कट्टा Print

alt

डी. के. बोस , शुक्रवार , २६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कट्टा नेहमीप्रमाणे भरलेला होता, गरब्याची जादू ओसरली होती. दांडिया खेळून झाल्यानंतर आता साऱ्यांनाच वेध लागले होते ते दिवाळीचे. दिवाळी म्हटल्यावर अनेक गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. पण कट्टय़ावर दिवाळी म्हटल्यावर शॉपिंग हाच विषय सर्वासाठी महत्त्वाचा होता. काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपलेली होती आणि आता घरून शॉपिंगसाठी पैसे पदरात पडणार होते, त्यामुळे शॉपिंग काय करायचे यावर प्रत्येक जण आपलं काही ना काही सांगत होता.


अरे, नेहमी तेच ते पंजाबी ड्रेस घालून कंटाळा आलाय यार, आता काहीतरी नवीन दिवाळीसाठी खरेदी करायला पाहिजे. तसा मी एक शॉर्ट कुर्ता पाहिलाय, पण तो पण च्यायला बजेटच्या बाहेरच आहे. कुर्ता घेतला की ४०० मध्ये जीन्स घ्यावी लागणार, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे यार. तुमच्यापैकी कोणीतरी लोन द्या ना मला, असं स्वप्ना बोलते न बोलते तोच चोच्या तडमडला, स्वप्ना तू पण ना च्यायला ‘पुराने खयालात की’ आहेस. कुर्ता आणि जीन्स काय, मार्केटमध्ये मुलींसाठी मस्त अनारकली ड्रेस आलाय तो घे ना. मस्त नवीन स्टाइल आहे. अगं सर्व अ‍ॅक्ट्रेसही सध्या तोच ड्रेस घालून पेज थ्री पार्टीमध्ये मिरवताना दिसतात बघ.. सॉलिड घेर असतो त्या ड्रेसला. तोच घे. तु सुद्धा अनारकली दिसशील डिट्टो..घे ना. कुर्ता काय कधीही घेता येईल, असं चोच्याने म्हटल्यावर त्याच्याकडे साऱ्यांच्याच नजरा वळल्या. च्यायला चोच्या, तुला कसं काय माहिती? साल्या तुझी गर्लफ्रेंड नाही, बहीण वगैरे नाही, तरी पण हे अनारकली ड्रेस वगैरे कसं काय माहिती तुला? असं सुप्रियाने विचारलं. त्यावर चोच्या उत्तर द्यायला रेड्डीच होता. अगं फक्त पुस्तकातला अभ्यास केला की, सगळं येत नाही, त्यासाठी आजूबाजूला काय चाल्लंय त्याचं नॉलेज पाहिजे. आता बघ ना, मुलांसाठी नवीन फॅशन आलीए, त्या स्टुडंट ऑफ द इयरमध्ये जसं जॅकेट घातलंय ना, तशा जॅकेटची फॅशन आलीए. स्टुडंट्स ऑफ द इअरमध्ये तो सिद्धार्थ काय दिसलाय रे.. एकदम फाडू.. त्याच्यासारखं जॅकेट आणि त्याचे कपडे सध्या खूप फेमस आहेत कॉलेजमध्ये.. च्यायला चोच्या म्हणजे या दिवाळीला तू जॅकेट घेणार की काय, असं संत्याने विचारल्यावर, नाही यार, च्यायला तेवढं बजेट थोडीच आहे आपलं. कपडे आणि फटाके सगळं.. दोन्ही गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. त्यामुळे एक मस्त जीन्स आणि चांगलं ब्रॅण्डेड शर्ट घेईन आणि बाकीचे सर्व फटाके.
च्यायला चोच्या अजून पण तू फटाके वाजवतो? अरे लेका लहान मुलांची कामं ती. लहानपणी लवंगीची माळ सुटी करून वाजवण्यात मजा यायची यार, साला मस्त टीपी व्हायचा. एका पिशवीत २-३ माळा सुटय़ा केल्या की धमाल यायची. फटाके फोडून झाले की, जे फुटले नाहीत त्याची दारू एका कागदावर काढायची आणि मस्त जाळायचो आम्ही, पण आता आपल्याला नाही जमत यार फटाके वगैरे. पण तू काय फोडतोस काय, असं अभ्याने विचारल्यावर चोच्या म्हणाला, अरे आता लवंगी वगैरे नाही यार, आता रस्सी बॉम्ब, रॉकेट वगैरे घेतो. आमच्या बिल्डिंगमधली लहान लहान कार्टी आमच्यावर गेली आहेत. रस्त्याच्या मधोमध एक न फुटलेला बॉम्ब अगरबत्ती लावून ठेवतात. जो कोणी येईल त्याला थांबवतात, बॉम्ब, बॉम्ब म्हणून.. आणि गर्दी जमली की मग कलटी मारतात. असा टाइमपास आम्ही आधी करायचो, तेच बघून शिकलेयत ते पण.
च्यायला चोच्या म्हणजे लहानपणापासून तू असाच आहेस उद्योगी. आम्हाला वाटलं, कॉजेलमध्ये आल्यावर झाला असशील. पण यार खरं, लहान असताना जाम धमाल यायची यार. पण आता काहीच नाही वाटत यार. सुशाच्या बोलण्यावर सर्वाचंच एकमत झालं होतं. पण चोच्या काही शांत बसणारा नव्हता. अरे पण एक मस्त काम होतं दिवाळीला, माहितीए का, असं चोच्याने विचारल्यावर साऱ्यांच्याच नजरा चोच्याकडे वळल्या आणि तोंडातून आपसूकच निघालं काय, त्यावर चोच्याकडे उत्तर तयारच होतं.. देवदर्शन. आणि काय, असं चोच्या बोल्ल्यावर कट्टय़ावर एकच हशा पिकला.