‘सत्यशोधक’ म्हणजे संघर्षांची धग Print

प्रशांत देशमुख - रविवार, १९ ऑगस्ट २०१२
९८९०९२६२००

व्यावसायिक रंगभूमीच्या प्रथितयश नाटकांनी वर्धेकरांना नेहमीच रिझविले. नाटकाच्या प्रयोगांवर प्रेक्षकांच्या पडणाऱ्या उडय़ा व मिळणारा प्रतिसाद कलाकारांनाही भावला. तसा प्रतिसाद कलात्मक नाटकांना मात्र मिळाल्याचा दाखला अपवादात्मकच आहे. त्यातही समाजप्रधान व संदेशात्मक नाटके मूठभर खुच्र्यांच्याच साक्षीने आटोपली, मात्र अशा सर्व अनुभवांना छेद देणारे एक नाटक वध्र्यात मन:पूत प्रतिसाद मिळवून गेले. कामगार असणाऱ्या या कलाकारांनी ‘सत्यशोधक’ या नाटकातून मांडलेले वास्तव उपस्थितांना अंतर्मुख करून गेले. दीड शतकापूर्वीच्या कथानकाला वर्धेकरांनी मनोमन स्वीकारले.
पुणे महानगरपालिका सफोई कामगार संघटनानिर्मित, गो.पु. देशपांडे लिखित व अतुल पेठे दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ नाटक हे येथील बजाज वाचनालयातील सभागृहाच्या रंगमंचावर सादर करण्यात आले. सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात नवनवे उपक्रम आणणाऱ्या यशवंतराव दाते स्मृती संस्थेतर्फे  शिक्षणमहर्षी बापुरावजी देशमुख यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने या नाटकाचा प्रयोग करण्यात आला. याप्रसंगी निर्मितीप्रमुख मुक्ता मनोहर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाटकात काय नव्हते? नाटय़, नृत्ये, गाणी आणि मनाचा क्षणोक्षणी ठाव घेत जाणारे कथानक. दीड शतकापूर्वी महात्मा फु ले-सावित्रीबाई फु ले या दाम्पत्याने केलेला संघर्ष पुढे येणाऱ्या पिढय़ांच्या उद्धाराचा सामाजिक पाया ठरला. जाती व्यवस्थेविरुद्ध, ब्राह्मणी पूजापाठ व कर्मकांडाविरुद्ध, वंचितांची पिळवणूक व स्त्रीशोषण याविरोधात फु लेंनी केलेले कार्य अजरामर आहे. ते कार्यच आजच्या स्त्रीला व शोषितांना स्थान मिळण्यास कारण ठरले, पण केवळ पुस्तकी अभ्यासापुरतीच याची आठवण आजच्या पिढीला होते. या संघर्षांची धग अनुभवयाची कशी, याचे उत्तर ‘सत्यशोधक’ देते. वंचित-शोषित घटकांमधे फु लेंनी जागविलेली उमेद या नाटय़कृ तीतून लोकांपुढे येते. प्रवाहाविरुद्ध पोहून मानवी हक्काचा उभा केलेला लढा अंगावरची सालटे काढणारा कसा ठरला, हे श्रोत्यांना उमगले अन् मन बधिर करून गेले.
सफोई कामगारांचा सफोईदार अभिनय भल्याभल्यांना चकित करणारा ठरला. जणू त्यांचे रोजचे जिणेच ते साकारताहेत. ज्योतिबांच्या भूमिकेत ओंकार गोवर्धन यांनी आकारलेली भूमिका प्रेक्षकांनी सहज स्वीकारली, तर पूर्णा पेठेंची सावित्रीबाई तत्कालीन स्त्री जीवनाची खडतर तपस्या उलगडून गेली. याखेरीज शाहीर सदाशिव भिसे, रमेश पारसे, दत्ता शिंदे, संदीप मोरे, नितीन बनकर, रणजित मोहिते, संतोष गायकवाड, नागनाथ गायकवाड, डॉ. दीपक मांडे, शोभा बनमोडे, सावित्री भिसे, प्राजक्ता पाटील, अमृता व श्रेया मोरे या कामगार कलाकारांच्या पुरक भूमिका नाटय़कृतीला उठाव देणाऱ्या ठरल्या.
निर्मितीप्रमुख मुक्ता मनोहर यांची याप्रसंगी भूमिका मांडताना नमूद केले की, या नाटकाचे राज्यभर ६१ प्रयोग झाले. वध्र्याचा ६२ वा प्रयोग कलाकारांसाठी विशेष प्रोत्साहक ठरला. कृती इतिहासातील व सामाजिक घडामोडींची असली तरी त्या संघर्षांतील धग आजही प्रेरणादायी आहे. म्हणूनच प्रयोग कथाकथन न वाटता संघर्षमय नाटय़ वाटते. लोकोत्तर जीवनपट, प्रभावी संवाद व हौशी कलाकारांचा सजीव अनुभव ही नाटकाची बलस्थानं आहेत, असंही मुक्ता मनोहर म्हणाल्या.
अनेक वर्षे मनात घर करून राहणाऱ्या या नाटय़प्रयोगाला स्त्री-पुरुष नाटय़प्रेमींची लक्षणीय उपस्थिती होती. सर्व कलाकारांच्या अभिनयास दाद देत त्यांचा प्राचार्य विलास देशमुख व विजय जावंधिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रयोगास सहकार्य करणाऱ्या कामगार कृती समितीचे गुणवंत डकरे, नरेश गेडे, टी.एन.माहुरे, किशोर देशपांडे, तसंच आयोजक संस्थेचे प्रदीप दाते यांनी प्रयोगाच्या खर्चाची तमा न बाळगता वध्र्यात केलेला ‘सत्यशोधक’ त्यांच्याही कौतुकाची वाट मोकळी करणारा ठरला.