हॅप्पी दिवाली.. Print

राधिका कुंटे ,शुक्रवार , ९ नोव्हेंबर २०१२
alt

उटण्याचा सुगंध नि ऊन ऊन पाण्यानं अभ्यंगस्नान होतं. दारापुढं रांगोळी रेखाटण्यात आईला मदत केली जाते. रांगोळी काढताना ओल्या करंजीचा खरपूस वास नाकात शिरतो, तो भूक चाळवण्यासाठीच. रांगोळी पूर्ण काढून फर्मास फराळाचा आस्वाद घेतानाच फोनकॉल्स नि मेसेजेस येणं सुरू होतं हॅप्पी दिवाली..दिवाळीच्या पहिल्या दिवसाची ही तयारी.
मस्तपकी गुरगुटून झोपले होते. खिडकीतून एन्ट्री घेत वाराभाऊंनी टपली मारून जागंच केलं. म्हणाला,  ‘अगं उठ, आज दिवाळी पहाट!’ ‘अरे, येस्स! ’ म्हणत उठले नि चटाचट आवरून पटापटा पुढच्या उद्योगाला लागले.  कोणत्या? काय? अहो, ‘दिवाळी पहाट’ म्हणजे, यंगिस्तनसाठी एकदम ‘यो’. कशी? ते ऐका..
‘दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवकर उठायचंय ग! पहिल्या हाकेला’, अशी आजीची दटावणी कम वार्निग आठवडाभर आधीच सुरू झालेली असते. त्यातून थोडी सवलत मिळेल, या आशेनं आपण ‘आजोबा नि बाबा ब्रिग्रेड’कडं पाहतो, तर ते केव्हाच शत्रूच्या गोटात सामील झालेले असतात. वर आई आजीला रसद पुरवत असते नि दादा त्यात भरच घालत असतो. त्यामुळं आपण दिवाळी पहाटेला लवकर उठण्यावर मनोमन ‘लाइक‘ करतो, कारण मनातून ते आपल्याला आवडतंच असतं. सो, तसं घोकतच आपण झोपतो.  
बरोब्बर दोन वाजता पहिला ‘धाडऽऽऽऽधुडुम्म’ आवाज येतो नि मग लहान-मोठे धुमधडाके सुरूच राहतात. आजूबाजूला काहीतरी खुसफूस चालू आहे असं वाटू लागतं. झोप नि जागेपणाच्या सीमारेषेवर रेंगाळण्यापेक्षा आता जागंच होऊया, असं ठरवून आपण उठतो. घरातले बाकीचे केव्हाच उठून कामाला लागलेले असतात. आजी-आईनं लावलेल्या पणत्यांच्या प्रकाशात घर उजळलेलं असतं. बाबा-दादाकडच्या कंदील-लाईटसच्या डिपार्टमेंटचं कामही चोख पार पडलेलं असतं. आजोबांच्या आवडत्या शहनाईनं सूर धरलेला असतो. रेडिओवरच्या कीर्तनात नरकासूराच्या वधाचं वर्णन चालू असतं. उटण्याचा सुगंध नि ऊन ऊन पाण्यानं अभ्यंगस्नान होतं. दारापुढं रांगोळी रेखाटण्यात आईला मदत केली जाते. रांगोळी काढताना ओल्या करंजीचा खरपूस वास नाकात शिरतो, तो भूक चाळवण्यासाठीच. रांगोळी पूर्ण काढून फर्मास फराळाचा आस्वाद घेतानाच फोनकॉल्स नि मेसेजेस येणं सुरू होतं. तेवढय़ात ग्रुपला भेटायचंय, असा रिमाइंडर वाजतो. आपण त्या तयारीला लागतो नि आई-बाबा त्यांच्या आवडत्या मफलीला जातात. दादुटल्या केव्हाच घराबाहेर पसार झालेला असतो.
ठरल्या स्पॉटवर आपण पोहचतो. अति लवकर आलेल्या ‘गुणी बाळा’ला नि सगळ्यात उशिरा आलेल्या ‘काटर्य़ा’ला झपझप झापलं जातं. मेंबर्सचा कोरम फुल्ल झाला झाला की मंदिराच्या दिशेनं कूच केलं जातं. देवदर्शन झाल्यावर आपल्या बठकीवर अर्थात नेहमीच्या जागी बसून गप्पाष्टकांचा कार्यक्रम सुरू होतो. नवीन गॅझेटसची खरेदी, कोणता पिक्चर बघायचा,  अमक्यातमक्याचं अफेअर अशा टॉपिक्सवर तावातावानं चर्चा होते. तेवढय़ात कुणाला तरी आठवडाभरात असणाऱ्या परीक्षेची आठवण होते. मग परीक्षार्थीचे चेहरे टेन्शनमुळं अगदी बघण्यालायक होतात, पण हे टेन्शन लगेच खल्लासही होतं कारण समोरून ‘हिरवळ’ येत असते. त्यातल्या ‘आपल्या माणसा’चा शोध घेता घेता जाम तंद्री लागते..
तंद्रीतून जागं करतात ते सभोवताली उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांचे आवाज. एवढय़ा चर्चा, एवढं छापून येतं तरी सुधारत नाहीत.. असं म्हणून फटाके नि ते वाजवणाऱ्यांवर एक मिनी चर्चासत्रच घडतं. या सगळ्या धामधुमीत पहाटे केलेला घरचा फराळ केव्हाच जिरलेला असतो. मग ‘सीसीडी’- ‘बरिस्ता’, ‘डॉमिनोज’ किंवा आवडत्या हॉटेलची वाट धरली जाते.
आवडत्या डिशेश आणि वॉलेटमधल्या नोटांची सांगड घालून ऑर्डर दिली जाते. ऑर्डरची वाट बघता बघता मोबाइल हाताळला जाता. ‘हॅप्पी दिवाली’च्या मेसेजनी इनबॉक्स भरलेला असतो. ई-ग्रिटिंगजही असतात नि एफबीवर शेकडो अपडेट्स दिसतात. कुणी सगळं घर मेणबत्तीवाल्या पणत्यांनी उजळलेलं असतं. कुणी स्वत: आकाशकंदील केलेला असतो. कुणी रायगड सर केलेला असतो. कुणी आनंदवनातल्या माणुसकीचा झरा अनुभवत असतो. कुणी आयुष्याची संध्याकाळ झालेल्या आजी-आजोबांच्या मनात आशेची फुंकर घालू पाहतं. कुणी विशेष मुलांसोबत तर कुणी अनाथ मुलांबरोबर दिवाळीची पहाट घालवतं..
दिवाळीच्या सेलिब्रेशनचे एवढे सारे ऑप्शन्स बघून आपल्या ग्रुपला ‘लई भारी’ वाटतं. त्या फोटोंना नि स्टेट्सला भराभरा ‘लाइक’ केलं जातं. ‘आपणही असं काहीतरी भारी केलं पाहिजे’, असं वाटतंय, तोच तिकडून लगेच कमेंट येते- ‘बघता काय, सामील व्हा.’ ‘पुढल्या दिवाळीला नक्की’ असं मन:पूर्वक आश्वासन दिलं जातं. या अपडेट्सच्या नादात प्रत्येकाच्या घरून आलेले मिस्ड कॉल्स दिसतात, तेव्हा मंडळी थोडी भानावर येतात. बाहेर नजर टाकल्यावर उन्हाची तलखी जाणवते. घरून आणखी फोन यायच्या आत आता ‘कल्टी डॉट कॉम’ व्हायला पाहिजे, असा शहाणपणाचा सल्ला एकमेकांना ऐकवला जातो. लांब राहणारे मेंबर्स ‘सी यू सून’ म्हणतात, तर जवळच्या ग्रुपमध्ये संध्याकाळी पुन्हा भेटायचं ठरवलं जातं.
गोडाधोडाच्या जेवणानंतर हीऽऽऽ एवढी सुस्ती येते. मग ‘पहाटे लवकर उठले होते’च्या सबबीखाली मस्त ताणून देता येते.. पणत्यांचा प्रकाश, उटण्याचा सुगंध, फराळाची चव, कंदिलाचं वाऱ्यावर डुलणं, रंगतदार रांगोळी, नवीन खरेदी, शुभेच्छा, ग्रुपमधलं हसणं-खिदळणं.. एक ना अनेक.. पहाटेपासूनच्या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीजचा जणू कॅलिडोस्कोपच बनून जातो.. ऐन दिवाळीतल्या भर दुपारी आपण दिवाळी पहाट पुन्हा अनुभवू लागतो..