मी मराठमोळी राणी... Print

शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२

नथ, बांगडय़ा, नऊवारी या दागिन्यांचं आकर्षण तिला फार पूर्वीपासूनच होतं. शाळेत फॅन्सी ड्रेस असला की नऊवारी नेसण्याची तिची धडपड म्हणजे एक इव्हेंटच असायचा. सध्या तिला नऊवारीत पाहून अनेकजण अय्या असं म्हणू लागलेत.. नऊवारीचा नखरा आणि मराठी मुलीचा रोल करताना आलेल्या गमती-जमती सांगत्येय राणी मुखर्जी
शब्दांकन: प्रभा कुडके
अय्या या चित्रपटाने मला काय दिलं तर उत्तम कलाकारांबरोबर काम करण्याची संधी आणि खूप काही.. मुख्य म्हणजे माझी नऊवारी नेसण्याची इच्छा या चित्रपटानेच पूर्ण केली. हातात हिरव्या बांगडय़ा, नाकात नथ, केसात माळलेला गजरा या गोष्टींची ओढ मला लहानपणापासूनच होती. खास मराठमोळी साडी नेसून मला मिरवता आलेलं आहे. चित्रपटाची कथा एका मराठी मुलीभोवती गुंफलेली असल्यामुळे ती कथा ऐकताच मी सर्वात आधी हो म्हटलं. त्यानंतर मला यामध्ये नऊवारी नेसायची आहे हे ऐकल्यावर तर माझं स्वप्नच पूर्ण झाल्यासारखे वाटू लागलं होतं. हे स्वप्न अखेर अय्याच्या माध्यमातून ते पूर्ण होतंय.
नऊवारी साडीवर तयार होण्यासाठी मला किती वेळ लागला? हा प्रश्न मला खूपदा विचारला गेलाय. पण अगदी मनापासून सांगू तर मला खूप वेळ नाही लागला. मला ही साडी नेसण्यासाठी आणि त्यावर मराठमोळा मेकअप करण्यासाठी इतर अ‍ॅक्ट्रेसेसपेक्षा खूपच कमी वेळ लागला. मराठमोळ्या दागिन्यांची ओळख मला याआधी असल्यामुळे दागिन्यांच्या निवडीपासून मी लक्ष देत होते. या दागिन्यांमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नथ. नथ, हातातील तोडे, कपाळावरील चंद्रकोर, झुमके अशा सर्व गोष्टी मी अगदी निरखून आहेत की नाही हे पाहिलं होतं. आता इतकं सर्व ऐकून झाल्यावर तुमच्या डोक्यात एक प्रश्न घोळतोय तो म्हणजे मला मराठी येतं का.. तर हो.. पण अगदी थोडं थोडं.. म्हणजे तुझं नाव काय असं कुणी विचारलं तर त्याचं उत्तर देता येतं. शिवाय अगदी कामापुरतं मराठी नक्कीच बोलता येतं. माझ्याबरोबरच्या सहकलाकारांमुळे माझं मराठी बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे. याचं सर्व श्रेय मी माझ्या सहकलाकारांना देते.