सबसे हटकर.. जोशी-बेडेकर Print

अभिराम भडकमकर, शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
(समकालीन नाटककार)
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पध्रेचा विषयसूचक आणि परीक्षक म्हणून स्पध्रेतील एकांकिकांचं निरीक्षण करताना एक जाणवल की ‘विराम’ हा घटकच सध्याच्या एकांकिकांमधून लोप पावतो आहे. रंगमंचावर सादर होणाऱ्या दृश्यचौकटीतला अर्थ हा शब्दांपेक्षा महत्त्वाचा असतो, हा अर्थ अधोरेखित करताना शब्दांइतकाच महत्त्वाचा ‘विराम’ हा घटकच सध्याच्या एकांकिकांमधून लोप पावतो आहे आणि त्यामुळेच नेमके काय सांगायचे आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात सध्याच्या एकांकिका कमी पडत आहेत. त्यातल्या त्यात संगीत, प्रकाशयोजना आणि नेपथ्याच्या सादरीकरणात अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या प्रत्येक स्पर्धकाने केलेली नावीन्यपूर्ण कामगिरी ही खरोखरच कौतुकास्पद आहे.उदाहरण घेऊन मुंबईबाहेरील म्हणजेच ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महाविद्यालयांनी भीती न बाळगता आयएनटीसारख्या रंगमंचासाठी काम करण्याचा आस्वाद घ्यावा.

रवी मिश्रा (संस्थापक- अस्तित्व संस्था)
alt
एकाच कल्पनेवर आधारित वैविध्यपूर्ण सादरीकरण असलेल्या एकांकिका दरवर्षीप्रमाणे यंदाच्या स्पध्रेचंही वैशिष्टय़ ठरल्या. वैशिष्टय़पूर्ण लेखन ही या स्पध्रेची सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे. मुळात ही लेखकांची स्पर्धा आहे. दिलेल्या कल्पनेशी लेखक कसे खेळ करतो आणि ती एकांकिका कल्पनेकडे कशी घेऊन जातो याची प्रात्यक्षिके स्पध्रेदरम्यान इथे घडत असतात. यंदा अभिराम भडकमकर यांनी सुचवलेल्या ‘आम्हास आम्ही पुन्हा पाहावे’ या विषयाचे आव्हानही तरुणांनी समर्थपणे पेलले. उत्कंठावर्धक आणि आशयघन एकांकिकांचा रसिकांनी मनमुराद आस्वाद घेतला. तरुणाईचं रंगभूमीप्रती विलक्षण प्रेम जरी दिसून येत असलं तरी तरुण लेखकांची उणीव ही दिवसेंदिवस भासतच आहे. त्यामुळे नवीन लेखकांना संधी मिळवून देण्यासाठी ‘अस्तित्व’ने ‘कल्पना एक..’च्या रूपात नवोदित लेखकांसाठी हा हक्काचा रंगमंच उपलब्ध करून दिला आहे. आजकाल प्रेमकथा, रहस्यमय गूढकथांच्या दुनियेत कंटेम्प्ररी, सेंसिटिव्ह आणि सोशियल थॉट असलेले लिखाण फारसे आढळून येत नसताना यंदाच्या विजेत्या एकांकिकेतून मात्र अशा पद्धतीचे लिखाण हाताळल्याचे दिसून आल्यामुळे खूप आनंद झाला.

तृप्ती गायकवाड (कलाकार)
alt
‘अस्तित्व’च्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ एकांकिका स्पध्रेचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मला मिळाला याचे सारे श्रेय मी माझ्या दिग्दर्शक आणि लेखकाला देते. एकांकिकेतील महत्त्वाच्या भूमिकेची जबाबदारी माझ्यावर सोपवून त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे माझ्या अभिनयातील कौशल्याला धार तर मिळालीच, शिवाय माझा आत्मविश्वासही वाढला. अभिनयात करिअर करायचं हे ठरवल्यापासून आजवर अनेक प्रकारच्या भूमिकांना नेहमीच मी अभिनयाच्या जोरावर पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. पण ‘कोंडी’ एकांकिकेत मी साकारलेल्या गर्भवती आदिवासी स्त्रीच्या भूमिकेला मला केवळ न्याय द्यायचा नव्हता, तर ती भूमिका पेलण्याचं सामथ्र्य स्वत:त आणून एकांकिकेला प्रेक्षकांच्या आणि परीक्षकांच्या पसंतीस उतरवायचं होतं आणि तसं झालंही. एकांकिका सर्वोकृष्ट ठरली. आमच्या महाविद्यालयाचा पाठिंबा आणि ‘कोंडी’साठी संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचं चीज झालं.

श्रेयस राजे (कलाकार)
alt
एका कल्पनेवर संपूर्ण विषयाची मांडणी करून एकांकिका बसवणं म्हणजे तारेवरची कसरत असं म्हणायला हरकत नाही. परंतु ‘कोंडी’ एकांकिका लिहिलेल्या आमच्या लेखकानेही हे आव्हान समर्थपणे पेलले. ही स्पर्धा लेखकांची स्पर्धा म्हणून नावाजली जाते आणि लेखनाच्या बाबतीत स्पध्रेच्या अटींना आम्ही तोडीस तोड उत्तर दिलंय याचा मला अभिमान वाटतो. आम्ही सादर केलेल्या कोंडीसाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं याचा आनंद तर होताच, पण उत्कृष्ट लेखन, दिग्दर्शनाची बक्षिसेही आमच्या खिशात दाखल झाली याचा दुप्पट आनंद झालाय. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतंय की, ‘सबसे हटकर.. जोशी बेडेकर’.

नम्रता सावंत (कलाकार)
alt
नामवंत दिग्गज नाटय़कर्मीनी सुचवलेल्या विषयावर संपूर्ण एकांकिकेची बांधणी करून चाबूक परफॉर्मन्स देणे हे केवळ आमच्यासाठी आव्हान नव्हतं, तर रंगभूमीचा भाग म्हणून ती आमची नतिक जबाबदारी असल्याचं मानून आम्ही काम करीत होतो. त्यामुळेच कदाचित यश आमच्या पदरी पडलं असावं. मी ‘कोंडी’ एकांकिकेत साकारलेली सामाजसेविकेची भूमिका माझ्या हृदयाला भिडली. दैनंदिन जीवनात व्यस्त असणारे आपण सामाजिक हालअपेष्टांनी पोळलेल्या एका विशिष्ट समाजापासून नेहमीच वंचित असतो, परंतु एकांकिकेने दिलेल्या माझ्या भूमिकेतून मी त्या विशिष्ट समाजाचे जीवन फार जवळून पाहिले, अनुभवले. अशी ही आमची ‘कोंडी’ एकांकिका प्राथमिक फेरीतून महाअंतिम फेरीत दाखल झाली आणि अपेक्षेप्रमाणे अखेरीस विजयी घोषित झाली.

सुप्रीम पाठारे (कलाकार)
alt
आमची ‘कोंडी’ एकांकिका फायनलला आल्याचे कळल्यावर आम्ही दिवसरात्र जागून तालमी केल्या होत्या. एकांकिका विजयी होण्यापाठी ऑनस्टेज काम करणाऱ्या कलाकारांसोबतच पडद्यापाठी काम करणाऱ्या कलाकारांचाही मोठा हातभार आहे. एकांकिकेच्या दर्जात्मक सादरीकरणासोबतच आमच्यातील टीम स्पिरीटचा कोंडीला जिंकवण्यात महत्त्वाचा कार्यभाग आहे. आमच्यातील ‘एकीच बळ’, ‘उत्तम कथा’ आणि ‘अभिनयाच्या जुगलबंदीने’ गुंफलेल्या आमच्या ‘कोंडी’ एकांकिकेने अखेरीस प्रेक्षकांचं मन जिंकलंच.

गौरव निमकर (कलाकार)
alt
स्त्री-पुरुष समानतेची ग्वाही देणाऱ्या आपल्या देशात आजही स्त्री सुरक्षित नाही. स्त्रियांना आरक्षण दिले जाते, स्त्रीमुक्ती संघटना स्त्रियांच्या न्याय हक्कांसाठी लढा देतात, मदत करतात या सगळ्या गोष्टी केवळ मेट्रो सिटीपुरत्याच मर्यादित आहेत; परंतु २१ व्या शतकातील महाराष्ट्राच्या दुर्गम भागांत म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार आणि इतर भागांत असे अनेक आदिवासी पाडे आहेत जिथली स्त्री मुक्त झालेली नाहीये. स्त्री परंपरेच्या विरुद्ध वागली की तिला हाकलून देतात किंवा जिवंत मारतात अशाच ज्वलंत विषयाच्या गाभ्यात सामावलेली आमची ‘कोंडी’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. ही एकांकिका विजेती ठरल्याचा आनंद केवळ आम्हालाच झाला नसून तो प्रेक्षागृहात बसलेल्या सामाजिक परिस्थितीची जाण असलेल्या प्रत्येकालाच झाला असेल यात शंका नाही. कारण या एकांकिकेच्या सादरीकरणामुळे एका खऱ्या घटनेची प्रचिती प्रत्येकालाच आली.