स्टे-फिट : बॅक टू बेसिक्स Print

alt

वृषाली मेहेंदळे , शुक्रवार , २६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
प्रश्न : मी गेले अनेक महिने अनेक प्रकारची सुपर लो कॅलरी, मोनो डाएट करून वेटलॉस करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ३-४ किलो वेटलॉस पटकन झाला, पण नंतर मात्र वेटलॉस जवळजवळ थांबला. उलट पित्त, बद्धकोष्ठ, पोटात जळजळ, असे आजवर कधीही न झालेले त्रास मात्र सुरू झाले. दुपारनंतर खूप थकवा यायला लागला. तुमचे लेख वाचल्यावर मात्र मला माझी चूक समजली आहे; परंतु आता व्यायाम करण्यासाठी माझ्यात एनर्जीच राहिलेली नाही. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आता मी कुठून सुरुवात करू?
- शलाका चिटणीस, वरळी, मुंबई.


उत्तर : शलाकाताई, उपासमार आणि फॅड डाएटिंगच्या दुष्टचक्रातून तुम्ही बाहेर पडायचे ठरवले हाच तुमच्यातला सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह बदल आहे. तुम्ही ज्या विश्वासाने आणि भक्तिभावाने आजवरचे डाएटचे प्रयोग केलेत.
आता तुम्हाला आधी तुमचे मेटॅबॉलिझम बदलण्यापासून सुरुवात करायला लागेल, एनर्जी लेव्हल वाढवायला लागेल, त्याला काही दिवस जातील. तोपर्यंत व्यायाम आणि वजनाचा काटा, दोन्ही बंद करून ठेवा. आजपासून घरातले जेवण म्हणजे त्यातले सगळे पदार्थ- अगदी गोडधोड असले तरी थोडे थोडे खायला सुरू करा. आठ-दहा दिवसांत तुमचे पित्त, जळजळ, कॉन्स्टिपेशन, हे त्रास आपोआप कमी होतील. त्यानंतरही पोट साफ होत नसले तर एखादे माइल्ड लॅक्झेटिव्ह घ्यायला हरकत नाही. दोन-एक आठवडय़ात तुमची एनर्जी लेव्हल वाढलेली तुमच्या लक्षात येईल, त्यानंतरच व्यायाम सुरू करा. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटलेली नसल्यामुळे तुमचा वर्कआऊट चार्ट देणे शक्य नाही; परंतु काही सोप्या टिप्स देते. पहिले दोन आठवडे १०-१५ मिनिटे ब्रिस्क वॉक आणि स्ट्रेचिंगचे ३-४ व्यायामांचे प्रत्येकी १०-१० काऊंट, फक्त इतकाच व्यायाम करा. हळूहळू तुमची भूक वाढलेली तुम्हाला जाणवेल. त्या प्रमाणात आहारही बेलाशक वाढवा. एकदा इतका व्यायाम आणि आहार तुम्हाला सूट झाला की, त्यानंतर व्यायामाचे काऊंट १० टक्के वाढवा. परत ८-१० दिवस तितकाच म्हणजे हा वाढविलेला व्यायाम करा. नंतर परत व्यायाम वाढवा. त्यानंतर कार्डिओ आणि स्ट्रेचिंगबरोबर हळूहळू याच सदरात पूर्वी दिलेले फ्रीहॅण्ड फ्लोअर एक्झरसाइजचे एकेक व्यायामसुद्धा सुरू करा. मात्र कुठल्याही व्यायामाचे काऊंट किंवा सेट वाढविण्याची घाई करू नका. व्यायाम करून दमायला होत असले तर ताबडतोब व्यायाम कमी करा. दमण्याइतका व्यायाम करणे चुकीचे आहे. उलट व्यायाम झाल्यावर जास्त फ्रेश वाटले पाहिजे. वर लिहिलेले तुमचे मेडिकल रिपोर्ट नॉर्मल असतील तर एका महिन्यानंतर तुमचा हेल्दी वेटलॉस सुरू होईल. प्रत्येक आठवडय़ाला वेटलॉस किती होईल ते माझ्या दृष्टीने तुमच्या बाबतीत महत्त्वाचे नाही. प्रत्येक आठवडय़ाला सातत्याने वेटलॉस होतोय याचा अर्थ तुमचे डाएट आणि व्यायाम यांची सांगड योग्य आहे असे मी म्हणेन.

alt

प्रश्न : व्यायाम करताना पाणी प्यावे की पिऊ नये? याबाबतीत अनेकदा फिटनेस इन्स्ट्रक्टर्सची मते परस्परविरोधी असतात. तुम्ही काय सल्ला द्याल?
- राजन जाधव, नाशिक
उत्तर : व्यायाम करीत असताना तहान तर लागतेच आणि डिहायड्रेशन होणेही धोकादायक असते. तुम्ही कार्डिओ एक्झरसाइज म्हणजे ब्रिस्क वॉक, सायकलिंग, जॉगिंग, ड्रेडमिल यांपैकी काही करीत असलात तर तहान लागेल त्या प्रमाणात एका वेळी एक-दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही. मात्र पाण्याचाही अतिरेक होऊ देऊ नका. पोटाशी संबंधित किंवा कोणतेही लाय डाऊन व्यायाम करीत असलात तर मात्र पाणी पिऊ नका. त्याऐवजी लिमलेटची एखादी गोळी न चावता तोंडात ठेवा, तहान कमी होते. व्यायामानंतर शवासन झाल्यावर एका जागी शांतपणे बसून एकेक घोट असे भरपूर पाणी पिणे सगळ्यात चांगले. इथे मुद्दाम सांगते की, व्यायाम संपल्यावर किमान एक तास काहीही खाणे मात्र आवर्जून टाळा. बऱ्याच जणांना जिममधून घरी जाताना हॉटेलात पोहे, उपीट, इडली, वडे खायची सवय असते, ते चुकीचे आहे.