कॅक्टस Print

सीमा रमेश मामीडवार - रविवार, १२ ऑगस्ट २०१२
९८९०२८५२८६

निसर्गाचं सारंच काही विलोभनीय असतं. रंगीबेरंगी पानाफुलांनी नटलेल्या वृक्षवेली तर सर्वानाच आवडतात, पण त्याहीपेक्षा काटे असलेल्या कॅकटसनंही स्वत:च एक आगळवेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. या काटेरी सौंदर्याचं नाव आपल्याला माहिती असावं, असं बऱ्याच जणांना वाटतं. सहारा वाळवंट, मेक्सिको, दक्षिण आणि पश्चिम अमेरिका, आफ्रिकेतील वाळवंट इथून काही भारतीय प्रवाशांनी ही झाडं गोळा करून आपल्या देशात याची लागवड केली. अशा रीतीनं कॅकटस व सॅक्युलंटस आपल्या देशात आले आणि खूप लोकप्रिय झाले.
राजस्थानच्या वाळवंटातील कॅकटस बघण्यासारखे आहे. ज्याच्या खोडांमध्ये पाणी साठविण्याची शक्ती असते त्याला कॅकटस म्हणतात. ज्याच्या पानात पाणी साठविण्याची शक्ती असते त्याला सॅक्युलंटस म्हणतात. सर्व कॅकटस सॅक्युलंटस होतात, पण सर्व सॅक्युलंटस कॅकटस होत नसतात. कॅकटसचे खोड, पानं, फुलं, प्रत्येकाच एक वेगळ सौंदर्य असतं. रॉकरीमध्ये कॅकटसला सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. अत्यंत कमी पाणी आणि खडकाळ जमिनीत येणारी ही शोभेची सुंदर झाडं आहेत. वाळवंटात या झाडांना पाणी मिळत नाही म्हणून जेव्हा जेव्हा पाऊस पडतो अशा वेळी मिळणारं पाणी मोठय़ा प्रमाणात शरिरात साठविण्याची शक्ती निसर्गानं त्यांना दिली आहे. निवडुंग, क्रासूला, युफोरबीया, कोरडफसारख्या रसाळ क्रॅकट्समध्ये पाणी साठविण्याची शक्ती असते. कॅकटस लावण्याकरिता फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ सगळय़ात चांगला. कॅकटससाठी मातीचं प्रमाण खालीलप्रमाणे घ्यावं. शेणखत १ घमेल, मोठे खडे, विटांचे तुकडे २ घमेल, कोळशाचे तुकडे १ घमेल, वाळू ६ घमेल, पानांचं कुजलेल खत १ घमेल, तांबडी माती १ घमेल. यांचं मिश्रण करावं. कुंडीत लावायचं असल्यास कुंडीला छिद्र असणं जरुरीचं आहे. आधी विटांचे तुकडे टाकून मग वरील मिश्रण घालून हे कॅकटसचं झाड लावावं. पोथास, अगेव्ह पारासना हा प्रकार चांगला आहे. कोरफड हे भाल्याच्या आकारासारखा प्रकार आहे. अ‍ॅलोव्हेरिगेटा, युफोरबिया ही कॅकटसची जात चांगली आहे. युफोरबिया जातीपैकी सुफोरबिया स्प्लेंडेन्स (काळे मुकूट) या कॅकटसला जवळपास सात आठ महिने शेकडो फुलं असतात.
ग्राफ्टिंग केलेले कॅकटस सुंदर दिसतात. कॅकटस आणि सॅक्युलंटस खास अशा उंचवटय़ावर व त्याच्या उतारावर गोलाकार मांडणी केल्यास त्या रचनेला रॉक गार्डन म्हणतात. बंगल्याच्या समोरच्या भागात ही रचना चांगली दिसते. प्रथम मध्यभागी मोठमोठे दगड टाकावे. त्यावर विटांचे लहानलहान तुकडे टाकावेत. लहान मोठे दगडाचे गोटे टाकावे, त्यावर पांढरी, लाल व काळी माती टाकावी, मध्य भाग फुगीर करत चारी बाजूंनी उतार द्यावा. हा ढीग एखाद्या छोटय़ा डोंगरप्रमाणे दिसला पाहिजे. रॉक गार्डन करताना मागं भिंत असेल तर त्याला उतार देऊन असा ढीग करावा. त्यावर थोडी माती, शेणखताचं मिश्रण घालावं. नंतर त्यात थोडे थोडे कोळशाचे तुकडे, विटांचा चुरा टाकावा. रॉक गार्डनच्या मध्यभागी युका, अ‍ॅलो किंवा अग्रेव्ह या प्रकाराचे कमळाच्या पानासारखी रचना असलेले कॅकटस लावावेत. चारही बाजूनं युफोरबिया, निवडुंग, शतावरी, अ‍ॅलो ब्रायोयलम, कांडवेल इ. झाडे लावावी. कॅकटसच्या आजूबाजूनं निरनिराळय़ा रंगाचे, गारगोटय़ांचे दगड किंवा काळे गोटे मांडावे. अधूनमधून वाळू टाकावी. कॅकटसला निसर्गात हवं असलेलं वातावरण त्यामुळे मिळेल. कॅकटसला सुरुवातीला काही दिवस झारीनं पाणी द्यावं. पानं गळत असतील तर पाण्याचं प्रमाण कमी करावं. अधिक पाण्यानं मुळय़ा कुजतात. अत्यंत आकर्षक अशा सिरॅमिकच्या कुंडय़ातून युफोरबिया, शेर, निवडूंग, कोरफडीच्या अनेक जाती शोभेची वस्तू म्हणून मिरवतांना आज आपल्याला दिसतात. कॅकटसचं लोभसवाणेंव मोहक रूप सर्वानाच आवडायला लागलं आहे.