आद्याक्षरांची अक्षरगाथा Print

प्रमोद लेंडे-खैरगावकर - रविवार, १२ ऑगस्ट २०१२
९७६७६३६२९१

मराठी साहित्यात ललित साहित्य नेहमीच भरघोस प्रमाणात निर्माण झालं आहे. त्यात प्रामुख्यानं कविता उठसूठ लिहिल्या गेली. त्यानंतर ललित निबंधांकडे लेखकरावांचा मोर्चा वळला आणि ललित निबंधाच्या वाटा सुकर झाल्या. ललितबंध हा शब्दप्रयोग पहिल्यांदा कवी ग्रेस यांनी त्यांच्या ललित लेखनासाठी वापरला. आज तो रूढ अर्थानं वापरला जातो. ‘म’ ‘म मराठीचा’ या ललितबंधाच्या लेखिका विद्या कावडकर यांना मराठी विषयात अध्ययन व अध्यापनाची गोडी लागली ती राम शेवाळकर यांच्या गुरुछायेमुळेच. ओबडधोबड मराठीकडून प्रमाण व बोलीभाषेतील प्रवास निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. त्यांना लिहितं करणारे, धडे देणारे ज्येष्ठ साहित्यिक शेवाळकर यांनाच हे पुस्तक त्यांनी अर्पण केलं आहे. ‘म’ म मराठीचा’ या ललितबंधाच्या पुस्तकात १० लेखांचा समावेश केलेला आहे.
‘तुझा गळा माझा गळा’ या लेखापासून लेखिका सुरुवात करते. आपल्या बालपणातील आठवणींना उजाळा देताना ‘नंदीबैल’ विषयीचं वाटणारं कुतूहल व प्रौढावस्थेत त्याची होणारी जाणीव चित्रित करतात. आपल्या अवतीभवती वावरणारी माणसं नंदीबैल झाले की काय, हा प्रत्ययही त्यांना येतो. बालक्रीडेतून लागलेलं वाचनवेड पुढं त्यांची आवड व छंद कसा झाला, याविषयीचं मार्मिक चित्रण करतात. मात्र जेव्हा मर्ढेकर, केशवसुत यांच्या कवितांचा आधार लेखिका घेतात तेव्हा त्या वाड्:मयीन चिंतनच करत असतात. ‘पैंजण पायी माझ्या’ या लेखात स्त्रीयांना कशी दुय्यम वागणूक दिली जाते, हे विशद करतात. स्त्री जातीची असणारी विविध पदरी दुखरी जाणीव त्या व्यक्त करतात. कधी श्रावणाचे वर्णन, तर कधी कुसुमाग्रजांची क्रांतीचा जयजयकार यासारख्या कविता स्वातंत्र्याच्या उद्घोष करतात. पाय या शब्दांवरून येणारे विविधांगी स्वरूपाचे वर्णन लेखिका करताना त्यातील ललित्य कमी आणि नाटकीपणाचा भावच प्रकट होतो. ‘तोंडी लागू नका’ या लेखातही तोंड या शब्दापासून नानातऱ्हेच्या व्यावहारिक म्हणी, उखाण्यांवर ‘तोंडी लागू नका’ हा लेख शब्दांच्या चकमकी करून ललित्याच्या रणांगणात व्यर्थच बळी जातो. ‘मना सज्जना’ या लेखात संत रामदासी परंपरेचे वर्णन करतात. इथंही सुभाषित म्हणींचा त्या उपयोग करतात. मनाविषयीचं वाड्:मयीन व्यावहारिक स्वरूपाचं वर्णनच लेखिका करण्यात गर्क आहे. ‘आँखो में क्या जी’ या लेखात ‘ड’ हे आद्याक्षर घेऊन त्यासंबंधी निर्माण होणाऱ्या विविध कोटय़ा, डोळ्यांच्या संबंधित असलेल्या सर्वच म्हणी वाक् प्रचारांचा लेखिका धांडोळा घेते.  
‘नकटीचे लग्न’ या लेखात हिंदी-जपानी आंतरराष्ट्रीय विवाहाचं वर्णन करताना जपानी स्त्रियांच्या नाकापासूनचं त्यांच्या बांध्यापर्यंतचं वर्णन लेखिकेनं केलं आहे. ‘नाक’या शब्दातील सर्व संदर्भ, ओव्या, वेचे, म्हणी, कविता वैगरेंचा पुरेपूर वापर करून विविधांगी वर्णन केलं आहे. ‘दात काय काढता’ या लेखात दातांवरून जेवढय़ा कोटय़ा होतील तेवढय़ांचं वर्णन लेखिकेनं केलं आहे. दातांच्या डॉक्टरांविषयीचं लेखिकेच्या भाचीचं कुतूहल, माणसांच्या दातांवरून प्राणी, पशू यांचाही आढावा त्या घेतांना दिसून येतात. ‘आज्ञा शिरोधार्थ’ मध्ये ‘डोकं’ या शब्दावरून मानवी भावभावनांचे स्वभावदर्शन घडवितात. प्रा. डोईफोडे आणि त्यांच्या विवाहाची गोष्ट, डोकं नसलेली माणसे, डोक्यात वळवळणारी किडे, सीर सलामत तो पगडी हजार, इत्यादी म्हणींद्वारे लेखनाचे विविध पदर गुंफले आहेत. ‘कर कर कर’ या लेखात हातांचं वर्णन आलं आहे. नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी यांच्या हातांचे हावभाव चित्रपटांच्या गीतांमधून मार्मिक दाखले देऊन व्यक्त झाले आहेत. ‘कान देऊन ऐका’ यात आपल्या शिक्षकी व्यवसायातील कथन केले आहे.
एकंदरच ‘म’ म मराठीचा हे ललितबंधाचे पुस्तक नाक, कान, डोळे, पाय, तोंड, मन, हात यांचं वर्णन रुढी परंपरा चालीरीतींचा सांस्कृतिक ऐवजच मांडत असतं. कधी हलकं फुलकं वाटणारं हे लेखन साहित्यमूल्य जपून जीवनमूल्यं साकारतं. १५० पृष्ठांचं हे पुस्तक तितक्याच किमतीचं आहे. नागपूरच्या आकांक्षा प्रकाशननं ते प्रकाशित केलं असून मुखपृष्ठ विवेक रानडेंचं आहे. मनस्वी आनंदासाठी हे पुस्तक वाचकांनी अवश्य वाचावं.