कट्टा Print

डी. के. बोस , शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२

‘तू ना मला अजूनही सीरियसली घेत
 नाहीएस, आता घरचे मुलं बघायला लागले आहेत, ते कधीही माझ्यापुढे मुलाला उभं करतील, तेव्हा मी काय करू? तेव्हा आपल्या हातात काहीच नसेल. मन मारून मला त्याच्याशी लग्न करावं लागेल आणि तू होशील माझ्या मुलांचा मामा’. ‘अगं तू ना जरा शांत हो, असं काही होणार नाही, पण मला सेटल व्हायला वेळ तर लागेल ना, आता कुठं आपण दोघं डिग्री घेऊन बाहेर पडलो, थोडा वेळ तर लागेल ना सेटल व्हायला, तुझ्या घरच्यांनी विचारलं की, तुझा तो प्रियकर काय करतो, तर काय उत्तर देणार आहेस तू, त्यामुळे थोडी कळ सोस, मी बऱ्याच ठिकाणी सीव्ही पाठवले आहेत, नक्कीच कुठून ना कुठून तरी रिप्लाय येईल. एकदा जॉब लागला की मग येईन ना तुझ्या घरी रीतसर मागणी घालायला.’ ‘आणि समज तोपर्यंत जर घरच्यांनी मुलगा दाखवला तर काय करू, आत्ता आलास तर काय बिघडणार आहे का, नोकरी काय, ती मिळेल मलाही आणि तुलाही. पण आत्ता जर आला नाहीस, तर कदाचित आपल्या हातातून वेळ निघून जाईल, मला तुला गमवायचं नाहीए, तू समजून का घेत नाहीस, तुझ्याशिवाय आयुष्यात मी कोणावर प्रेम करू शकत नाही, हे तुलाही चागलंच माहिती आहे, आणि तरीही तू सीरियस नाहीस.’ ‘अगं राणी, असं काही नाही, मी सीरियस नाही, असं तुला का वाटतं, तुझ्याशिवाय माझं कुणीच नाही, मलाही फक्त तू आणि तूच हवी आहेस, एक काम करूया, मला फक्त दहा दिवसांची मुदत दे, त्यामध्ये जरी नोकरी लागली नाही, तर मी येईन, तुझ्या घरी मागणी घालायला.’ ‘खरंच?’ ‘सोला आणे सच’, या संवादानंतर ती हलकेच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते, मस्त गुलाबी रंगाचा लाइट, त्यांच्या अंगावर पडतो आणि काही वेळातच, वेल डन म्हणत डिरेक्टर आपली खुर्ची रिकामी करतो.
आता आपल्याकडे फार कमी दिवस राहिले आहेत, त्यामुळे ‘रन थ्रू’ थोडय़ा वाढवूया आपण, आता थोडा वेळ रीलॅक्स व्हा, दहा मिनिटांनी नंतरचा सीन करूया, असं म्हणत डिरेक्टर बाहेर पडतो आणि सारे जण सारिका आणि अभ्याजवळ जमतात. साल्या अभ्या, सही यार, मस्त स्क्रीप्ट पाठ झालंय, मला वाटलं च्यायला एक्झामसारखे वांदे व्हायचे तुझे, असं म्हणत चोच्या तडमडलाच. ए चोच्या, तुला काय बोल्लंच पाहिजे का, साल्या, कधी काय बोलायचं माहिती नाही, गप्प बस ना जरा, जा त्या महाराजला कटिंग सांगून ये, असं म्हणत संत्याने त्याला कटवायचा प्रयत्न केला खरा, पण चोच्याच तो, कसला निघतोय तिथून. थोडा वेळ मोबाइलशी काही तरी खेळत बसला.
अभ्या घाम गाळत होताच, सारिकाची काही वेगळी हालत नव्हती. पण अभ्या जास्तच थकलेला दिसला, ते पाहून चोच्या पुन्हा तडमडलाच, अभ्या सिगारेट कमी कर साल्या. धूर बघ निघायला लागलाय, असं बोल्ल्यावर अभ्याची खसकलीच, ०, चोच्या, आता यापुढे एक शब्द जरी काढलास ना, तर तुझं काय खरं नाही, असं अभ्या बोलतो न बोलतो तेच संत्या म्हणाला, चोच्या, जा ना कटिंग आणायला सांगितली ना, तडमड तिथं बाहेर जाऊन, उगाच आम्हाला पिडू नको, हां चोच्या, चल कटिंग आण, असं म्हणत सगळे जण त्याला बाहेर काढायलाच निघाले. त्यावर चोच्याने साधूंसारखा अभिनय केला, चेहऱ्यावर कसलाही आविर्भाव न आणता म्हणाला, भक्तजन हो, चिंता करू नका, कटिंग लवकरच येईल, आम्ही एसएमएस केला आहे महाराजला.
चोच्या हे बोल्ला खरा, पण कोणाचाच त्याच्यावर विश्वास बसेना, ए चोच्या, शेंडी नको लावूस, तुला आम्ही चांगलेच ओळखून आहोत, चल नौटंकी बंद कर आणि कटिंग आण, असं म्हणत सुश्या त्याला जवळपास हात धरून बाहेर काढायलाच निघाली, एवढय़ात दरवाजा किलकिला झाला, सगळ्यांच्या माना दरवाजाकडे वळल्या, एका पायाने दरवाजा ढकलत महाराजचा पंटर आतमध्ये आला, त्याच्या एका हातात कटिंगच्या ग्लासांनी भरलेली डिश होती, ती पाहिल्यावर सगळ्यांच्याच नजरा चोच्याकडे वळल्या, तेव्हा चोच्याने समाधीच्या पोझिशनमध्ये बसून एक डोळा उघडून सर्वाकडे कटाक्ष टाकला आणि अर्थातच चहाबरोबर भाव खाऊन गेला.