कट्टा Print

डी. के. बोस ,शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
alt

कट्टा मस्त निवांत होता, कारण गणपतीचं विसर्जन रविवारी झालं होतं, त्यावेळी या सर्वानीच धमाल उडवली होती, आगमनाबरोबरच विसर्जनाचा हिरोदेखील चोच्याच ठरला होता. त्याने आणलेला पुणेरी ढोल चांगलाच वाजला होता आणि प्रिन्सिपलपासून साऱ्यांनीच त्याची तारीफ केली होती. आता पुढे करायचं याचं प्लॅनिंग सुरू झालं होतं. अरे यार उद्याचा काही तरी झक्कास प्लॅन करा ना, उद्या अनंत चतुर्दशी आहे, मस्त कुठेतरी विसर्जन बघायला जाऊला, असं पिल्लू सुप्रियाने सोडलं आणि त्यावर मग चर्चेला उत आला. उद्या ना आपण गिरगाव चौपाटीला जाऊया, मस्त रात्री १० पर्यंत एन्जॉय करूया आणि मग घरी परतूया, असं संत्या बोल्ला. पण चोच्याच्या डोक्यात मस्त प्लॅन आकार घेत होता, ए, ऐका, आपण काय करूया माहितीए, सकाळी आपण लालबागाला जाऊया, पहिल्यांदा गणेश गल्लीतला गणपती बघूया, त्यानंतर थोडं आजूबाजूला भटकूया आणि तिथून मग लालबागच्या राजाची मिरवणूक बघायला जाऊया, १२ वाजता राजा गल्लीतून बाहेर पडेल, तिथे मस्त दर्शन होईल. तिथे मस्त दर्शन करून आपण गिरगावात जाऊया, तिथे काय प्रत्येक गल्लीत मस्त गणपती बघायला मिळतील. तिथून मग मस्त तांबेकडे जाऊन पोटपूजा करू आणि मग जाऊ ना मस्त चौपाटीवर.
चोच्याचा प्लॅन सारेच जणं ऐकत होते, त्यांना तो जाम आवडला. साल्या चोच्या तू ना एक काम कर, कॉलेजमधून पासआऊट झालास ना की, टुरींग एजंटचं काम कर, म्हणजे बघ मुंबई दर्शन वैगेरे असं काहीतरी, तुला सगळी मुंबई माहितीए, त्यामुळे तुझ्यासाठी हा धंदा सॉलीड असेल बघ, लेका लय झाक कमवशील, असं अभ्या म्हणाला. त्यावर सुश्याचं काही वेगळंच बोलणं होतं. चोच्या याचं काय ऐकू नकोस रे, मी तुला सांगते, पासआऊट झालास ना की, मस्त इव्हेंट मॅनेजमेंट कर, आता गणपतीमध्ये तू जी काय व्यवस्था केलीस ना, ती सॉलीडच होती, त्यामुळे मुंबई दर्शन वैगेरेच्या भनगडीत पडू नकोस, इव्हेंट मॅनेजमेंट कर, तुझे कॉन्टॅक्ट पण सॉलीड आहेत, मस्त धंदा होईल तुझा.
सुश्याच्या या म्हणण्यावर सुप्रिया आणि स्वप्ना यांच्यामध्ये एकमत झालं खरं, पण अभ्या आणि संत्या हे काही मानायला तयार नव्हते. मग मुलं विरूद्ध मुली असा सामना सुरू झाला. इथून काही तरी तिथून काही तरी, अशी वादावादी सुरू झाली. चोच्या बिचारा त्यांच्यामध्ये ना इधर का ना उधर का, असाच होता. काही वेळाने चोच्या वैतागला, एक गप्प बसा यार, काय चालवलंय तुम्ही माझं काय ते मी बघेन, च्यायला आधी पासआऊट तरी होऊद्या. इथे च्यायला पास होणार की नाही याची गॅरेंटी नाही आणि तुम्ही कसले तारे तोडताय. तुमच्या सजेशन्स चांगल्या आहेत, मी त्यांचा विचारही करेन, पण यार आधी पास तर होऊद्या, त्यानंतर तुम्ही आहातच मदत करायला. आणि च्यायला उद्याचा कोणी विचार केलाय, आपण आताची लाइफ मस्त एन्जॉय करू या, असं चोच्या बोलल्यावर सारेच जण थांबले. गणपतीपासून चोच्या हा कट्टय़ाचा बॉस झाला होता, सारेच त्याचे ऐकायचे, त्याचाबद्दलचा रीस्पेक्ट वाढला होता.
ए अभ्या साल्या, उद्या लवकर उठ, नाही उठशील आरामात आणि संत्या तू पण घरातून लवकर बाहेर पड आणि माझ्याकडे ये, आपण बाइकवरून तो शेटजीचा गणपती बघायला जाऊया आणि त्यानंतर निघूया लालबागला जायला. आणि तुम्ही मुलींनो जास्त मेकअप करण्याच्या भानगडीत पडू नका, वेळेवर भेटा, कळल्लं ना सगळ्यांना, चला आता मी जातो, जोशी मॅडमने बोलावलंय, आता नवारात्रीची मिटींग ठेवलीय आणि मला ती अटेण्ड करायला सांगीतलीए. तुम्ही वाट पाहा मी आलोच अध्र्या तासात, असं म्हणत चोच्या निघाला, ऐटीत, आपल्या खास स्टाईलमध्ये चालायला लागला आणि हे सर्व जण गप्प बसून फक्त चोच्याकडे बघतच राहीले.