एक युटोपिअन विचारवंत.. Print

डॉ. अरुणा देशमुख - रविवार, १६ सप्टेंबर २०१२

मारवाडी फाऊंडेशनचा भारतरत्न   डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार उद्या ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत, कवी, समीक्षक डॉ. यशवंत मनोहर यांना प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्त-
गं.बा. सरदारांनी आपल्या एका लेखात असे म्हटलेले आहे की, आधुनिक युगातील न्या. रानडे, टिळक, गांधी, डॉ. आंबेडकर हे प्रमुख नेते होते. त्यामुळे त्यांच्या विचार प्रतिपादनात त्यांची धर्मभावना प्रतिबिंबित झालेली आहे. सरदारांचा हा विचार लक्षात घेतला तर डॉ. आंबेडकरांनाही आपली भूमिका धर्मभावनेपासून दूर ठेवून निखळ व शुद्ध पातळीवर नेणे जमले नाही. अर्थातच, असे होण्यामागे डॉ. आंबेडकरांची पुढची वस्तुस्थिती कारणीभूत आहे, हे आपल्याला ध्यानात घ्यावे लागेल. शिवाय, ही धर्मभावना रूढ धर्मभावनेच्या अर्थाने गृहीत धरता येत नाही, हेही लक्षात घ्यावे लागेल, मात्र डॉ. यशवंत मनोहर सरांनी आजतागायत केलेली ज्ञानोपासना ही निखळ आणि शुद्ध अशी ज्ञानोपासना आहे. धर्मभावनेचा अस्पष्ट किंचितसाही स्पर्श त्यांच्या भूमिकेला होत नाही. किंबहुना ‘बुद्धिवादी जडवाद’ हाच त्यांचा एकमेव धर्म आहे, एकमेव निष्ठा आहे आणि एकमेव अशी श्रद्धा आहे. आजच्या वैचारिक परिवेशात हे मोठेच दुर्मिळ असे दृश्य आहे.
एका मुलाखतकाराने त्यांना स्वत:चीच व्याख्या कशी कराल, असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी म्हटलेले होते की, पराकोटीचा बुद्धिवाद मानणारा, दैववाद, अध्यात्म-अंधश्रद्धा-अंतर्विरोध आणि ईश्वर-परलोक-स्वर्ग-पूर्व आणि पुनर्जन्म यांना प्रखर विरोध करणारा व ‘माणसां’वर प्रेम करणारा माणूस म्हणजे यशवंत मनोहर! स्वत:ची अशी व्याख्या करणार विचारवंत आज आपल्या दृष्टीस पडत नाही, हे कुणीही मान्य करेल, मात्र जी धर्मभावना आपल्याला स्पर्शूही नये, असे त्यांना वाटते त्यावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. डॉ. आंबेडकरांनी केलेल्या धर्मातराचे अर्थनिर्णयन त्यांनी याच त्यांच्या भूमिकेच्या प्रकाशात केलेले आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकरांचा बुद्ध कोणता? डॉ. आंबेडकरांनी विपश्यना का नाकारली? यासारख्या प्रश्नांची सोडवणूक करताना आणि डॉ. आंबेडकरांची धम्मसंकल्पना, बुद्धीचे तत्वज्ञान, बौद्धाची भाषा आणि त्यांची राजकीय संस्कृती या सर्वाचे निरुपण त्यांनी आपल्या भूमिकेच्या मार्गाद्वारे केलेले दिसते. अगदी आपला साहित्यशास्त्रीय विचारही ते याच उजेडाची ऊर्जा घेत मांडतात, ही बाब लक्षणीय ठरते.
आपली सौंदर्यशास्त्रीय मांडणी करतानाही त्यांनी बुद्धिवादाची कास सोडलेली नाही. ‘बुद्धिवादी सौंदर्यशास्त्र’ या त्यांच्या पुस्तकातली मांडणी ही एक प्रकारची सौंदर्यशास्त्रातली अभूतपूर्व अशी मांडणी आहे. सरांनी त्यांच्यापुरता असा त्यांनी एक मूल्यव्यूह; ज्याचे स्वरूप बुद्धिवादी, विज्ञानवादी, ईहवादी, जडवादी, समतावादी आहे; स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्या मूल्यव्यूहाशी संवादी असे सौंदर्यशास्त्र उभारण्याची इच्छा बाळगूनच त्यांनी आपले सौंदर्यशास्त्रीय लेखन केलेले आहे. या मूल्यव्यूहाच्या भूमीतच मानवी जीवनाचे सौंदर्य, साहित्यकृतीचेही सौंदर्य आणि साहित्यकृतीचेही सौंदर्य जन्माला येऊ शकते, अशी त्यांची ठाम धारणा आहे. या पुढच्या सौंदर्यशास्त्राने सतत कल्लोळत राहणाऱ्या, बदलाच्या, गुंतागुंतीच्या लाटा मुक्त मनाने अंगावर घेत राहणाऱ्या जीवनाशी आणि त्यातील समतेसाठी, बुद्धिवादासाठी आणि सांस्कृतिक समतोलासाठी चाललेल्या युद्धाशी स्वत:ला जोडून घेतले पाहिजे, असे त्यांना वाटते. हे या संदर्भात अन्वर्थक ठरावे. त्यांनी लिहिलेल्या सर्वच लेखनामागे अशी तर्कप्रसादरहित जीवनदृष्टी दिसून येते. डॉ. आंबेडकरांच्या तोडीची अमर्याद ज्ञाननिष्ठा बाळगणारे सर आपल्या या भूमिकेचे कलम आंबेडकर-वादावर करतात आणि एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतात, असे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही. त्यांच्या या भूमिकेने त्यांना अशा एका शिखरावर नेऊन बसवले आहे की, या भूमिकेला अनुयायी मिळणे दुरापास्त आहे. त्यांच्या कवितेचे अनुकरण करणारे अनेक कवी दिसतील. त्यांच्या भाषाशैलीचे अनुकरण करणारेही सापडतील. त्यांच्या दिसण्या-बोलण्याचेही प्रसंगी अनुकरण होईल, पण त्यांच्या या पराकोटीच्या तीव्र टोकदारपण असलेल्या तात्त्विक भूमिकेचे अनुकरण कुणाला करता येईल, असे वाटत नाही. त्यांच्या भूमिकेत कुठेही संभ्रम नाही, संशय नाही, अंतर्विरोध नाही. समन्वयाच्या शक्यता नाहीत, तर्कप्रसाद नाहीत आणि तडजोडही नाही. सरांच्या कवितेनेही आता या वर्तमानकालीन अस्वस्थतेशी स्वत:ची बांधिलकी जाहीर केलेली आहे. मूर्तीभंजन करणारी उत्थानाच्या गुंफेतील शिल्पे खोदून काढतानाच त्यांच्या कवितेची वाट पुढे प्रशस्त होत गेली. माणसासाठीच आरती गाईन म्हणणारे हे कवीमन आता ‘आठवणींचा विषय होत आहे इथे माणसांची जात’ हे वास्तव प्राणांतिक तडफडीने सोसताना दिसते.
सुनसान झाले आहे, माणसे दिसत नाहीत;
कासाविस प्राणांसारखा वर्तमान भोवती;
शिरच्छेद केलेले सर्वत्र तडफडते प्रहर;
माणुसकीचे उगम कापीत फिरताहेत नंग्या करवती;
असे जीवनायनमध्ये त्यांनी आजच्या वर्तमानाचे वर्णन केलेले आहे. ‘माणूस’ हद्दपार करणाऱ्या या काळात त्यांना माणसांच्या वंशाचीच चिंता वाटू लागते. धडांच्या विनाशामागे धावण्याची हिंस्त्र स्पर्धा त्यांना असह्य़ होते. म्हणून ते स्वत:तल्या कवीला सतत अपरंपार वेदनेने शपथ घालत असतात की, माझ्यातल्या कवीने भोवतीच्या जखमांकडे पाठ फिरवली तर बेलाशक माझा मृत्यू जाहीर करावा. भोवतीची गुंतागुंत, जीवनातले जळते प्रश्न दिसत नसतील, तर आपली भारभूत नजर कापून टाकावी. वंचितांशी चाललेला आपला संवाद थांबला तर आपला अस्तच जाहीर व्हावा इतकी टोकदार बांधिलकी वर्तमानाशी बाळगत सर कवितालेखन करतात. त्यांची प्रतिभा समस्त वंचितांना आश्वासन देते ती या बांधिलकीमुळेच. हिंस्त्र अशा मृत्यूच्या प्रेरणेविरुद्ध सरांची कविता जीवनप्रेरणा म्हणून उभी राहते. ‘नको वांझ हळहळ व्हावे हातच सर्जन; भांडताना मरणाशी जन्म घेतसे जीवन’ असे ते म्हणतात. आपल्या शब्दांनी जीवनाचा जन्म व्हावा, हा ध्यास बाळगून ते शब्दांची कास धरतात. जीवनातल्या असुंदराशी सतत हे शब्द शस्त्र बनून युद्ध करीत राहतात. माणूसपणाच्या प्रस्थापनेसाठीच त्यांचे शब्द स्वप्नसंहिता होतात आणि हातात कवितेची वही धरतात.
एका बाजूने उग्र सुंदर आणि तेजस्वी विचारवैभव आणि दुसऱ्या बाजूने माणसांच्यासाठी करुणेने ओतप्रोत भरलेले हळवेपण सरांच्या अंत:करणात दाटीवाटीने वास करतात. त्यांच्या अनेक कविता, अनेक पत्रे, त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आणि प्रवासवर्णने यातून त्यांच्या हळव्या अंत:करणाचा वारंवार प्रत्यय येतो. त्यांच्या प्रकृतीचे हे ध्रुवात्मक आंदोलन त्यांच्या भाषाशैलीतही प्रत्ययाला येते. त्यांचे वैचारिक गद्यही विलक्षण काव्यात्मक असते. आपला विचार प्रतिमांच्या भाषेतून आविष्कृत करताना त्यांच्यातला विचारवंत त्यांच्यातल्या कवीला सतत हाकारित असतो आणि आपल्या विचारद्रव्यासाठी प्रतिमांची शैली मागत असतो त्यामुळे विचार बाजूला पडतात आणि त्यांच्या शैलीच्या मायाजालात वाचक अडकून पडतो, असे बरेच वेळा होते. आपल्यातल्या कवीला टाळून त्यांना अभिव्यक्तच होता येत नसावे, मात्र आपल्या वैचारिकतेत कोणताही अंतर्विरोध येणार नाही. कुठल्याही मोहाने तडजोड येणार नाही, याची दक्षता ते पापणी जागी ठेवून घेत असतात. माणूसपणाला पारख्या झालेल्या माणसाच्या प्रस्थापनेचे आपले व्रत ते अथक निश्चयाने पुन्हा पुन्हा पूर्ण करत राहतात.
सरांचे प्रातिभ व्यक्तिमत्त्व हे सहजपणे पकडीत येईल, असे वाटत नाही, याचे कारण म्हणजे, सरांच्या भूमिकेला असलेला युटोपिआचा स्पर्श! सरांच्या उत्थानगुंफेतील कवितांचे वर्णन करताना प्रा. रा.ग. जाधवांनी त्यांना युटोपिअन म्हटले होते. विद्रोहाच्या र्सवकष युटोपीआचे भाष्य त्या कवितेतून त्यांनी मांडले होते, पण पुढे त्यांच्या सर्वच भूमिका व विचारांची मांडणी याच युटोपिआतून झालेली आहे, असे म्हणता येते आणि युटोपिआ हा त्या त्या व्यक्तिमत्त्वाचा असा पृथक स्वतंत्र स्वायत्त असा भाग असतो. त्यामुळेच त्यांच्या भूमिकेचे अनुकरण करता येत नाही. विचार नुसता स्वीकारता येईलही, पण त्यामागच्या र्सवकष युटोपीआला स्वीकारणे शक्य नसते. प्रत्येक विचारवंत आपला आपला युटोपिआ उभा करतात. डॉ. यशवंत मनोहर हे असे युटिपिअन बुद्धीवादी विचारवंत आहेत.
यापुढच्या ‘माणूस’ घडवण्याच्या प्रत्येक धडपडीला त्यांची प्रेरणा मिळत राहणार आहे. ‘माणसा’साठी करावयाच्या प्रत्येक युद्धासाठी सरांच्या साहित्यातून व विचारातून सामग्री मिळत राहणार आहे. येणाऱ्या अंधाराच्या प्रत्येक लाटेला थोपविण्यासाठीच उजेड माणसांना त्यातून मिळत राहणार आहे, कारण अशा प्रकारच्या युटोपिआंमध्येच ती क्षमता असते.