शाश्वताच्या पाऊलखुणा Print

संजीव देशपांडे - रविवार, १२ ऑगस्ट २०१२
९०१११६५०७९

प्राचीन काळी चंद्रपूर-नागपूर मार्गावरील भद्रावती गाव म्हणजे एक प्राचीन राज्य. अनेक राजसत्ता पाहिलेलं. ज्यांच्या खुणा अजूनही नगरीभवताल दिसतात. आताचं भद्रावती-घोडपेठ-घोट-निंबाळा-भटाळा ही गावं मिळून एक मोठं विशाल राज्य. भटाळा गाव तर सर्वार्थानंच अप्रतिम. या गावात या गावानं जपून ठेवलंय एक फार मोठं मौलिक धन. ते म्हणजे गावात प्रवेश करताना लागणारा ॠषिकाशी तलाव. तलाव अगदी छोटेखानी, पण त्याच्या वैभवाची मोजणी जर करायची तर ती केवळ अशक्य.
   हा तलाव म्हणजे एक छोटीशी अद्भुतरम्य नगरी. स्वप्नवत नगरी. तलावाच्या सर्व बाजूंनी अगदी छोटय़ा छोटय़ा लेण्या. कोणतंही लेणं तीनेक फुटांच्या वरच्या उंचीचं नाही. साऱ्या लेण्या एका दालनाच्या. अत्यंत कोरीव, प्रमाणबद्ध आणि सुबक आकाराच्या. नक्षीवंत अशा की, कुठलाच कोण कुठं सुटलेला नाही की, लय तसूभरही ढळलेली नाही. ‘डोळ्यांचे पारणे फिटणे’ याचा प्रत्यय यावा एवढं मनोहारी. लेण्या तलावाच्या सभोवताल. तलावाचा विस्तार फार नाही, अगदीच छोटेखानी. तलाव पाण्यानं भरून राहिला तरी लेण्या मात्र पाण्याच्या पातळीवरच. तसं आजकाल पूर्णपणे पाण्यानं भरण्याचे तलावांचे दिवसही गेलेतच. तरी पावसाळ्यात तलाव काही दिवस बऱ्यापैकी पाणी राखून असतो आणि उन्हाळ्यातही तळाशी थोडी हिरवळ असतेच.
   छोटेखानी नगरी वसवावी तशा लेण्या वेगवेगळ्या पातळ्यांवर दोन दोन-तीन तीनच्या गटात. मग त्यांच्या त्यांच्यापुरत्याच तेवढय़ा पायऱ्या. तेवढं अंगण. दोन पावलं पुढे टाकली की, दुसरं लेणं. या सर्वच लेण्यांचं एक खास वैशिष्टय़ म्हणजे या सर्वच लेण्यांत शिवपिंड आहेत, पण त्या नेहमीसारख्या पारंपरिक नाहीत तर आहेत चौकोनी आकाराच्या. लेण्यांचा आकार एवढा लहान की, आत शिरता येतच नाही, पण बांधकामाचे सर्वच बारकावे या लेण्यांमधून स्पष्ट दिसतात. वरून झिरपणारं किंवा द्वारातून आत येणारं पावसाचं पाणी आत साचून राहणार नाही, अशी व्यवस्था जवळपास प्रत्येकच लेण्यात. पडदा किंवा द्वारासदृश आडोसा लावता येईल, अशीही व्यवस्था जवळपास सर्वच लेण्यात. त्यासाठी कोरीव द्वाराच्या एका बाजूला खाली आणि वर असे दोन खळगे, की ज्यात लाकूड फसवता येईल.
   हा संपूर्ण परिसर या लोकीचा वाटतच नाही. या परिसरात हिंडत असताना एका अद्भुताचा आणि एका चैतन्याचा सतत भास होत राहतो. आजूबाजूच्या वर्तमानाचा विसर पडतो आणि वाकाटक काळाशी थेट मन जुळतं. लेणी परिसरात आणखी दोन दुर्मिळ लाखमोलाच्या गोष्टी. एक म्हणजे खडकातच खोदलेली नृसिंह प्रतिमा. ही प्रतिमासुद्धा नेहमीच्या प्रतिमांसारखी नाही, म्हणजे हिरण्यकश्यपूचा वध करणारी प्रतिमा नाही तर फक्त नृसिंहाचीच अशी एकटी प्रतिमा आहे. अशा प्रतिमांना केवल नृसिंह असं म्हणतात. दुसरी एक प्रतिमा दिसते ती शिवसदृश्य प्रतिमा वाटते. ही प्रतिमासुद्धा खडकातच खोदलेली आहे.
या लेण्या पाहताना एक गोष्ट विशेषत्वानं जाणवते ती म्हणजे या लेण्या कोरणाऱ्याचं कसब. कारण, दगडांची विपुलता असली तरी प्रत्येकच दगड हा कोरीव कामाचा नसतो आणि समोर दिसत असलेला दगड हा आत किती रुंद-लांब असेल, याचा आधीच अंदाज घ्यायचा आणि मग मनातच त्या लेण्याचं चित्र साकार करायचं, एवढं काटेकोर की, एक कंगोरासुद्धा नाव ठेवायला राहू नये. मग कोरीव काम. कोरीव कामही असं की, संपूर्ण परिसराला एकच लय लाभावी. कुठल्याही एखाद्या लेण्यानं कोणत्याही प्रकारचा लयभंग होऊ नये. सारंच मोठं विलक्षण.
   क्षणभर मोह होतो आणि आपण त्या दगडाला हात लावून बघतो, पण प्रत्येकच वेळी प्रत्यय येतो की हा दगडच आहे. जे चांगल्यातल्या चांगल्या व सहजसाध्य माध्यमातून सिद्ध होत नाही ते अशा दगडातून सिद्ध करून दाखवणारे हात खरोखरच कलावंत. या कलावंत हातांची दखल घेऊन हजारो वर्षांपासून एखादं स्वप्न मनात जपून ठेवावं तसं भटाळा या गावानं ॠषिकाशी तलावाकाठचं हे लेणं जपून ठेवलं. इथून पुढचा प्रवास मात्र कठीण आहे. या कठीण प्रवासातही ही इवल्या इवल्या लेण्यांची इवली इवली पावलं काळाच्या पटलावर आपल्या पाऊलखुणा निश्चितच उमटवतील.