नादखुळे Print

 

प्राची साटम ,शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it  

पुण्यातल्या आणि पर्यायाने महाराष्ट्रातल्या संपन्न सांस्कृतिक वारशाची झलक पाहायची असेल तर गणेशोत्सवादरम्यान पुण्याला भेट द्यायलाच हवी. पुण्यातल्या गणेशोत्सवामधील प्रेक्षणीय आणि अविस्मरणीय भाग म्हणजे मिरवणुका. गेली कित्येक वर्षे या मिरवणुकांमधूनच पुण्याने आपले वेगळेपण राखले आहे. या सर्व पथकामधल्या कोणत्याही वादकाला विचारा, ‘‘मिरवणुकीतला ढोल म्हणजे काय आहे तुझ्यासाठी.??’’ क्षणाचाही विलंब न करता ही मंडळी उत्तर देतील. ‘‘नशा, खूळ म्हणा हवं तर. पण एकदा ढोल बांधला ना की कशाचेच भान उरत नाही.  स्वत:चेही नाही.

आपल्याला लाभलेल्या सांस्कृतिक वैभवाचा सार्थ अभिमान असणाऱ्या पुण्यात तर सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे एक मोठी पर्वणीच असते. इथे मिरवणुकीत तलवारबाजी, दांडपट्टा यांसारखे मर्दानी खेळ सादर केले जातात, ध्वज नाचवले जातात आणि या साऱ्यांमध्ये मुख्य आकर्षण असते ढोल-पथकांचे.अंगावर बांधलेला तो मोठ्ठा ढोल आणि ते वाजवण्यात तल्लीन झालेले ते ढोलकरी .या विहंगम दृश्याने तर जमलेल्या लोकांचेही भान हरपून जाते.. ढोलाच्या ठेक्यावर प्रेक्षकांचे पाय आपोआप थिरकायला लागतात, स्वत:च्याही नकळत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात सर्वच जण सामील होतात. किमान alt

तीन ते साडे तीन तास हे ढोलकरी ढोल वाजवत असतात. पण या काही तासांच्या वादनासाठी ही पथके महिनोन्महिने सराव करतात. साधारण मे, जूनपासून यांचा सराव सुरू होतो.पुण्यात मानाच्या गणपतींसमोर ढोल वाजवणे ही खूप अभिमानाची गोष्ट समजली जाते आणि म्हणूनच डॉक्टर, वकील, इंजिनीअर अशी व्यस्त नोकऱ्या असलेली माणसेही या पथकांमध्ये आनंदाने सामील होतात. पुण्यात सद्यस्थितीला जवळपास ८० पथके कार्यरत आहेत आणि ही सर्व पथके मिरवणुकीत चोख सादरीकरण करता यावे म्हणून अगदी कसोशीने सराव करत असतात. बरेच जण आपला नोकरी-व्यवसाय, घर सांभाळून पथकांमध्ये सामील होतात.सराव करतात.आणि तेही न दमता आणि न कंटाळता. पुण्यातील काही पथके तर गेली कित्येक वर्षे मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत वाजवत आहेत. उदाहरण घ्यायचेच झाले तर नारायण पेठेतील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग यांच्या ढोल पथकाचे घेता येईल. हे पथक गेली २० वर्षे मानाचा पहिला गणपती-कसबा गणपतीला ढोल वाजवत आहे.कसबा म्हटले की रमणबाग.इतके हे नाते घट्ट जुळले आहे. या वर्षीही हे ढोल पथक ३००-४०० ढोलकऱ्याचा ताफा घेऊन ढोल वाजवण्यासाठी सज्ज आहे, २-३ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर आपले वादन, आपली कला गणरायाच्या चरणी अर्पण करण्याचा त्यांचा मानस आहे. यावेळेचा गणेशोत्सव रमणबाग पथकासाठी अजून विशेष असणार आहे. कारण या वर्षीपासून त्यांनी मुलींचे स्वतंत्र ढोल पथक सुरू केले आहे. शाळा समिती अध्यक्ष शाळीग्रामसर, मुख्याध्यापक पुरंदरे सर आणि रमणबाग पथकाची धुरा सांभाळणारे पथक प्रमुख शिवलेसर यांच्या पुढाकाराने मुलींचे हे पथक मिरवणुकीसाठी सज्ज होणार आहे. हे पथक मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी येथील मिरवणुकीत सहभागी होणार आहे. या दोन्ही पथकाचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांचा केवळ सराव बघण्यासाठी लोक त्यांच्या सरावाच्या जागी गर्दी करतात आणि वाजवणारे बेभान होऊन वाजवत असतात. कारण या पथकाचे ब्रीदवाक्यच आहे.
dhol is not our fashion but passion खरे तर पुण्यातील प्रत्येक पथक याच भावनेने भारलेले असते..आणि म्हणूनच गणपतीच्या साधारण १० दिवस आधी तुम्ही पुण्याला गेलात तर तुम्हाला कधी नदीकाठी, कधी शाळेत तर कधी मोकळ्या मैदानात ढोलांचा आवाज घुमताना दिसेल..अशाच प्रकारची ऊर्मी मनात बाळगून काहीशा नवोदित असलेल्या वंदे मातरम संघटना कृत युवा वाद्य पथकाने अगदी जोरदार सराव केला आहे. या पथकाचे यंदाचे हे दुसरे वर्षे असून ते सलग दुसऱ्या वर्षी मानाच्या तुळशीबागेतल्या गणपतीच्या मिरवणुकीत वाजवणार आहेत. इथे शिकवणारे तरु ण शिक्षकही स्वत:ची नोकरी आणि व्यवसाय सांभाळून विनातक्रार शिकवतात. जवळपास २५० जणांच्या या पथकामध्ये ७०-८० मुलींचा समावेश आहे आणि ढोल वाजवण्यात या मुली मुलांपेक्षा तसूभरही मागे नाहीत.या पथकात ढोलाची बाराखडी शिकवली जाते म्हणजे ढोल वाजवायच्या आधी त्या ढोलाची काळजी घेण्यापासून तो ढोल बांधण्यापर्यंतचे सर्व प्रशिक्षण दिले जाते. या सर्व पथकामधल्या कोणत्याही वादकाला विचारा, ‘‘मिरवणुकीतला ढोल म्हणजे काय आहे तुझ्यासाठी.??’’ क्षणाचाही विलंब न करता ही मंडळी उत्तर देतील. ‘‘नशा, खूळ म्हणा हवं तर.पण एकदा ढोल बांधला ना की कशाचेच भान उरत नाही.स्वत:चेही नाही.ढोलाच्या त्या ठेक्यात आम्ही आपसूकच त्याच्याशी एकरूप होतो.आणि मग वेळ-काळाचे कशाचेच बंधन आम्हाला उरत नाही.’’ आणि म्हणूनच ही मंडळी एकेका मिरवणुकीत सलग ४-५ तास ढोल वाजवतात.तेही ना दमता.त्यांना बघण्यासाठी आलेल्या गर्दीचे कौतुकमिश्रित भाव झेलत. अशा या ‘नादखुळ्या ढोलकार्याने’ गणेशाला दिलेली मानवंदना तुम्हाला याची देही याची डोळा पाहायची असेल तर गणेशोत्सवात पुण्याला भेट द्यायलाच हवी.

गौरी पोफळे
सॉफ्टवेअर इंजिनिअर
alt
पुण्यातल्या गणपती उत्सवातील मिरवणुका म्हणजे सगळ्या पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय.मीसुद्धा दरवर्षी या मिरवणुका पाहायला जायचे.तेव्हा त्या ढोल वादकांना पाहून मला फारच अप्रूप वाटायचे, मुलीही अगदी समरसून ढोल वाजवायच्या. ते पाहून मीही ठरवले की या वर्षी आपणही ढोल पथकात सामील व्हायचे.ढोल वाजवण्याचे हे माझे पहिलेच वर्ष. त्यामुळे अगदी सुरु वातीपासून सुरु वात करायची होती. जेव्हा मी एक प्रेक्षक म्हणून ढोल वाजताना पाहायचे तेव्हा ते मला फारच सोपे असेल असे वाटायचे. पण आता जेव्हा प्रत्यक्ष मी ढोल वाजवते तेव्हा मात्र त्यातले खरे कसब कळतेय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नोकरी करून मी नंतर ढोल वाजवायच्या सरावासाठी जाते. ढोल वाजवणे म्हणजे माझ्यासाठी स्ट्रेस रीलिफ आहे.

मारिका स्त्रौस
विद्यार्थिनी
alt
मी खरे तर भारतात स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रॅम तर्फे भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी आले आहे. एकदा असेच मी ढोलवादनाचा सराव पाहिला आणि मला मनापासून ते शिकावेसे वाटले, अमेरिकेत असताना मी पिआनो आणि पाइप ऑर्गन वाजवायचे. थोडीफार गायचेही. त्यामुळे ताल आणि संगीताची जाण होती आणि म्हणूनच ढोल शिकायचा विचार मनात पक्का केला.माझ्या पथकातल्या शिक्षकांनीही मला खूप मदत केली. एखादी गोष्ट कळली नाही की ते स्वत: मला नीट वाजवून दाखवायचे आणि जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत शिकवायचे. मी खरे तर भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायला आले होते, पण आता मात्र मी या ढोल पथकांचा अभ्यास करणार आहे. मला त्यांच्यावर अभ्यास करायला खरंच आवडेल.

विश्वा वाकचौरे  
alt
मी या वर्षी १२वी सायन्सला असल्याने अभ्यासाचे टेन्शन आहे, पण एकदा का पथकाचा सराव सुरू झाला की मी स्ट्रेस फ्री व्हायचे. त्यात सर्व विसरून जायला होते.आणि मिरवणुकीत मनाच्या गणपतीसमोर वाजवणे म्हणजे आमचा मोठा सन्मानच असतो. त्यामुळे १२वीचा अभ्यास, प्रक्टिकल्स हे सगळे सांभाळून पथकात सहभागी व्हायला मला खूप आवडते.

प्रियंका सामंत
एनजीओ कार्यकर्ती
alt
माझ्या अनेक मैत्रिणी ढोल वाजवायच्या. त्यामुळे बरीच वर्षे माझ्याही मनात ढोल वाजवण्याची इच्छा होती. गेल्या वर्षी ती इच्छा पूर्ण झाली. ठोक्याचे पान, थापीचे पान, ढोल ताणणे, तो बांधणे या सगळ्या तांत्रिक गोष्टी शिकायला महिना लागला. पण आता मात्र ढोल हातात आला की तो कधी एकदा वाजवतेय असे होते.गणपतीच्या पहिल्या दिवशीच्या मिरवणुकीत मी सलग ३ तास ढोल वाजवते.आणि विसर्जनाच्या दिवशी तर ७-८ तास ढोल वाजवला जातो.मिरवणुकीमध्ये इतका वेळ ढोल वाजवूनही कुठेच थकल्यासारखे वाटत नाही, कारण तेथील वातावरणच उत्साहाने, चैतन्याने भरलेले असते की थकवा कुठच्या कुठे निघून जातो. मी गेली ३ वर्षे पुण्यातील परिवर्तन या एनजीओ मध्ये काम करत आहे, आणि आता तर मी त्याची जॉईंट सेक्रेटरी झाल्यामुळे कामाचा भर अजूनच वाढला आहे पण ढोल वाजवण्याच्या ओढीने मी हे सगळे जमवून आणते.

श्रुती हुगले
विद्यार्थिनी
alt
माझ्या घराजवळच एक मंडळ आहे, तिथे जेव्हा जेव्हा ढोल वाजायचा तेव्हा मलाही ढोल वाजवावासा वाटायचा. आणि मग मी आई-बाबांना याबाबत सांगितले.त्याबद्दल आई-बाबा थोडे साशंक होते, कारण त्यावेळी मी सातवीत होते. पण माझ्या आग्रहाखातर त्यांनी मला ढोल वाजवण्याची परवानगी दिली, आता मी गेली २ वर्षे ढोल वाजवतेय. आई-बाबांना आधी थोडी धास्ती वाटायची, पण जेव्हा त्यांनी मला मिरवणुकीत ढोल वाजवताना पाहिले तेव्हा त्यांना माझा खूप अभिमान वाटला आणि आता ते मला प्रोत्साहन देतात.

तन्वी बेडेकर
alt
विद्यार्थिनी

मी सुमारे ४ वर्षांपासून ढोल वाजवतेय. आता हळूहळू मुलींची ढोल पथकांची संख्या वाढत चालली आहे. मुली मुलांपेक्षा कशातही कमी नाहीत हेच यातून सिद्ध होते. ढोल पथकांचा मला झालेला वैयक्तिक फायदा म्हणजे व्यक्तिमत्त्व सुधारणा.आपल्यात आत्मविश्वास वाढतो. नेतृत्वगुणांचा विकास होतो, आणि मिरवणुकीत जेव्हा लाखो लोकांचे लक्ष आपल्यावर असते तेव्हा खरंच अभिमान वाटतो.

सायली डावरे
गृहिणी
alt
माझे पती याआधी पथकात होते. माझ्या घरच्यांनीही मला प्रोत्साहन दिले आणि आज मी ढोल वाजवायला शिकले. पथकात येण्याआधी मनात भीती होती की जमेल की नाही, पण हळूहळू शिकत गेले आणि आता तर ढोल बांधल्यावर तो सोडवतच नाही.आमचा सराव संध्याकाळी असल्याने घरी जायला कधी कधी उशीर व्हायचा, पण सरावानंतर अजूनच उत्साही वाटायचे.पुढच्या वर्षीही ढोल वाजवण्याचा माझा इरादा पक्का आहे..

उमा कळंबकर
अ‍ॅडव्होकेट
alt
यावेळी आमचे पथक मनाच्या गणपतींपैकी एक अशा तुळशीबागेतल्या गणपतीच्या मिरवणुकीत सहभागी होणारेय. माझे हे पहिलेच वर्षे असूनही मला मनाच्या गणपती समोर वाजवायला मिळतेय याचा खूप आनंद होतोय. पुण्यातल्या या मिरवणुका म्हणजे प्रत्येक पुणेकरांसाठी खूप अभिमानाची बाब असते. रस्त्यांवर तोबा गर्दी लोटलेली असते आणि सगळ्यांच्या नजरा या मिरवणुकीवर असतात. माझ्या या ढोल पथकामधून मी ढोल वाजवायला तर शिकलेच, पण त्याच बरोबर एकित्रतपणे काम करण्याची मजा, ऐक्याचे बळसुद्धा अनुभवले. पथकांमध्ये आधीपासूनच एक शिस्त असते आणि ती ढोल शिकताना आपसूकच तुमच्यात बाणवली जाते. त्यामुळेच मिरवणुका इतक्या शिस्तबद्ध रीतीने होतात.माझ्यासाठी तर हे ढोलवादन म्हणजे आराधनाच आहे आणि म्हणूनच ढोलवादन मी मनापासून एन्जॉय करते.

दीपाली चौघुले
रमणबाग, महिला पथक प्रमुख
alt
आमच्या रमणबागेच्या महिलांचे पथकाचे यंदाचे हे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे जबाबदारीही जास्त आहे..समर्थपणे ढोल सांभाळणाऱ्या या मुलींची सर्व जबाबदारी माझ्या खांद्यावर असते. त्यामुळे त्यांना हवे नको ते बघण्याचे काम माझे आहे. त्यांचा सराव नीट होतोय का हे पाहण्यापासून मिरवणुकीसाठीच्या त्यांच्या तयारीपर्यंत मला सतत त्यांच्याबरोबर राहावे लागते.सराव करून प्रत्येक मुलगी घरी गेली की मगच मी घरी जायला निघते. प्रसंगी ढोल बांधून त्यांना मी शिकवायचेही. आमच्या पथकात लहान मुलीपासून ते अगदी गृहिणीपर्यंत सर्वाचा समावेश आहे.