शिल्पकलेचा अक्षय्य ठेवा - प्रज्ञा मूर्ती Print

दिलीप शेळके - रविवार, १२ ऑगस्ट २०१२

शिल्पकलेला आजही खूप वाव आहे. सद्याच्यास्थितीत या कलेला बाजारपेठही चांगली आहे. कलावंताने स्वत:मध्ये सुधारणा घडविण्याची आवश्यकता आहे. शिल्पकला ही केवळ देवदेवता व थोर पुरुषांच्या मूर्ती बनविण्यापुरती मर्यादित नाही. वास्तू निर्मिती, स्मृतिचिन्हे अशा विविध क्षेत्रात या कलेचा उपयोग होत आहे. कलावंताने कलेला उपजीविकेचे साधन न समजता तिच्याकडे छंद म्हणून बघावे. विविध क्षेत्रात आज संगणकाने प्रवेश केलेला आहे. प्रिंटर, रोबोट, थ्रीडी अ‍ॅनिमेशन आले पण शिल्पकलेला मात्र अजून काबीज केलेले नाही. पुढील काही वर्षांत तसे सॉप्टवेअर येईलही पण ते खूप महाग पडेल. प्रत्येकाच्या घरी एक बाय एकची तरी पेंटिंग असावी. नाही तर उद्या कलेची दृष्टीच हरवून जाईल आणि कला ही संगणकातच दिसेल. छायाचित्रांच्या कितीही प्रती काढल्या तरी त्या एकसारख्या असतात पण हाताने काढलेली प्रत्येक कलाकृती वेगवेगळी दिसते. कलाकृती ही मनोदशा दर्शवित असते, असे ज्येष्ठ शिल्पकार प्रज्ञा मूर्ती यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थाना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती तयार करण्याची कला होय. या कलेतून तयार केलेल्या कलाकृतीलाच शिल्प म्हणतात. पौराणिक प्रसंगांना शिल्परूप देण्याचे तत्कालीन कारागिरांचे काम वाखाणण्यासारखे आहे. प्राचीन मंदिरांमध्ये देवदेवतांची शिल्प साकारलेली दिसतात. शिल्पकलेचा हा अक्षय्य ठेवा सर्वानी जतन करायला हवा. शिल्पकलेला संस्कृतीचा आधार आहे. विविध क्षेत्रात या कलेचा वापर केला जातो. अंतर्गत सजावटची कामे करता येतात. हे एक ‘आर्टिफिशियल प्रॉडक्ट’ आहे. एखाद्या पिलरवर कलाकुसरीचे काम करून आकर्षक करता येते. भारतीय वास्तू रचनाकारांनी शिल्पकारांना मदतीला घ्यायला हवे. पुतळे, स्मृतिचिन्हे आणि सभागृहांच्या भिंतीवर कॅन्व्हॉस पेंटिंग काढले अशाप्रकारे कलेचा उपयोग होतो.
 शिल्पकलेचा वारसा वडील मूर्तीकार रवी मूर्ती यांच्याकडून मिळाला. त्यांच्या आशीर्वादानेच कलेची आवड निर्माण झाली आणि त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. १९९५ साली माती, टेराकोटा, सिऱ्यामिक आणि संगमरवराची मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. निर्जिवांना सजीवाचे रूप देणे हेच जीवनाचे ध्येय आहे. या कामाला २००० साली एका उद्योगाचे रूप दिले. भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  राष्ट्रपिता महात्मा गांधी, पं. दीनदयाल उपाध्याय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कश्यप महाराज, अग्रसेन महाराज, योगिराज वित्तूबाबा आदींची शिल्पे आणि विविध स्मृतिचिन्हे तयार केली आहेत. शिल्पकलेतील कार्याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्री व मंत्र्यांनी गौरव केला आहे. यातून बरेच प्रोत्साहन मिळाल्याचे शिल्पकार प्रज्ञा मूर्ती म्हणाले.
उपराजधानीत विधान भवनासमोर बसविलेला गोंड राजे बख्त बुलंदशाह यांचा पुतळा शिल्पकार प्रज्ञा मूर्ती यांनी तयार केलेला आहे. ही अप्रतीम कलाकृती बघून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी प्रज्ञा मूती यांचा गौरव केला होता. नागपूर विमानतळ परिसरात बसविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मी तयार करून ठेवला आहे. शिल्पकार रवी मूर्ती मोठे कलावंत होते. मला कलावंत म्हणून घडविण्यात वडील, गुरू आणि मित्रांची महत्त्वाची भूमिका आहे. चांगला कलावंत होण्यासाठी त्याला भरपूर परिश्रम घ्यावे लागतात.
कलाकाराने कलेसोबत प्रामाणिक असावे, हीच शिकवण वडिलांनी मला दिली. कलेचा वारसा जोपासण्यासाठी प्रज्ञा भारतीय शिल्पकला दर्शन ही एक फर्म स्थापन केली आहे. सात कला एकाच ठिकाणी शिकायला मिळाव्या, हे वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘सप्तकला अकादमी’ स्थापन करणार आहे.
कला शिकण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संयमाची गरज आहे. पाच वर्षे कला शिकण्यासाठी गेले तर पुढील पाच वर्षे आमच्या फर्ममध्ये विद्यार्थ्यांनी कामे करावी, अशी अपेक्षा असते. सध्या कामे बरीच वाढली आहेत. कामासाठी आणखी दोन शिल्पकार आणि काही सहकारी सोबत आहेत. शहरात विविध ठिकाणी बसविण्यासाठी शिल्पकारांकडून थोर पुरुषांचे पुतळे तयार करून घेतले जातात. पुतळे तयार करण्याचे कंत्राट शिल्पकाराला दिले जाते. शिल्पकाराला शिल्पकार समजणे हाच त्याचा मोठा गौरव आहे. कलावंताने समताभाव जोपासावा, त्याला कोणतीही जात नसते. काम करताना आणि काम देतानाही भेदभाव करू नये, पैशासाठी कलेकडे बघू नये, एक छंद म्हणून ती जोपासावी, असे प्रज्ञा मूर्ती आवर्जून सांगतात.     
भारतीय शिल्पकला गुप्त राजवंशापासून विकसित झाली. पौराणिक प्रसंगांना शिल्परूप देण्याचे तत्कालीन कारागिरांचे काम वाखाणण्यासारखे आहे. शिल्पकलेची आजची स्थिती काय आहे, याबाबत नागपुरातील ज्येष्ठ शिल्पकार प्रज्ञा मूर्ती यांच्याशी साधलेला संवाद..