आय. एन. टी. में कुछ तुफानी करते है Print

शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२

युथ, एनिग्मा, नॅरिट्स, किरण अशा नामांकित कॉलेज फेस्टिवल्सच्या धमाकेदार परफॉर्मन्सनंतर सर्वच कॉलेज तरुण व्यस्त आहेत ते गणपती बाप्पाच्या उत्सवात. पण अशा या वातावरणात कॉलेजमध्ये काहीतरी धावपळ दिसली तर नवल नको वाटायला, कारण सर्व फेस्टिवलचा राजा व प्रतिष्ठित असा इंडियन नॅशनल थिएटरचा (आय.एन.टी. २०१२) हा इंटर कॉलेजिएट मराठी एकांकिकेचा व कॉलेज कलाकारांचा जीव की प्राण असा हा फेस्ट जवळ येऊन ठाकलाय. या फेस्टची सुरुवात ५ ऑक्टोबरपासून चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे.  ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर प्राथमिक फेरी, १३ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर द्वितीय फेरी व १७ ऑक्टोबरला या फेस्टची अंतिम फेरी असणार आहे. भरत जाधव, केदार िशदे, सिद्धार्थ जाधव असे अनेक कलाकार या फेस्टिवलमुळे मराठी रंगभूमीला लाभले. सुमारे ५० कॉलेजेस् या एकांकिका स्पध्रेत भाग घेणार आहेत. या स्पध्रेचे वैशिष्टय़ म्हणजे दरवर्षी कॉलेजेसनी नवीन स्क्रिप्टवर एकांकिका सादर करायची असते आणि प्रत्येक कॉलेजेस्ना त्यांची एकांकिका सादर करण्यासाठी एक तासाचा अवधी देण्यात येतो.
संकलन-प्रियांका पावसकर, निशांत दप्तरदार

सुनील हरिश्चंद्र (लेखक, दिग्दर्शक)
alt
माझ्यासाठी आयएनटी जिंकणं थोडक्यात जिंकल्यानंतर मिळालेलं यश म्हणजे माणसाच्या अमर्याद सामर्थ्यांला त्याच्या तृप्त मूर्खपणाने घातलेली मर्यादा असते. सध्याच्या काळात आयएनटी स्पध्रेची  क्रेझ प्रत्येकालाच आहे. या स्पध्रेत हौशी कलाकार म्हणून काम करणाऱ्या कलाकारापासून ते सिल्वर स्क्रीनचा भाग असणाऱ्या प्रत्येकालाच आयएनटी जिवाभावाची वाटते. मी स्वत: आयएनटीचा प्रोडक्ट आहे. ९ वर्षे मी अभिनेता म्हणून या स्टेजवर काम  केलंय, आयएनटीच्या माध्यमातून मी घडलोय आणि घडतोय. गेली अनेक वर्षे आयएनटी स्पध्रेसाठी माझ्याकडून दर्जेदार लेखन, दिग्दर्शन व्हावे यासाठी मी प्रयत्नशील असतो. आयएनटीने सांस्कृतिक क्षेत्रात राबवलेली ही एक चळवळ असून ती खरोखरच गौरवास्पद आहे आणि मी या चळवळीचा एक कार्यकर्ता आहे. खंत इतकीच आहे की, मुंबईसारख्या शहरात आयएनटीचा उत्साह दिवसेंदिवस शिगेला पोहोचत असताना शहरापलीकडे म्हणजेच अर्बन विभागात मात्र दुर्दैवाने हे वातावरण अद्यापही पोहोचलेल नाही. रंगभूमीच्या चळवळीचे ज्वलंत वारे अशा भागांतही वाहू देण्यासाठी आपण साऱ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत.

पूर्वा कौशिक (कलाकार सी.एच.एम.महाविद्यालय)
आयएनटी.. अबब.. दातखिळीच बसली ना हो! कारण या स्पध्रेसाठी जिवापाड मेहनत केल्यानंतर मिळणाऱ्या यशाची व्याख्या मी करूच शकत नाही. आय अ‍ॅम स्पीचलेस. दोन वर्षांपूर्वी आयएनटीमध्ये दुसरी आलेल्या ‘वस्ती ही सस्ती’ या गाजलेल्या एकांकिकेचा मी एक भाग होते आणि त्यावर्षी मला त्या एकांकिकेतील भूमिकेसाठी पहिल्या उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला होता. आजही ते क्षण आठवले की अंगावर शहारा आल्यावाचून राहत नाही. माझ्या एकंदर आयएनटीच्या प्रवासाच्या अनुभवावरून मी असं नमूद करू इच्छिते की, अज्ञानात फार सुख असतं, पण याचा अर्थ असा नाही की अज्ञानाला गोंजारावं. आय बिलिव्ह इन फिनिक्स बर्ड.

विपुल काळे (विद्यार्थी प्रतिनिधी / कलाकार, सी.एच.एम.महाविद्यालय)
alt
आयएनटीचा मंच, त्याचा बॅक स्टेज, प्रेक्षागृह, समोर बसलेल्या परीक्षकांकडून मिळणारी दाद, विशेषत: तेथून येणाऱ्या टाळ्या, शिट्टय़ा या सगळ्याचीच मी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. यंदाही मी येथे होणाऱ्या तगडय़ा स्पध्रेचा भाग असणार. महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी पद सांभाळून तालमीसाठी वेळ देणे ही माझ्यासाठी तितकीशी अवघड गोष्ट नाही, कारण माझ्या कॉलेजचा मला पुरेसा पाठिंबा मिळतो. खरंतर आयएनटीसारख्या मानाच्या स्पध्रेत मला अभिनयाबरोबरच इतर मॅनेजमेंट स्किल्स शिकता येतात हे विशेष, शिवाय आमचं महाविद्यालय हे उल्हासनगर या मुंबईबाहेरील शहरात असूनही आमचं कॉलेज मुंबईतील इतर कॉलेजांच्या तुलनेत कधीच कमी पडलेलं नाही, उलट त्यांच्यापेक्षा पाच पावलं नेहमी पुढेच असतं आणि आमचं उदाहरण घेऊन मुंबईबाहेरील म्हणजेच ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महाविद्यालयांनी भीती न बाळगता आयएनटीसारख्या रंगमंचासाठी काम करण्याचा आस्वाद घ्यावा.

नीलेश माने (कलाकार सी.एच.एम.महाविद्यालय)
alt
खरेतर मी इंजिनीअरिंगचा  विद्यार्थी आहे, परंतु अभिनयाची आवड असल्यामुळे त्या क्षेत्रात पुढे स्थिरावण्याचे धाडसच कधी झाले नाही. मी आधीपासूनच नाटकवेडा आहे. फार सुरुवातीला आयएनटीचा गाजावाजा ऐकायचो, बघायचो; परंतु कधी प्रत्यक्ष रंगमंच अनुभवला नव्हता गेली दोन वर्षे मी अनुभवतोय की कसं आयएनटीच्या रंगमंचावर फक्त उभं राहिलं तरी आपला अभिनय आपोआपच फुलत जातो त्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. कारण रंगमंचावर असताना इतकी वर्षे एक से एक कलाकार देणाऱ्या या रंगमंचाची ही परंपरा आपल्याला चालू ठेवायची आहे ही जबाबदारी आपल्यावर असते.

चेतन गुरव (कीर्ती कॉलेज)
alt
आय.एन.टी. म्हणजे मराठी कलावंतांची जन्मभूमी. आजपर्यंत अनेक मराठी कलाकार या स्पध्रेने आपणास दिले. असाच एखादा कलाकार आपल्या कॉलेजमधूनपण घडावा यासाठी सर्वच कॉलेजची धावपळ सुरू आहे. एखाद्या लग्नघरात जशी तयारी सुरू असते तशीच काहीशी स्थिती ही कॉलेजच्या कलाकारांची असते. या स्पध्रेसाठी दिग्दर्शक व सगळेच कलाकार जोरदार मेहनत घेत आहेत. सो या आय.एन.टी.ला काहीतरी तुफानी करण्यासाठी आम्ही तयार आहोत.

गणेश ढोलम
(एम.डी.कॉलेज)
alt
आय.एन.टी. म्हणजे मराठी कलावंताला त्याची कला दाखवण्यासाठी मिळालेली एक सुवर्णसंधी. गेली कित्येक वर्षे आय.एन.टी. स्पध्रेतून मराठी कलावंत घडत आला आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या कॉलेजमधील भरत जाधव. यंदा आय.एन.टी.साठी दोन ते तीन महिन्याआधीपासूनच सराव सुरू झाला आहे. यंदाही जास्तीतजास्त चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी
आमचे कॉलेज तयार आहे.

सिद्धेश परब
(कलाकार महर्षी दयानंद महाविद्यालय)
alt
कॉलेजच्या पहिल्या वर्षांतच शिकत असताना एम.डी.ने गाजवलेली ब्लॉकबस्टर एकांकिका ‘गिरगाव व्हाया दादर’ माझ्या पदरी पडली. आयएनटीतून नक्कीच व्यावसायिक रंगभूमी गाठणं लवकर शक्य होतं. यासाठी मी प्रत्येक नाटकप्रेमीसाठी उत्तम उदाहरण आहे. माझी ही एकांकिका आता व्यावसायिक नाटकाच्या रूपातही गाजते आहे. गिरगाव करत असतानाच मला ‘खळ खटॅक’ नाटकात काम करण्याची ऑफर आली हे कसं सोनेपे सुहागा होतं. इतकं सगळं मनासारखं होऊनसुद्धा आयएनटीची ओढ अद्यापही कमी झालेली नाही. त्यामुळे यंदाही आयएनटीत तुम्ही मला नक्कीच पाहाल.

रोहित माने (कीर्ती कॉलेज)
alt
आय.एन.टी. स्पर्धा म्हणजे इंटर कॉलेजिएट एकांकिकेचा जणूकाही वर्ल्डकपच आहे. सुमारे ५० कॉलेजेस् या स्पध्रेत सहभागी होतात. स्पर्धा जरी ऑक्टोबरमध्ये असली तरी सगळेच कॉलेजेस् २ ते ३ महिन्यांआधीच तयारी सुरू करतात. मी गेली तीन वष्रे आय.एन.टी. स्पर्धा करतो आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळे अनुभव आले. पण अनुभव घ्यायला मिळाले हे महत्त्वाचे. या वर्षीसुद्धा असाच अनुभव घेण्यासाठी व जोरदार परफॉर्मन्स देण्यासाठी आमचे कीर्ती कॉलेज सज्ज झाले आहे.

अनिकेत पाटील (दिग्दर्शक)
alt
आयएनटी जिंकणं म्हणजे आमची सवय आणि पेशन. खरंतर आयएनटी एकांकिका आणि रुइया यांचा नजीकचा संबंध आहे. आजवर रुइयाने आयएनटीचा रंगमंच गाजवून अनेक गुणी कलाकार व्यावसायिक रंगभूमीला मिळवून दिले. ही आमची परंपरा आहे आणि आम्ही ती चालू ठेवणारच. गेले काही वष्रे स्पध्रेच्या चौकटीतून बाहेर राहिल्याचा टोला अनेकांकडून लगावला जातो, परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते ही थोरा मोठय़ांनी दिलेली शिकवण आम्ही लक्षात ठेवून सकारात्मक वृत्तीने प्रयत्नशील आहोत, पण चार वर्षांनंतर या वर्षी रुइयाचा कम बॅक होणार हे नक्की. प्रत्येक डाऊन फॉलनंतर पुन्हा अप येतोच आणि आमचा चढता क्रम आता सुरू झालाय हे शंभर टक्के खरंय..

रामचंद्र गावकर (कलाकार, रुईया महाविद्यालय)
alt
आयएनटी स्पध्रेतून आजवर मला बरंच काही शिकायला मिळालंय. केवळ अभिनयच नाही, तर  प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्य एकांकिकेला उभारणाऱ्या या सगळ्या गोष्टी मी शिकलोय. कारण व्यावसायिक नाटकांप्रमाणे इथे कुणी सेट डिझायनर हायर करून नेपथ्य उभारलं जात नाही, तर यापाठी एकांकिकेचा भाग असणाऱ्या प्रत्येकाची मेहनत असते आणि आयएनटी या प्रत्येक गोष्टीची दखल घेते हे त्याचं कौतुकच आहे. या स्पध्रेचा उंचावलेला दर्जा लक्षात घेऊन एकांकिकेमार्फत दरवर्षी दर्जेदार प्रोडक्ट प्रेक्षकांना देण्याचा आमचा मानस असतो.

राम दौंड (लेखक, दिग्दर्शक)
alt
आयएनटी जिंकणे म्हणजे नाटकप्रेमी तरुणांसाठी ‘स्वप्नपूर्तीच’. रंगभूमीशी ऐन तारुण्यात नातं जोडताना, रंगभूमीचं अवकाश नीटसं समजून घेण्याच्या प्रक्रियेतच आयएनटीसारख्या प्रतिष्ठित सन्मानाचे मानकरी होणे हे कोणत्याही कलाकाराने वर्षांनुवष्रे  बघत आलेलं गोड स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच नाही का! उत्तमोत्तम विषय, त्यांचे आयाम, त्यांची हाताळणी, त्यामागचं तंत्र, प्रकाशयोजना सोबत चाबूक अभिनयाची जोड हे आयएनटी एकांकिका स्पर्धाचे वैशिष्टय़. या सगळ्यांतून प्रेक्षकांना जणू बौद्धिक खाद्याची मेजवानीच मिळत असते आणि यातूनच घडतोय उत्तम कलाकार. खरंतर शिक्षण क्षेत्रातल्या आणि सामाजिक जीवनातल्या आव्हानांना तोंड देत हे कलाप्रेमी लेखनाच्या आणि दिग्दर्शनाच्या कलेमध्ये नवीन विचारांचा धागा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नाटक आणि रंगभूमीचा एकमेव पाया मानल्या जाणाऱ्या एकांकिका आयएनटीच्या रंगमंचामार्फत उभरत्या कलाकारांना यशाचा मार्ग मोकळा करण्यासाठी लाभदायक ठरतील यात काही शंकाच नाही.

गौरव मालणकर  (कलाकार सी.एच.एम.महाविद्यालय)
alt
आयएनटीची डेट जवळ येताच संहिता, पात्रांची निवड, नेपथ्य वगरे गोष्टींची जय्यत तयारी सुरू होते. तालीम हा एकांकिका जिंकवण्यामागचा सगळ्यात मोठा फंडा असतो. तालमीला पुरेपूर न्याय दिला तर ऐन प्रयोगाच्या वेळी कुठल्याच अडचणी येत नाहीत. आम्हा साऱ्या कलाकारांसोबतच उत्तम तालीम करून घेण्याची जबाबदारी ही आमच्या दिग्दर्शकाची असते आणि तो त्याची ही जबाबदारी चोखपणे पारही पाडतो. अनेकदा आमच्या दिग्दर्शकाने प्लॅन केलेल्या तालमी या एनएसडीच्या म्हणजेच ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ येथे रंगत असलेल्या तालमींसारख्या रंगतात. एनएसडीमधील तालमींची शैली आजवर ऐकून होतो; परंतु दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनामुळे ती अनुभवता येतेय. आयएनटीसारख्या स्पध्रेसाठी अशा तालमी प्रत्येकानेच रंगवल्या, तर यश प्रत्येकाच्याच पाठी धावेल.

रोहित जाधव (रुपारेल कॉलेज)
आय.एन.टी. म्हणजे सर्वच फेस्टिवल्सचा बाप. असा हा एकांकिकेचा फेस्ट आहे. सर्वच कॉलेजचे लक्ष या फेस्टकडे लागले आहे. आमचे कॉलेजही यंदा या स्पध्रेसाठी जोरदार तयारी करत आहे. पडद्यामागे काम करणारी मुले असोत वा अभिनेता सर्वच रात्रंदिवस सराव करत आहेत. यंदा जास्तीतजास्त बक्षिसे मिळविण्यासाठी आमचे कॉलेज सज्ज झालेले आहे.

रामचंद्र वरक
(डेप्युटी डिरेक्टर- इंडियन नॅशनल थिएटर)
alt
आयएनटी स्पर्धा जिंकणं म्हणजे खरोखरच प्रत्येक तरुणासाठी रंगमंचीय चळवळ जिंकण्यासारखंच. यंदा आयएनटी एकांकिका स्पर्धा ४१व्या वर्षांत पदार्पण करतेय. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी सहभागी होणाऱ्या महाविद्यालयांचा आकडा वाढलाय ही संस्थेच्या आणि आयएनटी रंगमंचाच्या उत्तम कारकीर्दीची पोचपावतीच मी मानतो.रंगभूमीकडे आत्मीयतेने बघणाऱ्या, त्याच्यासाठी झटणाऱ्या प्रत्येकासाठीच आयएनटीची स्पर्धा एक हवीहवीशी गोष्ट, एक पायरी, एक प्रमोशन आणि एक अधिकारच आहे. स्पध्रेदरम्यान विद्यार्थ्यांतर्फे होणारे सादरीकरण, त्यांच्यातील उत्साह  वाह, क्या बात है..! अशी दाद घेतल्याशिवाय राहत नाही हा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. युवा कलावंतातील हा आवश्यक उन्माद वाया जाऊ नये याची मी आणि संस्था नेहमीच खबरदारी घेऊ. सांस्कृतिक चळवळ गाजवणारी, कलावंतानाच नव्हे तर रंगभूमीलाही सर्वार्थाने पुढे नेणारी यंदाची आयएनटी स्पर्धा आपण सारेजण उत्साहात आणि जोमाने साजरी करू.

ओंकार राऊत (दिग्दर्शक)
alt
आयएनटी जिंकणे म्हणजे माझ्यासाठी ऑस्कर जिंकण्यासारखे आहे. खरेतर मी चुकून झालेला डिरेक्टर आहे. बॅक स्टेजपासून अभिनय आणि मग डिरेक्शनपर्यंतचा माझा प्रवास फारच रोमांचक होत गेल्याचे मला वाटते. २०१० साली ‘एटीनतील आय डाय’ ही मी लिहिलेली, दिग्दíशत केलेली शिवाय अभिनय केलेली एकांकिका सवाईला दुसरी आली होती. तो माझा करिअरमधील टìनग पॉइंट ठरला. त्यानंतर आयएनटीमधील कट ऑफ, संगीत कोणे एके काळी या माझ्या एकांकिका खूप गाजल्या. रीअ‍ॅलिस्टिक बेस्ड नाटक करण्याला माझी विशेष पसंती असते. यंदाही अशाच रंगाढंगाची एकांकिका मी महर्षी महाविद्यालयासाठी दिग्दíशत करतोय. एम. डी. कॉलेज पहिल्यांदाच रीअ‍ॅलिस्टिक बेस्ड नाटक करत असल्यामुळे यंदा माझ्यावर दिग्दर्शनाची मोठी जबाबदारी आहे, शिवाय मुलेही नवीन असल्यामुळे त्यांच्याकडून उत्तमोत्तम प्रोडक्ट तयार करून घेणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान असणार. आयएनटीमध्ये जिंकून स्वत:ला प्रूव्ह करण्यासाठी मिळालेल्या संधीचे मला सोने करायचेय.

मिताली मयेकर
alt
(कलाकार, रुईया महाविद्यालय)

रुईयाच्या नाटय़वलय विभागात प्रवेश घ्यावा हे माझे शाळेत असल्यापासूनचे स्वप्न, पण हे स्वप्न आता फक्त स्वप्न राहिले नसून मी प्रत्यक्षात ते अनुभवतेय. या वर्षी पहिल्यांदाच आयएनटी काय असते हे मी अनुभवणार आहे. पहिल्यांदाच आणि तेही आयएनटी रुईयातून करायला मिळणार हे मी माझे भाग्य समजते. ही तर सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या.. आज मॉबमध्ये दिसून येणारी मी काही वर्षांतच स्टेज गाजवायला कमी करणार नाही, कारण जस्ट वेट एंड वॉच हा आमच्या नाटय़वलय विभागाचा फंडा आहे. बघा, शिका आणि मग स्वत:ला प्रूव्ह करा असं केल्याने आयएनटी चषक गाठणं मला तरी कधीच कठीण वाटणार नाही.

संजय जामखंडी (कलाकार रुईया महाविद्यालय)
alt
चार वर्षांपूर्वी आमच्या ‘मुक्तिधाम’ एकांकिकेने आयएनटी गाजवली. मी यंदाच्या वर्षी मात्र मी आयएनटीचा लीड अभिनेता म्हणून काम करत आहे. त्यामुळे या वर्षी माझी जबाबदारी दुप्पट वाढली आहे. यंदा स्वत:ला सिद्ध तर करायचं, शिवाय चोख सादरीकरणातून कॉलेजची मान मानाने उंचवायची आहे. इतर स्पर्धकांना तोडीस तोड उत्तर देऊन पुन्हा एकदा रुईयाच्या शिरपेचात आयएनटीचा झेंडा रोवायचाय.

प्रियांका कारेकर
alt
(कलाकार महर्षी दयानंद महाविद्यालय)

 यंदा मी कॉलेजच्या तिसऱ्या वर्षांला आहे. त्यामुळे अभ्यासाचं दडपण आहेच, परंतु आयएनटी के लिए कूछ भी यार.. मला अभिनय क्षेत्रातच पुढे करिअर करायचंय त्यामुळे आयएनटी माझ्यासाठी खूपच महत्त्वाची असल्याचे मी मानते. अभ्यास महत्त्वाचा आहेच, परंतु सध्या तरी एकांकिकेसाठी खूप मेहनत घेऊन दरवर्षीप्रमाणे कॉलेजचे नाव पुन्हा एकदा आयएनटीत झळकवायचं. यात केवळ आमचा स्वार्थी भाव नसून हे कॉलेजबद्दलचे प्रेम आणि ती आमची नतिक जबाबदारी असल्याचे आम्ही मानतो आणि यात महाविद्यालयाबरोबरच घरातल्यांचाही मोठा पाठिंबा मला मिळतो.

वीरेन परब
(विद्यार्थी प्रतिनिधी / कलाकार, महर्षी दयानंद महाविद्यालय)
alt
गेली अनेक वर्षे मी एम.डी.चा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून नाटक विभागाचे काम पाहत आहे. आयएनटीसारख्या मोठा दर्जा असलेल्या स्पध्रेत टिकण्यासाठी एकांकिकेचा सादरीकरणाच्या दृष्टीने दर्जाही उंचवावा लागतो. कारण या स्पर्धात्मक चळवळीत टिकून राहणं वाटतं तितकं  सोप्पं नक्कीच नसतं. नेपथ्य, संगीत, तंत्रज्ञ वगरे गोष्टींसाठी लागणारा खर्च कॉलेज पुरवत असला तरीही तो कमीच पडतो. त्यासाठी कॉलेजलाही मर्यादा येतात हे आम्ही जाणतो. मग अशा वेळी अनेकदा बाहेरून फंडद्वारे पसे जमवावे लागतात. याव्यतिरिक्त सध्या रुपेरी पडदा गाजवणारी अनेक मंडळी ज्यांना आयएनटीच्या मंचाने खूप काही देऊ केलं ती सदैव आम्हाला आíथक मदत करत असतात.

ईशा वडनेरकर (कलाकार, रुईया महाविद्यालय)
alt
अभिनयात करिअर करायचं असेल तर स्वत:ला प्रूव्ह करण्यासाठी आयएनटी शिवाय दुसरी यशाची किल्ली कोणती असूच शकत नाही. व्यावसायिक रंगभूमी गाठण्यासाठी आयएनटी ही पहिली पायरीच असते असं म्हणायला हरकत नाही, कारण आपण सादर केलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपल्या तरुण मित्रांसोबत कित्येक रुपेरी पडद्यावरील नटांचीही तिथे हजेरी लागते. आपला अभिनय त्यांना आवडला, तर अनेकांकडून अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होतात. ‘लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया..’ या गाण्याची प्रचीती आयएनटी अनुभवणाऱ्या प्रत्येकालाच जाणवत असेल यात तिळमात्र शंका नाही.