सामाजिक चळवळींचे आकलन आणि विश्लेषण Print

प्रा. अजय देशपांडे - रविवार, १९ ऑगस्ट २०१२
९८५०५९३०३०

सामाजिक चळवळींचा शास्त्रशुद्ध आणि सखोल अभ्यास करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. मराठी भाषेत मात्र चळवळींच्या सखोल आणि नि:पक्ष अभ्यासाचे प्रयत्नही फारसे झालेले दिसत नाही. काही अपवाद वगळले तर महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय स्वरूपाच्या चळवळींविषयी पुरेशा गांभिर्यानं आणि चिकित्सकवृत्तीनं केलेलं लेखनही केलं गेलं नाही. भारतातील सामाजिक चळवळींचा इतिहास नव्यानं लिहिण्याची गरज आहे. या पाश्र्वभूमीवर ‘भारतातील सामाजिक चळवळी’ हे प्रा. घनश्याम शहा यांचं पुस्तक फार महत्वाचं आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्राची चिकटे यांनी केला आहे. १८५७ नंतरच्या भारतातील सामाजिक चळवळींचं विश्लेषण या पुस्तकात केलं आहे.
या पुस्तकात अकरा प्रकरणं आहेत. पहिल्या प्रकरणात भारतातील सामाजिक चळवळीच्या संदर्भातील मतांचा, विश्लेषणांचा आढावा घेत, ‘चळवळ’ या संकल्पनेचा शोध घेत सामाजिक चळवळींचं वर्गीकरणही केलं आहे. त्यानंतरच्या नऊ प्रकरणात ग्रामीण चळवळी, विविध जमातींच्या चळवळी, दलित चळवळी, मागासवर्गीय जाती-जमातींच्या चळवळी, महिलांच्या चळवळी, औद्योगिक कामगार वर्गाच्या चळवळी, विद्यार्थ्यांच्या चळवळी, मानवी हक्क आणि पर्यावरणवादी चळवळी, अशा विविध चळवळींचं साधार आणि साक्षेपी विश्लेषण आहे. शेवटी समारोपाच्या प्रकरणात भारतातील सामाजिक चळवळींच्या संदर्भात काही निरीक्षण नोंदवत भविष्यातील संशोधनाकडे अंगुली निर्देश केला आहे. चॉईस जर्नल ऑफ द अमेरिकन लायब्ररी असोसिएशननं या पुस्तकाचे ‘..भारतीय सामाजिक चळवळींच्या अभ्यास व आकलनासाठी अत्यंत महत्वाचा दस्तऐवज’ या शब्दात वर्णन केलं आहे आणि ते अगदी यथार्थही आहे.
पहिल्या प्रकरणात प्रा. घनश्याम शहा एका ठिकाणी ‘चळवळ’ या शब्दाच्या सद्यस्थितीविषयी अगदी मार्मिक टिप्पणी करतात. ‘सामाजिक चळवळ’ कशाला म्हणावे, याची समाजशास्त्रज्ञांकडून किंवा अन्य कोणत्याही सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या विद्वानांकडून अगदी योग्य अशी व्याख्या केली गेलेली नाही. ‘लोकशाही’, ‘समाज’, ‘लोकप्रिय’ ‘समानता’ यासारख्या शब्दांप्रमाणेच ‘चळवळ’ हा शब्दही सामाजिक आणि राजकीय नेते मंडळी आणि राजकीय विचारवंतांच्या वतीने अगदी सर्रासपणे अनेक अर्थाने वापरला जातो. काही विचारवंत संस्थात्मक संघटनांसाठीही ‘चळवळ’ हा शब्द वापरत असतात. काही जण ऐतिहासिक घडामोडींच्या विश्लेषणासाठी ‘चळवळ’ हा शब्द वापरतात. एखाद्या राजकीय किंवा सामाजिक गटाचा अगदी थोडय़ा सदस्यांच्या उपस्थितीतला एखादा कार्यक्रम असला तरी त्या कार्यक्रमाला ‘चळवळ’ असे म्हणण्याची सध्या एक फॅशन रूढ व्हायला लागली आहे. एखाद्या नागरी समस्येवर काही प्रसिद्धिपत्रक जाहीर करून आपण ‘चळवळ’ करत असल्याचा भास काही नेते मंडळी करत असतात’ (पृष्ठ पाच) अशी टिप्पणी करून प्रा. शहा यांनी ‘चळवळ’ या संकल्पनेचं सविस्तर विश्लेषण केलं आहे. या पुस्तकाचं एक वैशिष्टय़ असं की, इथं भारतातल्या सामाजिक चळवळींचा चिकित्सक अभ्यास नव्हे, तर राजकीय साहित्याचा आढावा घेतला, असं खुद्द लेखकानं नमूदही केलेलं आहे, तथापि सामाजिक चळवळींच्या संदर्भातील साहित्याचा आढावा घेताना लेखकानं जे चळवळींचं आकलन मांडलं आहे, ते फार महत्वाचं आहे. चळवळ ही भूमिका, विचारधारा, नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमुळेच आकाराला येते, या चारही घटकांची साक्षेपी चिकित्सा लेखकानं केली आहे.
‘ग्रामीण चळवळी’ या प्रकरणाच्या शेवटी एक वाक्य प्रा. घनश्याम शहा लिहितात, ‘.. खरं तर भांडवलशाहीने खोलवर मुसंडी मारलेल्या या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ग्रामीण जनतेला समाज म्हणून स्थान आहे का, याचेच आश्चर्य वाटू लागले होते.’ १९९० नंतर सुरू झालेल्या नव्या भांडवलशाहीच्या युगात समाज म्हणून ग्रामीण जनतेचा विचार तरी केला गेला आहे का, हा प्रश्न अनेक गुंतागुंतीच्या धोरणांचं, विचारांचं, समस्यांचं मोहोळ उडविणारा आहे. आदिवासींच्या चळवळींच्या अभ्यासाविषयी प्रा. शहा लिहितात, ‘.. जरी आदिवासी चळवळीचा अभ्यास मोठय़ा प्रमाणावर झालेला असला तरी त्यापैकी थोडेच अभ्यास सखोल आणि योग्य प्रकारे माहितीसंपन्न आहेत. बरेचसे अभ्यास म्हणजे नुसती रेखाचित्रे आहेत. दक्षिण, मध्य आणि ईशान्य भारतातील चळवळींवरील अभ्यास फार थोडे आहेत. अनेक आदिवासी चळवळींच्या अजून अभ्यास झालेला नाही. राजकीय शास्त्रज्ञ आणि सामाजिक इतिहासकारांनी या क्षेत्राकडे जवळजवळ दुर्लक्षच केले आहेत’ (पृष्ठ ९२) अशी स्पष्ट मतं त्यांनी पुस्तकात अनेक ठिकाणी व्यक्त केली आहेत. शेतकरी, ग्रामीण, दलित, आदिवासी स्त्रिया, विद्यार्थी, मध्यवर्गीय, कामगार, मानवी अधिकार, निसर्ग, पर्यावरण या आणि यांच्याशी संबंधित कितीतरी चळवळींबाबतचं कठोर, नि:पक्ष, परखड विश्लेषण या पुस्तकात केलेलं आहे. हे विश्लेषण आणि त्यानंतर लेखकाचं त्यासंदर्भातील निरीक्षण हे सारं मुळातूनच वाचावं, असं आहे. सामाजिक चळवळींवर आधारित साहित्याची चिकित्सा करीत केलेलं हे विश्लेषण चळवळींच्या अभ्यासासाठी दिशा देणारं आहे. संदर्भ पुरविणारंही आहे. या पुस्तकाच्या मलपृष्ठावर पुस्तकाविषयी पुढील मजकूर लिहिला आहे. ‘भारतीय सामाजिक चळवळींचे तर्कदृष्टय़ा वर्गीकरण करताना या पुस्तकाची पुष्कळ मदत सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना होईल, तसेच राजकीय ऐतिहासिक व समाजशास्त्रीय चळवळीतील कार्यकर्त्यांना पण होईल, सामाजिक चळवळीतील अभ्यासक्रमाशी संबंधित विद्यार्थ्यांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल’ हे अगदी खरं आहे. प्राची चिकटे यांनी केलेला अनुवाद डायमंड पब्लिकेशन्सनं प्रकाशित केला आहे.
महाविद्यालयीन, शासकीय व खासगी ग्रंथालयांनी, अभ्यासकांनी, कार्यकर्त्यांनी, विद्यार्थ्यांनी हे पुस्तक संग्रही ठेवावं, असं आहे.