डिक्टो गुजराती.. Print

प्रियांका पावसकर, शुक्रवार , १२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

नवरात्रोत्सवाची चाहूल लागताच गरबा-दांडियाची तयारी सुरू होते. याच काळात ‘गरबा-दांडिया’ शिकवणारे काही हंगामी क्लासेसही सुरू होतात.‘पंखीडा..’, ‘ढोलीडा..’अशा गाण्यांचा आवाज, मोठमोठे ऑर्केस्ट्रा सोबत खास गुजराती पद्धतीच्या पेहरावाला अधिक खुलवतो तो म्हणजे पारंपरिक नृत्य प्रकारांनी नटलेला गरबा.. आणि असाच हा तालांच्या अद्भुत किमयेचा आविष्कार असणारा ‘गरबा-दांडिया’ शिकण्यासाठी गरबाप्रेमी ‘डिक्टो गुजराती’ स्टाइलचा गरबा शिकवणाऱ्या क्लासेसमध्ये गर्दी करू लागले आहेत.
नवरात्र म्हटलं की, ‘गरबा-दांडिया’चा रंग खऱ्या अर्थानं चढू लागतो. या रंगात न्हाऊन निघण्याचा मोह लहानांपासून-मोठय़ांपर्यंत कुणालाही काही केल्या आवरत नाही. मूळचा गुजरातचा असणारा हा ‘गरबा-दांडिया’आता महाराष्ट्रातही चांगलाच रुजला आहे. गुजरातमध्ये असलेल्या या सणाचं अत्याधुनिक स्वरूप आपल्याकडे पाहायला मिळत असलं तरीही नवरात्रीची खरी लज्जत गुजरातमध्ये अजूनही टिकून आहे. विशेष म्हणजे आता त्याची पाळंमुळं महाराष्ट्राच्या मातीतही रुजत आहेत.
     मराठी असलो तरीही मुंबईत सगळ्यांना ‘गरबा-दांडिया’ खेळायची भारी हौस असते. पण डिक्टो गुजराथी स्टाइलने ‘गरबा-दांडिया’ खेळायचं म्हणजे झाली ना पंचाईत. एकटं-दुकटं गेलं तर पचका होणारच. ‘बट नॉट टु वरी..’ नवरात्रामध्ये गुजराती स्टाइलने ‘गरबा-दांडिया’ खेळून इम्प्रेशन जमवायचं असेल तर डिक्टो गुजराथी ‘गरबा-दांडिया’ शिकवणाऱ्या खाजगी क्लासेसशिवाय दुसरा पर्याय नाही.अशाच या क्लासेसच्या मदतीने गेली अनेक र्वष मुंबईतील तरुणांना गुजराती ठेक्यांचा फिल असणाऱ्या पारंपरिक दांडियाच्या वेडानं मंत्रमुग्ध केलं आहे. चतन्यानं ओसंडून वाहणाऱ्या अशा या    गुज्जू दांडियात तरुणाईचा सहभाग मोठा आहे. प्रत्येक वर्षी पारंपरिक ‘गरबा-दांडिया’च्या रंगात रंगून जाण्यासाठी, नवनवीन गरब्याचे प्रकार शिकण्यासाठी ही तरुण पिढी आतुर झालेली असते.
     घटस्थापनेच्या महिनाभर तर काही ठिकाणी पंधरा दिवस आधी विविध प्रकारचे डान्स शिकवणाऱ्या खाजगी क्लासेसमार्फत ‘गरबा-दांडिया’साठी शिबीर तसेच वर्क शॉप्स घेऊन ट्रेडिशनल नृत्याचा बाज असणाऱ्या गुजराती गरब्याचं मार्गदर्शन दिलं जात. जसं गरबा खेळताना अनेक गोष्टी लक्षात घेण्यासारख्या असतात. गरब्याच्या भोवती अनेक रिंगण असतात. जो जितक्या वेगाने रिंगणात खेळू शकेल तो त्या रिंगणात उभा असतो जर आपल्याला त्या रिंगणातील वेगानुसार खेळता येत नसेल तर रिंगणही बिघडते आणि इतरांचा खेळही बिघडतो. म्हणून जसजसा गरबा खेळण्यातील वेग आणि तालबद्धता वाढत जाते तसतसे आपले रिंगण बदलत जाते. खेळताना परस्परांना सांभाळून घेत लयीला साद घालणारा हा खेळ असल्याचं मार्गदर्शन सुरुवातीला क्लासेसमार्फत दिलं जात. याव्यतिरिक्त ‘गरबा-दांडिया’चे विविध प्रकार या शिबिरांमध्ये शिकवले जातात. हाताने खेळल्या जाणाऱ्या पोपट, मोर, देढिया, गामठी या गरब्याच्या प्रकारांसोबत गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्र या भागांत
खेळल्या जाणाऱ्या रासचे विविध प्रकार म्हणजेच दांडा रास, मंडला रास, लता रास येथे प्रशिक्षणादरम्यान शिकवले जातात. सोबतच गरब्याचाच भाग असणारी
लोकनृत्य टिप्पणी, हल्लीसका, डांगी नृत्य, हुडो, ढोली नृत्य, मुतुकडी, मंजिरा किंवा पधार नृत्य येथे मुलांकडून विशेष
मेहनत घेऊन प्रशिक्षिकांमार्फत शिकवली जातात. सध्या तरुणाईमध्ये विशेष पसंती दर्शवणारा फिल्मी गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरणारा ‘मॉडर्न गरबा’, याशिवाय सरळ दांडी, उलटी दांडी,चार दांडी, आठ दांडी, बारा दांडी, धमाल दांडी या दांडियाच्या विविध प्रकारांसोबत ‘फोक’ दांडिया डान्स, ‘साल्सा’ दांडिया डान्स, पल्ली जग गरबो, गोप रास वगरे दांडिया नृत्याचे प्रकार येथे आलेल्या गरबा प्रेमींना शिकवले जातात. गरबा नृत्याला अधिक फुलवणाऱ्या पेहरावाबाबतही या शिबिरांमध्ये चोख मार्गदर्शन केले जाते. गरबा-दांडिया खेळतानाचा पेहराव कसा असावा, तो कसा परिधान करावा इथपासून ते त्या पेहरावाच्या रंगापर्यंत अचूक मार्गदर्शन मुलांना दिलं जातं. चनिया चोळी, ओढणी किंवा दुपट्टा असा कॉमन पेहराव तर गुजराती परंपरेपासून चालत आलेला कमखा, सोबत घालावयाचा चुडा, तर पुरुषांसाठी केडिया आणि त्यावर घालायच्या लेदर ने बनवलेल्या मोजडी याबाबतही पुरेपूर मार्गदर्शन केलं जातं. ‘गरबा-दांडिया’ शिकवणाऱ्या या क्लासेसमध्ये ४ वर्षांपासून ते अगदी ७५ र्वष वयोगटापर्यंत गरबाप्रेमी हौसेने प्रवेश घेतात. गरबा शिकवणाऱ्या या क्लासेसमध्ये तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी १२०० रुपये, ७ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी ३५० रुपये, तर काही ठिकाणी आठवडाभरासाठी लहान मुलांचे ७५० रुपये, मिडल एज ग्रुपसाठी ९५० रुपये तर ज्येष्ठ बायकांसाठी ११५० रुपये इतकी फीज घेतली जाते. दिवसेंदिवस ‘गरबा-दांडियाचं’ तरूणाईतील वाढतं क्रेझ यामुळे त्याचा मोठा प्रसार होत आहे.केवळ शहरांमध्येच त्याच प्रस्थ आहे असं नाही तर गावांमध्येही यास तितकाच चांगला प्रतिसाद मिळतोय अर्थात शहरांमध्ये त्याला आता व्यावसायिक रूप प्राप्त झालं असून आधुनिकतेची जोडही त्यास मिळत आहे. आज जिकडे तिकडे मोठ्या मदानावर गरबा-दांडिया रंगलेला दिसतो. तो काही ठिकाणी सर्वासाठी खुला तर काही ठिकाणी असा दांडिया रंगतो जिथे सर्वाना मुक्त प्रवेश नसतो. अनेकदा मोठ मोठ्या हॉटेल्स मध्ये, ग्राउंड्सवर बाहेरील ग्रुप्स ना बोलावून गरबा अरेंज केलेला असतो. मुंबईमध्ये गरब्यासाठी ऑर्गनायजर आहेत. सेलिब्रिटीजनाही येथे नेहमीच बोलावले जाते मात्र असे ग्लॅमरस गरबेही पारंपरिकता टिकून आहेत. इथे नऊ दिवसांच्या जोरदार गरब्यासाठी मोठाली प्राइजेस यांचीही रेलचेल असते अशा स्पर्धात्मक दांडियात सहभागी होण्यासाठीही गरबाप्रेमी खाजगी क्लासेस मधून प्रशिक्षण घेत असतात. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रामध्ये गरबा शिकलेल्या किंवा न शिकलेल्यांच शरीरही गाण्यातील सूर, ताल, लय यावर नकळत ठेका धरू लागेल. तरुणाईला दांडियाची धुंदी चढलेली दिसेल त्यामध्ये डिक्टो गुजराथी दांडियाचा येणारा तालबद्ध निनाद गरबाप्रेमींना आणखीनच मोहित करू लागेल. हाती टिपऱ्या घेऊन समोरच्याच्या टिपरीवर त्याचा नाद करीत लहानांपासून जेष्ठांपर्यंत प्रत्येकाची पावलं आपसूक तालात घुमायला लागतील आणि पुन्हा दुसऱ्या सायंकाळच्या गरब्यासाठी आतुर होतील.तालांच्या या बेधुंद अविष्कारात नऊ रात्री केव्हा संपतील याचा पत्ताही लागणार नाही. गरबा-दांडिया बद्दल आणखी खूप काही जाणण्यासारखं आहे. पण हे सगळं अनुभवायचं असेल तर गरबा शिकल्याशिवाय तो खेळल्याशिवाय या सगळ्याला कोरडेपणाच आल्यासारखा वाटेल. मग विचार कसला करताय ! गुजराती गरबा शिका आणि बिनधास्त गरबा खेळायला चला.

कौमी शाह
(नृत्य दिग्दर्शक ‘कौमी डान्स अकॅडेमी’ - ठाणे )
alt
पूर्वी गुजरात, राजस्थान सीमेजवळील विशिष्ट समाजातील लोक घराच्या अंगणाच्या मधोमध गरबा ठेवून आजूबाजूला गोल रिंगणात सर्व मंडळी बसून गरबा गायचे. हा होता मूळ स्वरूपातील गरबा. कालांतराने हळूहळू यात बदल होत गेला. त्यानंतर विशिष्ट चाळीत तालबद्ध अशा गीतांवर लोक ठेका धरायचे आणि कोणत्याही साधनांशिवाय गोल फेर धरून हातानेच गरबा खेळायचे. सध्या खेळला जाणारा गरबा त्याचेच काळानुरूप बदलत जाणारे स्वरूप आहे. शास्त्रीय नृत्यात माझा हातखंडा असला तरी गेले ७ वर्षे मी ४ ते ७५ वर्षांपर्यंतच्या प्रत्येकालाच ‘गरबा-दांडिया’ शिकवते. माझ्या क्लासेसमध्ये गरबा ट्रेनिंगसाठी येणाऱ्यांमध्ये अधिकाधिक स्त्रियांचा समावेश आहे. माताजी का गरबा, दोडूयु, पोपट, मोर असे गुजराती ठेक्याची झालर असलेले मी शिकवणाऱ्या गरबा नृत्यापकी काही विशेष प्रकार आहेत.

योगेश पाटकर
(नृत्य दिग्दर्शक ‘पेस मेकर्स डान्स अकॅडेमी’- डोंबिवली)
alt
नवरात्रातील ‘गरबा-दांडिया’ तरुणाईतील विशेष पसंती दर्शवणारा सण. दिवसेंदिवस नृत्य प्रकाराचं क्रेझ वाढत चाललंय. शहरांमध्ये त्याला आता व्यावसायिक रूप प्राप्त झालं असून, आधुनिकतेची जोडही त्यास मिळत आहे. केवळ नवरात्रासाठी नाही तर हे गरबाप्रेमी सध्या झोकात असणाऱ्या निरनिराळ्या डान्स रिअ‍ॅलिटी शोजसाठी गरबा बसवून घेण्यासाठी माझ्या क्लासमध्ये येत असतात. मी स्वत: ‘डान्स के सुपरस्टार’ (डी.आय.डी- सीझन वन) या रिअ‍ॅलिटी शोचा प्रोडक्ट आहे. मी तिथे अनेक प्रकारांत गुंफलेल्या नृत्याचे दिग्दर्शन केल्यामुळे रिअ‍ॅलिटी शोजसाठी गरबा किंवा इतर नृत्याचा दर्जा काय असावा हे चोख जाणतो आणि माझ्या विद्यार्थ्यांला नृत्यात तितकाच चोख घडवत असतो. मी दरवर्षी नवरात्र येण्यापूर्वी आठवडाभर ‘गरबा-दांडिया’चे वर्कशॉप्स घेतो. त्यात ट्रेडिशनल आणि मॉडर्न गरबा नृत्यासाठी गरबाप्रेमींना ट्रेन केलं जातं. शिवाय गरबा खेळण्यासाठी खास गुजराती पद्धतीचा पेहराव कसा असावा, याबाबतही विशेष मार्गदर्शन दिलं जातं. काळवेळच भान विसरायला लावणारा ‘गरबा’ आणि ‘दांडिया’ तपरुणाईच्या नसानसात भिनला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

शरद घागरे
(नृत्य दिग्दर्शक ‘डान्स अकॅडेमी’- भांडुप)
alt
‘दांडिया’ गुजरातची संस्कृती परंतु महाराष्ट्रातही या नृत्य प्रकाराचं तरुणाईतील पॅशन न वाढताना दिसतंय. आमच्याकडे गणेशोत्सव संपताच नवरात्रीसाठी गरबा शिकण्यासाठी गरबाप्रेमींच्या रांगा लागतात. माझ्याकडे गरबा अथवा इतर कुठल्याही प्रकारचा डान्स शिकायला येणाऱ्या प्रत्येकालाच नृत्यातून उत्तमोत्तम घडवणं हे मी माझ कर्तव्य समजतो. मराठी दांडियाची मजा काही न्यारीच असते. तेव्हा ‘गरबा-दांडिया’ शिकवताना दांडिया हातात धरून एकामागोमाग एक गिरकी घेण्यासाठी ‘हिची चाल तुरूतुरू..’, ‘सुपारी फुटली..’, ‘वसईचा नाका..’ वगरे सुपरहिट मराठी गाण्यांचा ठेका मी वापरतो. विशेष म्हणजे नऊवार किंवा धोतर नेसून सराईतपणे ‘गरबा-दांडिया’चे मूड कॅच करता येतात, कारण माझ्या मते कोणत्याही नाचाला साजेशी अशी ऊर्जा मराठी संगीतामध्ये आहेच. मालवणी, भारुड अशा लोकगीतांमध्ये इतकी जादू आहे की, गर्दीला तासन्तास एका जागी होल्ड करून ठेवता येतं.

भाविका धरोड  
नृत्य दिग्दर्शक ‘भाविन्स डान्स अकॅडेमी’, ठाणे
alt
भारतीय संस्कृतीत उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्सवाच्या निमित्ताने मरगळलेल्या, ताणतणावात जगणाऱ्या मनाला ताजेपणा मिळतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे काही दिवसांवर येऊन ठेपलेला ‘नवरात्राचा सण’. गरब्याच्या निमित्ताने का होईना खेळल्यानंतर शरीराला आवश्यक अशी ऊर्जा मिळते, शिवाय गरब्यासाठी महिनाभर आधी लावले जाणारे क्लासेस खेळणाऱ्यांना शारीरिकदृष्टय़ा फिट राहण्यासाठी शिवाय वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडतात. माझ्या क्लासेसमध्ये गरबा शिकण्यासाठी १० ते ६० वयोमर्यादेपर्यंत गरबाप्रेमी येऊ शकतात. १२ दिवसांच्या गरबा वर्कशॉपमध्ये गरबा शिकवताना तरुणांना अधिक आवडणाऱ्या ‘पोपट’ तर ज्येष्ठांना नाचण्यासाठी सोयीस्कर पडणाऱ्या ’मुतुकडी’ आणि ‘हिच’ हे टिपिकल गुजराती गरबा प्रकार शिकवण्यात माझा भर अधिक असतो. क्लासमध्ये कॅसेटवर ‘सनेडो..’, ‘परी हु मैं..’ ही गाणी वाजू लागली किंवा दांडियाची धून घुमू लागली, की तरुणांची पावलं थिरकतात आणि गरबा शिकण्याचा उत्स्फूर्त आनंदही ते लुटतात.