स्टे-फिट : पीनेवालों को पीने का.. Print

वृषाली मेहेंदळे , शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२

प्रश्न : मी ४१ वर्षांचा यशस्वी उद्योजक आहे. कॉलेजमध्ये असताना अनेक मैदानी खेळांमध्ये सतत भाग घेतल्यामुळे आजवर मी पूर्णपणे फिट होतो. माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं मला खूप सोशलायझिंग करावं लागतं. त्यामुळे रात्रीची जागरणं, ड्रिंक्स, नॉनव्हेज बऱ्याचदा होतं. शिवाय व्यवसायातल्या स्ट्रेसमुळे गेल्या वर्षीपासून माझी शुगर आणि बी.पी. थोडंसं वाढलंय आणि पोटही सुटलंय. माझं सोशलायझिंग तर मी टाळू शकत नाही. मग फिटनेस मेन्टेन करण्यासाठी मी काय करावं? - दिनेश ठाकूर, वरळी, मुंबई.
उत्तर : तुमचे प्रॉब्लेम्सही तुम्हाला माहित्येत आणि त्यावरचं सोल्यूशनही तुम्हीच लिहिलंय! जागरणं, ड्रिंक्स आणि नॉनव्हेज टाळून सोशलायझिंग करा आणि पहाटे उठून व्यायाम सुरू करा, तुमचे हेल्थ प्रॉब्लेम्स आपोआप कमी होतील! तुमच्यासारख्या अनेक तरुण, डायनॅमिक उद्योजकांची परिस्थिती तुमच्यासारखीच आहे. माफ करा, थोडं स्पष्टच लिहिते. तुम्ही ज्याला ‘सोशलायझिंग’ म्हणता तो प्रकार मला नेहमी ‘पीनेवालों को पीने का बहाना चाहिये’ असा वाटतो. पंकज उधासच्या ‘सबको मालूम है मैं शराबी नही, फिर भी कोई (आदमी या बहाना) पिलाए तो मैं क्या करू’ या गझलप्रमाणे सोशलायझिंगमध्ये दारू पिणं हा नेहमीच एक मुख्य हेतू असतो. स्ट्रेस आला म्हणून पिणं, धंद्यात लॉस झाला म्हणून दु:खात पिणं, कॉण्ट्रॅक्ट मिळावं म्हणून पाजणं आणि मिळालं की सेलेब्रेशनसाठी पिणं, नवीन कस्टमर्सना गटवायला पाजणं आणि त्यांच्याबरोबर कंपनी म्हणून पिणं, कधी ८-१० दिवस सोशलायझिंग झालं नाही म्हणून घरीच बसून पिणं; अशा कारणांना खरोखर अंत नाही! माझ्याजवळच्या ओळखीतले अनेक उद्योगपती, सेलेब्रिटी, सरकारी उच्चपदस्थ अधिकारी दारू आणि नॉनव्हेज न घेता भरपूर सोशलायझिंग करतात. ते रात्रीच्या बिझनेस पाटर्य़ाना जातात, पण तिथं दारूऐवजी ज्यूस पितात, काही निवडक स्नॅक्स खातात आणि भरपूर सॅलड खातात. दारू न प्यायल्यामुळे त्यांना व्यवसायात कधी अपयश आल्याचं माझ्या ऐकिवात नाही! उलट इतर लोकं दारूच्या नशेत असताना स्वत: पूर्ण शुद्धीत राहिल्यामुळे त्यांचाच अधिक फायदा होतो, हा अनुभव मात्र ते आवर्जून सांगतात!
तात्पर्य म्हणजे कोणत्याही कारणानं ‘मला पिणं भाग आहे’ ही सोईस्कर समजूत मनातून काढून टाका. एखाद्या पार्टीमध्ये दारू पिणं तुम्ही कसं बंद केलंत, पहाटे उठून व्यायाम कसा सुरू केलात, त्याचे काय काय फायदे झाले, हे इतरांना सांगा. विश्वास ठेवा, तुमची चेष्टा होणार नाही. उलट लोक खजील होतील, किमान त्या पार्टीत तरी ते ड्रिंक्स कमी घेतील आणि त्यातला एखादा तुमच्याच जिममध्ये येऊन सकाळी व्यायाम सुरू करेल. तथाकथित सोशलायझिंगच्या प्रवाहात वाहत जाऊन स्वत:चं नुकसान करून घेण्यापेक्षा तिथे तुमचं वेगळेपण इतरांना दाखवा. प्रत्येकाच्या आतमध्ये एक कॉन्शस दडलेला असतो, त्याला कुणीतरी डिवचून बाहेर काढायला लागतं. ते सत्कार्य तुम्ही करा!

प्रश्न : दिवसाकाठी पाणी किती प्यावं आणि कधी प्यावं? - अस्मिता शेळके, मालाड
alt
उत्तर : पाणी किती आणि कधी प्यावं याला नियम नाही. तहान लागेल त्या प्रत्येक वेळी आणि जितकी तहान लागेल तितकं पाणी बेलाशक प्यावं! तुमचं वजन, वय, हवामान, मेटॅबॉलिझम, तुमचा व्यायाम, तुमचा व्यवसाय, कामाची जागा, अशा अनंत बाबींवर तुमची दैनंदिन पाण्याची गरज ठरते. एक मात्र नक्की, की ज्या ज्या वेळी तहान लागेल, त्या त्या वेळी कंटाळा न करता पाणी पिणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्याला तहान लागते, पण केवळ उठून पाणी घ्यायचा कंटाळा म्हणून आपण पाणी पीत नाही. एक वेळ थोडं जास्त पाणी प्यायलं तर नुकसान काहीही होणार नाही. शरीरात जास्त झालेलं पाणी लघवीवाटे किंवा घामावाटे बाहेर टाकलं जाईल. मात्र पाणी कमी पिणं (डिहायड्रेशन) नेहमीच धोकादायक ठरतं. अजून एक सांगायचं म्हणजे रोजच बर्फ घातलेलं किंवा फ्रीजमधलं अतिथंड पाणी पिऊ नये. रूम टेम्परेचरचं पाणी पिणं सगळ्यात चांगलं.