून बेशिस्तपणे नाचण्याकडे मंडळांचा कल होता. मात्र पारंपरिक वाद्यं मागं पडणार, हा समज मोडून काढत पुणेकरांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली. मग ढोल-ताशे पथकासह झांजा, ध्वज, लेझीम, डफली, टिपऱ्या, बर्ची पथक असणाऱ्या पथकांची संख्या वाढतच राहिली. सध्या ‘ज्ञानप्रबोधिनी’, ‘रेणुका स्वरूप’, ‘भावे स्कूल’, ‘नूमवि’, ‘रमणबाग’, ‘विमलाबाई गरवारे प्रशाला’ अशा शाळांसह ‘शिवगर्जना’, ‘शिवप्रताप’, ‘श्रीमानयोगी’, ‘स्वरूपवर्धिनी’, ‘समर्थ प्रतिष्ठान’, ‘स्वयंसिद्धा’ आदी अनेक पथकं कार्यरत आहेत. पथकांना मिळणाऱ्या मानधनातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यामुळं उत्सवाला आपसूकच विधायक वळण लागत्येय.
मिरवणुकीतील या पथकांत सगळ्या वयोगटांतील नि विविध क्षेत्रांतील महिला सहभागी होतात. मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुलींनी ढोल-ताशांसह इतर कौशल्यंही सहजगत्या आत्मसात केल्येत. शिस्तबद्ध पद्धतीनं मिरवणूक निघावी आणि मुलींनाही वादनाचा आनंद घेता यावा यासाठी या पथकांची स्थापना करण्यात आली होती. केवळ पुण्यातच नव्हे तर आता मुंबई आणि उपनगरांतही अशी पथकं स्थापन झाल्येत. मुलींचं पथक म्हटल्यावर येणाऱ्या अडचणी गृहीत धरल्या जातात. कधी कोसळता पाऊस, कधी मिरवणुकांतल्या गर्दीचा त्रास होऊ नये, म्हणून पथकाभोवती कडं करण्यासारख्या गोष्टी कराव्या लागतात. यानिमित्तानं स्वत:ला फिट ठेवण्यासह कठीण परिश्रमांसह वेळेचं व्यवस्थापन, मनाची एकाग्रता, टीमवर्क आदी गुण विकसित होतात. सरावादरम्यान मुली नवनवीन ताल बनवितात. त्यांना अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात.
‘प्रबोधिनी’खेरीजच्या पथकांचा विचार केल्यास गेल्या ५-७ वर्षांत फक्त मुलींची ढोल पथकं निघाल्येत. ‘मुली काय वाजवणार’चा सोशल स्टिग्मा गेलाय. मुलींची आणि समाजाची मानसिकता बदलल्येय, ही जमेची बाजू आहे. मुली अभिव्यक्त होऊ शकतायत. मुळात युवा गटातल्या मुलींना ‘आपण हे केलं’ याचं अप्रूप असतंच. मात्र केवळ पथकात सामील होणं आणि वाद्य वाजवणं एवढंच करायचं नसतं, तर शिस्तीत वाजवणं-नाचणं, सरावासाठी वेळ काढणं, ते ते कौशल्य हस्तगत करणं आदी पायऱ्या पार कराव्या लागतात. मेहनतीनं सराव करताना प्रत्येक सांघिक कृती आधी डोक्यात उतरवावी लागते. त्यातली शिस्त अंगी मुरावी लागते. सोशल डेडिकेशन यावं लागतं. पुढं जाऊन त्याचं रूपांतर सोशल अ‍ॅक्टिव्हिटीत होऊ शकतं. यानिमित्तानं जणू एक संधी निर्माण होते. टीमवर्क, शिस्त, एकाग्रता, गतिमानता आदी गोष्टी विकसित होऊ लागतात. तासन्तास चालणाऱ्या मिरवणुकीत वाजवण्याची ऊर्जा मुलींकडं असतेच. प्रश्न केवळ वृत्तीचा असतो. आपण याकडं कसं बघतो, ते तपासून घ्यायला हवं. हे तपासताना सोशल रेफरन्समध्ये स्वत:ची जागा स्वत:ला ग्लेझ करता यायला हवी. हे सगळं करताना ‘मी’पणा सुटत जातो. ही एक प्रकारची टीम बिल्डिंगची एक्सरसाइझच आहे.

स्वानंद जोशी
alt
धांगडधिंगा करण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने काढलेली मिरवणूक ही मला खूप भावते. माझ्या येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीचा अनन्यसाधारण अनुभव माझ्या घरच्या तीन पिढय़ा गेली अनेक वर्षे उपभोगत आहेत. लहान असताना पारंपरिक मिरवणूक काय असते, असा प्रश्न आजोबांना आणि बाबांना विचारणारा मी गेले अनेक वर्षे स्वत: मिरवणुकीच्या कारकीर्दीचा भाग बनलो आहे. श्रीगणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी हिडीस नृत्य करून आनंद व्यक्त करण्यापेक्षा भजन, लेझीम, टाळ-मृदंगाच्या नादात भावधुंद होऊन नाचा. असे केल्याने ‘भाव तिथे देव’ या उक्तीप्रमाणे नाचणाऱ्यांना श्रीगणेशाच्या अस्तित्वाची प्रचीती घेता येईल.

निनाद पाटे
alt
फुलांच्या पालखीत विराजमान झालेली गणेश मूर्ती, कुठे पारंपरिक वाद्यांचा निनाद तर कुठे डीजेच्या आक्रोशात बेधुंद होऊन नाचण्यात दंग असणारे भाविक यांना वाहनांच्या येण्या-जाण्यामुळे त्रास होऊ नये याकरता गेली २ वर्षे मी आमच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ट्रॅफिक कंट्रोल करण्याचं काम पाहतो. मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून चौकाचौकात आमचे व्हॉलेन्टिअर्स आम्ही तैनात केलेले असतात. अशा वेळी नगरातील पोलिसांचा मोठा पाठिंबा मिळत असल्यामुळे मिरवणुकीच्या वेळी वाहतुकीचे नियम प्रत्येक भाविकाकडून पाळले जाऊन ट्रॅफिक कंट्रोल करणं, वगैरे गोष्टी सहजतेने निकाली लागतात.

पूनम मराठे
alt
गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. अशा गजरात बाप्पांचं अखेर विसर्जन केलं जाईल. १० दिवस बाप्पांची सेवा करण्यात जितका खर्च येत नाही तितका एका दिवसाच्या मिरवणुकीत झालेला दिसतो. मिरवणुकीसाठी असा हा पैशांचा चुराडा करणं माझ्या मते चुकीची गोष्ट आहे. गणेशोत्सव मंडळांनी विशेषत: सार्वजनिक मंडळांनी आपल्या हौसेमौजेवर थोडय़ा मर्यादा घातल्या तर याच पैशांतून अनेक सामाजिक उपक्रम, कल्याणकारी कार्यक्रम, गरिबांसाठी मंडळातर्फे उपयुक्त योजना राबवता येतील. परंतु गणेशोत्सव म्हणजे मौजमजा, दंगामस्ती, धमाल असे समीकरण बनले असल्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून विचार करायला वेळ आहे कोणाकडे?

सोनाली पठारे
alt
सांस्कृतिक पद्धतीने काढली जाणारी मिरवणूक ही विशेषत: आपल्या तरु ण मित्र मैत्रिणींना हवीहवीशी वाटणारी. धार्मिक उत्सवाचे विडंबन न करता जय्यत तयारी करून काढलेली आमच्या श्रींची मिरवणूक खरोखरच पाहण्याजोगी ठरते. यंदा मिरवणुकीतील लेझीम पथक बसवण्याची जबाबदारी ही माझ्यावर असल्याने ती कामगिरी मी अतिशय चोखपणे बजावणारच. गणेशाच्या विसर्जनादरम्यान इतर मिरवणुकांमधील अवली डान्स पाहून आमचेही पाय नकळत थिरकू लागतात. परंतु आम्ही रस्त्यावर अवेळी त्याचं प्रदर्शन न करता मिरवणुकीच्या आधी केल्या जाणाऱ्या वाद्यांच्या सरावादरम्यान हॉलमध्ये पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर नाचून एकच जल्लोष करून आमची तीही हौस भागवून घेतो.

सिद्धी वैद्य
alt
मिरवणुकीत जसं नाचणं आलं, वाजवणं आलं, खेळणं आलं तसंच मिरवणुकीत फिरणंदेखील आलंच नाही का? आपल्या नगरातील अथवा मुंबईतील मोठमोठे गणपती विसर्जनासाठी निघाले की घरातील आजी-आजोबा, आई-वडिलांपासून, लहानग्यांपर्यंत प्रत्येकजण मिरवणूक पाहण्यासाठी दिवसरात्र फिरत असतात. कारण मिरवणुकीला एकप्रकारे जत्रेचंच स्वरूप आलेलं असतं. मिरवणुकी दरम्यान लहान लहान फिरस्त्या मंडळींचा रस्त्यावर जो बाजार भरतो त्यात लहान मुलांनी वाजवायच्या पिपाण्या आजही दोन-पाच रु पयाला मिळतात. आम्ही काही मित्रमंडळी एखादा दिवस ठरवून जेव्हा लालबाग, खेतवाडी, गिरगाव इथले गणपती बघत जेव्हा रात्रभर फिरतो तेव्हा चक्क या पिपाण्या विकत घेतो आणि त्या मोठय़ाने वाजवत, मजा करत मिरवणुकीत रात्रभर फिरतो.

संकेत देशपांडे
alt
‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात बाप्पांना निरोप देणाऱ्या विसर्जनाच्या मिरवणुकीत उत्साह शिगेला पोहोचलेला असेल. यावर्षी मिरवणुकीत यंदा अधिकच भर पडेल ती आमच्या मंडळाच्या महिला झांज, लेझीम, झेंडा पथकाच्या आविष्काराची. अनंत चतुर्दशीला मंडळाचं हे पथक विसर्जनाच्या मिरवणुकीला चारचांद लावल्याशिवाय राहणार नाही. दरवर्षीच्या निरीक्षणातून मी एक गोष्ट ठासून सांगू शकतो की, मिरवणुकीत आयत्या वेळी धुमाकूळ घालणाऱ्या पावसामुळे पथकातील स्त्रिया,मुलं यांचा उत्साह तसूभरही कमी होणार नाही. नेहमी राजकारण्यांना खड्डय़ात रस्ता की रस्त्यात खड्डा असा लगावला जाणारा टोला मिरवणुकीच्या दिवशी तरी टाळला जाईल, कारण श्रींच्या भक्तिरसात गुंगून गेलेले भक्तगण रस्त्यांना पडलेल्या खड्डय़ांची पर्वा न करता त्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे मनोरंजन करण्यात गुंग असतील.

अमित भुस्कुटे
alt
गणेशाच्या मिरवणुकीतच नाही तर त्याच्या प्रतिष्ठापनेपासून त्याच्या विसर्जनापर्यंत श्रींच्या चेहऱ्यावरील प्रत्येक दिवसाचे भाव टिपण्याचे भाग्य हे मला आणि माझ्या कॅमेऱ्याला मिळतं. मंडळाचा फोटोग्राफर म्हणून सगळीकडे मिरवण्याची मजा काही औरच असते. दरवर्षी मिरवणुकीत देखाव्यांचे, रोषणाईचे, ढोलताशे वाजवण्यात गुंग असणारे वादक, लेझीम खेळणाऱ्या स्त्रिया, मुली यांचे फोटो काढल्यामुळे विसर्जनानंतरही मी काढलेले फोटो बघून सगळ्यांनाच ते दिवस, ते क्षण फोटोमार्फत पुन्हा अनुभवता येतात शिवाय जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गणेशोत्सवात आणि गणेशोत्सवानंतरही मी आणि माझा कॅमेरा बाप्पासाठी सदैव सज्ज असतो.

सोहम वैद्य
alt
मी यावर्षी १०वी झालो आणि फायनली मला आमच्या येथील टिळकनगर गणेशोत्सव मंडळात कार्यकर्ता म्हणून एन्ट्री मिळाली. साक्षात मिरवणूक अनुभवण्याचा आनंद हा काहीसा वेगळाच असतो, परंतु आपल्या मंडळाची मिरवणूक, आपला बाप्पा, आपले उपक्रम देशातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या बाप्पाच्या भक्तगणांना अनुभवता यावे यासाठी मी यंदा फेसबुक या सोशल साइट वर मंडळाच्या नावानेच अकाऊंट सुरू केले आहे. वॉलपेपरवर बाप्पाच्या मूर्तीचा लक्ष वेधून घेणारा डेकोरेशनचा फोटोही अपलोड केला आहे. सोबतच दररोज काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या, श्लोक, सुविचार, पूजा पद्धती, मंडळाचा अहवाल आदी माहिती त्यात मी पोस्ट करत असतो. मिरवणुकीसाठीचा सराव, ढोल-ताशाचे प्रकार, वाद्ये वाजवताना घ्यावयाची दक्षता, योग्य गणवेश, मिरवणुकीत घ्यावयाचा आहार आदी अत्यावश्यक माहितीची देवाणघेवाण या माध्यमातून केली आहे. गणेशोत्सवाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आणि जनमत तयार करण्यासाठी ही आधुनिक पद्धत भविष्यात लाभकारक ठरणार आहे.

सलील वैद्य
alt
प्रदूषणविरहित मिरवणुकींचं स्वप्नं आपण प्रत्येकजण पाहतो. मिरवणुकीत गुलालाची उधळण जर टाळली तर नक्कीच प्रदूषण आटोक्यात येण्यास मदत होईल. आमच्या सार्वजनिक गणेशोत्सवात केवळ श्रींना टिळा लावण्यापुरताच आम्ही गुलालाचा वापर करतो. मिरवणुकीदरम्यान निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी निर्माल्य कलशाचा प्रत्येकानेच वापर करावा. निर्माल्याच्या साठवणीत फुले आणि पानांव्यतिरिक्त इतर साहित्यांचा समावेश होणार नाही याची प्रत्येकानेच दखल घेणे गरजेचे आहे.

गौरव जोगळेकर
alt
गणाधीशा.. भालचंद्रा.. गजवक्र.. गणनायका..  अशा विविध गाण्यांचा ठेका धरून गळ्यात ढोल ताशे अडकवून ते वाजवताना क्षअरश: मन आणि शरीर बेधुंद होऊन नाचू लागते.गेले तीन वर्ष मी मंडळाच्या मिरवणुकीत ताशा वाजवतो.५ ते ६ तास सलगतेने ताशा वाजवून देखील त्या मंगलमय वातावरणाच्या धुंदीमुळे थकवा कधीच जाणवत नाही.शिवाय कधी वाजवताना दुखापत जरी झाली तरी त्याचाही विसर पडून गणरायाला स्वत: वाजवलेल्या वाद्यांच्या गजरात अखेरचा निरोप देण्यासाठी मी आतुर  झालेलो असतो.

देवश्री धोपेश्वरकर
आठवी, डॉ. कलमाडी. शामराव हायस्कूल, समर्थ प्रतिष्ठान पथक
alt
पथकांत वाजवणाऱ्या नातलग भावंडांपासून प्रेरणा घेऊन मी यंदाच पथकात सामील झाल्येय. माझ्याहून लहान भावंडं पुढल्या वर्षी शिकणार आहेत. मी ढोल वाजवायला शिकत असून ढोलाचं वजन जास्त असलं तरी तो पेलण्याचा काही त्रास झाला नाही. पथकात आमचा छान ग्रुप तयार झालाय. नवीन मैत्रिणी मिळाल्यात. प्रॅक्टिस तर पूर्ण झाल्येय, आता वेध लागल्येत ते मिरवणुकीचे. सराव झाला असला तरी आपण चुकायला नको, अशी मनातून भीतीही वाटत्येय.. अर्थात तसं होणार नाही.. कारण बाप्पा आहेच पाठीशी.