जाणिजे जे यज्ञ कर्म : मूक वेदनांचा जाणकार Print

संध्या दंडे, रविवार, २३ सप्टेंबर २०१२
९२२५६६६८९१

तान्ही मुलं आणि मुके प्राणी यांच्याशी संवाद साधणाऱ्या व्यक्ती खरच काही ‘विशेष’च असतात. येथे सगळा मूक संवादच असतो, पण खूप सहृदय मन आणि आत्यंतिक करुणा असेल तर हा संवाद साधला जाऊ शकतो आणि असाच संवाद आपल्या पेशंटस्शी साधणारा वैद्यकमानद् म्हणजे डॉ. कैलास मारवा. अगदी थोडय़ा गुणांनी मेडिकलची अ‍ॅडमिशन हुकली, पण त्यामुळेच आज मुक्या प्रण्यांच्या वेदना जाणून औषधोपचार, शस्त्रक्रिया करणारा प्राण्यांचा धन्वंतरी सर्व श्वानांना लाभला.
मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने, बी.एस्सी.चे शिक्षण घेत असतानाच फोरेन्सिक अ‍ॅन्ड क्रिमिनॉलॉजी या सागर युनिव्हर्सिटीतील अभ्यासक्रमाची तयारी डॉक्टरांनी सुरू केली आणि एक दिवस त्यांच्या दादाजींच्या वाचण्यात नागपूरच्या पशुवैद्यक महाविद्यालयाची जाहिरात आली. मारवा कुटुंबात प्राण्यांबद्दल प्रेम होतेच. दादाजींनी सांगितले आणि डॉ. कैलास मारवांनी प्रवेश घेतला. १९६७ साली होस्टेलमध्ये राहण्याची मोफत सोय, महिना ४० रुपये स्टायपेंड आणि पुस्तकांच्या खरेदीत ५० टक्के परतावा (रिएम्बर्समेंट) अशा सोयी सरकार व्हेटरनरी विद्यार्थ्यांना देत असे. डॉ. मारवांची बॅच या सोयी मिळणारी शेवटची बॅच ठरली. कारण नंतर सरकारने या सोयी बंद केल्या. ‘गाय, म्हैस, कोंबडय़ा, दोन-तीन कुत्री, बैल यांच्या सोबतीतच लहानाचा मोठा झालो, पण व्हेटरनरी डॉक्टर होईन असे कधी वाटले नव्हते’, असे डॉ. मारवा गमतीने सांगतात. त्यांच्या घरच्या एका बैलाचे नाव ‘जॉन द बुल’ होते, हे सांगताना जॉन त्यांच्या डोळ्यापुढे उभा असल्याचे जाणवत होते. मात्र, फोरेन्सिक अ‍ॅन्ड क्रिमिनॉलॉजीच्या अभ्यासामुळे, प्राण्यांच्या आजाराचे निदान करताना, सखोल व र्सवकष विचार करण्याची सवय झाली. त्यामुळेही प्राण्यांशी त्यांना चटकन संवाद साधता येतो.
बी.व्ही.एस.सी. नंतर एम.व्ही.एस.सी. या दोन्ही परीक्षांमध्ये डॉ. मारवा युनिव्हर्सिटीत ‘टॉपर’ होते. १९८२ मध्ये त्यांनी ‘व्हेटरनरी सर्जरी’ विषयात पीएच.डी.ची पदवी मिळवली. अर्थात, हा त्यांचा सर्व प्रवास फार सोपा व सुखाचा नव्हता. शिकत असताना, मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घेत उत्तम निरीक्षण शक्ती, बुद्धिमत्ता आणि विषयाची आवड यामुळे त्यांनी अनेक कौशल्ये आत्मसात केली. डॉ. कैलास मारवांची सर्जरी कशी असते, हे ज्यांच्याकडच्या प्राण्यांचे डॉ. मारवांनी ऑपरेशन केले असेल त्यांनी अनुभवलेले आहे. कमीत कमी ‘ब्लड लॉस’, उत्तम स्युचरिंग, ऑपरेशन करताना भराभर काम करणारे त्यांचे कुशल हात, ज्युनियर डॉक्टर्सना समजावून सांगणं आणि चुकलं की रागावणं, अशी त्यांची ऑपरेटिव्ह प्रोसिजर पहाणं हा सुद्धा एक वेगळा आणि खूप काही शिकवून जाणारा अनुभव असतो. शिक्षणाला हातभार लावण्यासाठी कॉलेजच्या सुट्टय़ांमध्ये, पॉटरी फॅक्टरीत काम केले. कॉलेजमध्ये, सर्जरी डिपार्टमेंटमध्ये नाईट अटेंडंट म्हणून काम केले, पण तेथेही फावल्या वेळात अभ्यासच केला. ‘व्हेटरनरी क्षेत्रातले माझे करिअर मी अटेंडंट म्हणून सुरू केले असे मी अभिमानाने म्हणेन’ असं म्हणताना केलेल्या कष्टाची जाणीव असली तरी खेद नसतो. १९८२ मध्ये नागपूर व्हेटरनरी कॉलेजमधील सहाय्यक प्रोफेसरची नोकरी सोडून तळेगाव दाभाडे येथील एका स्टड फार्ममध्ये चीफ व्हेटरीनरीयन म्हणून सर्व सहकारी, गुरू आणि श्वशुर डॉ. निसळ विरोध करीत असताना ते रुजू झाले. खरंतर पत्नीची साथ मिळाल्यानेच हे शक्य झाले.
स्टड फार्मवरचा अनुभव सर्वस्वी नवीन व खूप शिकवणारा होता. १९८७ मध्ये नागपुरात परत येऊन त्यांनी स्वत:चे क्लिनिक उघडले. नागपुरातील उच्चभ्रू लोकांकडून जेव्हा माझ्या उच्चभ्रू नातेवाईकांना माझ्याबद्दल कळू लागले तोपर्यंत लोकांच्या लेखी मी ‘डंगर (ढोर) डॉक्टर’ होतो, अशी व्यवसायाबद्दलची बोलकी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्यावेळी उच्चभ्रू किंवा मध्यमवर्गीयच आपले पाळीव प्राणी घेऊन येत. आता अगदी झोपडपट्टीतील लोकही येतात. कारण पाळीव प्राण्यांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन ‘सुधारला’ आहे. ‘कई बार आधी नींद मे ध्यान आता है की पेशंट का ट्रीटमेंट बदल के ऐसा करना चाहिए तो जल्दी फायदा होगा, फिर मै वह बदल करता हूँ. यह ‘आकाशवाणी’ मेरे साथ अक्सर होती है.’
‘मासेसचा डॉक्टर व्हायचं, क्लासेसचा नाही’ हे त्यांचं जीवनतत्त्व. कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा होता म्हणूनच पाळता येत आहे हे ते कृतज्ञतेने सांगतात. ‘माझ्यासाठी पेशंटची रिकव्हरी महत्त्वाची असते माझा इगो नाही. प्राण्यांना तपासताना, त्यांच्या अंगावरून हात फिरवताना माझाच स्ट्रेस दूर होत असतो. प्रोफेशनली केलेली तपासणी आणि प्रेमाने केलेली तपासणी, स्पर्श प्राणी निश्चितपणे ओळखतात’ असं ते आवर्जून सांगतात. डॉक्टरांचे काका पद्मश्री डॉ. विक्रम मारवांच्या प्राणी प्रेमामुळे प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण झाले, असं श्रेय डॉ. कैलास मारवा देतात. पेशंटस्च्या पालकांशी रोखठोक बोलणारे डॉ. मारवा पेशंटस्बद्दल मात्र अतिशय प्रेमळ आणि वत्सल आहेत आणि म्हणून इतरांपेक्षा वेगळे आहेत.         
काही अपरिहार्य कारणांमुळे ‘गार्डनिंग’ व ‘दखल’ ही सदरे आज प्रकाशित होऊ शकली नाहीत.

‘मासेसचा डॉक्टर व्हायचं, क्लासेसचा नाही’ हे त्यांचं जीवनतत्त्व. कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा होता म्हणूनच पाळता येत आहे हे ते कृतज्ञतेने सांगतात. ‘माझ्यासाठी पेशंटची रिकव्हरी महत्त्वाची असते माझा इगो नाही.

नानाभाऊ एंबडवार यांना दीर्घायुष्य लाभो
स्वतंत्र विदर्भाविषयी ‘लोकसत्ता’त शनिवारच्या अंकात प्रकाशित झालेल्या वृत्तात महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नानाभाऊ एंबडवार यांच्याविषयी अनावधानाने अप्रिय उल्लेख झाला आहे. याबद्दल दिलगिर आहोत. नानाभाऊ एंबडवार यांना सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, हीच कामना -