वनातलं मनातलं : पेंच.. एक दिव्य अनुभूती!! Print

डॉ. बहार बाविस्कर, रविवार, २३ सप्टेंबर २०१२
९९७५६८०३७५

शिशिरातल्या पानझडीनंतर पावसाळा जोरदार होता त्यामुळे बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट झाली. पानझड झाल्यानंतर मात्र नवं रूप ल्यालेला पेंचचा परिसर आता मात्र आपल्यावर अगदी सहज मोहिनी घालणारा वाटत होता. त्यानंतर पगिधाड संवर्धनाच्या कामानिमित्त वरचेवर पेंचला जाणं होऊ लागलं. नागपूरहून जबलपूर रोडवर साधारणपणे ६० ते ६५ कि.मी. अंतरावर पेंच व्याघ्र प्रकल्पाचं सिल्लारी गेट लागतं. आत प्रवेश केल्याबरोबर आता पावसाच्या कृपेनं तयार झालेली हिरवाई आपलं सहर्ष स्वागत करते. घनदाट जंगलातून जाताना रस्त्याच्या दुतर्फा आपलं अभिवादन करण्यासाठी गर्द हिरवाई असते. त्या रस्त्यानं सरळ जातानाच एका ठिकाणी समोर उंच डोंगरमाथा दिसतो. आणखी समोर गेलं की, उजव्या बाजूला एक मोठं वडाचं झाड लागतं. या डेरेदार महाकाय वृक्षाकडे बघितल्यावर प्रत्येक वेळेला तिथं थांबून त्याला साष्टांग दंडवत घालावासा वाटतो. चारही बाजूंनी पसरलेल्या आणि जमिनीपर्यंत पोहोचलेल्या त्या वडाच्या पारंब्या मला ऋषींमुनींच्या दाढीसारख्या वाटतात. झाडाकडे दुरून बघितलं तर एखादा तपस्वी आपल्याकडे प्रसन्न मुद्रेनं स्मित हास्य करत असून आपल्याला आशीर्वाद देत आहे, असा भास होतो. त्या तपस्व्याच्या तेजापुढे मी नतमस्तक होतो. पारंब्यांना प्रेमानं कुरवाळून निरोप घेतो.
थोडा वेळ रस्त्यानं सरळ जात राहीलं की, सलामा गेट लागतं. ही वनविभागाची चौकी असून ती ओलांडली की, डांबरी रस्त्यानं सरळ जाऊन मग उजवीकडच्या वळणानं जंगलात खऱ्या अर्थानं प्रवेश होतो. पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये रानीडोह, सॅडलडॅम आणि मगरटाका हा सगळा परिसर म्हणजे कुठल्याही लँडस्केप फोटोग्राफरनं प्रेमात पडावं असा प्रदेश. बोदलझिराचा घनदाट प्रदेश असो की, सॅडलडॅमचा गवताळ प्रदेश, जुना बोट कँपचा बॅकवॉटरचा प्रदेश असो की, अंबाखोरीचा दाट बांबूचा पट्टा, सगळीकडे लँडस्केप फोटोग्राफीसाठी उत्तमोत्तम लोकेशन्स आहेत. बॅकवॉटरच्या प्रदेशात पायी भ्रमंती करताना एकदा १०० ते १५० ‘ओपन बिल्ड स्टॉर्क’ अर्थात, उघडय़ा चोचीचा करकोचा या पक्ष्यांनी एकाच झाडावर भाऊगर्दी केलेली आढळून आली होती. सुर्यास्ताच्या वेळी बॅकवॉटरचा परिसर अगदी शांत वाटत होता. गुलाबी रंगाच्या ढगांनी पश्चिमेच्या क्षितीजावर केलेली गर्दी जंगलाच्या पाश्र्वभूमीवर अधिकच मोहक वाटत होती. संध्याकाळचा हा रंगारंग कार्यक्रम पापणी न मिटवता डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करत मी नेहमीच मंत्रमुग्ध होत असतो. समोर दूपर्यंत कोलीतमाऱ्याचं विशाल जंगल पसरलेलं असतं. निसर्गातल्या या भव्यदिव्य कॅनव्हाससमोर माणसाचं खुजेपण अगदी ठळकपणे जाणवतं आणि ते मी प्रत्येक वेळेला अनुभवत असतो. बॅकवॉटरच्या परिसरात असलेल्या अनेक लहानमोठय़ा टेकडय़ा वातावरणाच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकत असतात. अशाच एका शेवटच्या टेकडीवर मी उभा राहतो. वारा जोरात वाहू लागला की, थोडय़ा वेळापूर्वी खूप दूर असलेले काळे ढग अगदी वेगात सरकू लागतात. काही वेळातच ते काळे ढग सारा आसमंत व्यापून टाकतात. डोंगराच्या कुशीतनं निसटलेला गार वारा मन प्रसन्न करत असतो. अंधारून यायला आणखी बराच वेळ असतो अन् त्या माझ्या जागेवरनं निघायला मन तयार नसतं. असा अनुभव प्रत्येक वेळेला त्या जागेवर गेला की येतो.
कधी कधी निघताना मनात बऱ्याच आठवणी रेंगाळू लागतात. दहा वर्षांपूर्वी कोलीतमारा भागातच झालेलं व्याघ्रदर्शन, त्यानंतर कधीतरी मगरटाका परिसरात मुक्कामाला असताना झालेलं व्याघ्रदर्शन, बोदलझिरा परिसरात पायी फिरत असताना अचानक समोर आलेला रानगवा, सॅडलडॅम परिसरात अस्वलाशी झालेली गाठभेठ किंवा रानीडोह भागात बिबटय़ाशी झालेली चुकामूक अशा पेंच व्याघ्र प्रकल्पासोबत जुडलेल्या बऱ्याच आठवणी आहेत. कितीतरी संस्कार केलेत या जंगलानं, कसं फेडणार ऋण या सगळ्या गोष्टींचं?
एखाद्या दिवशी आपण अगदी भावूक होऊन विचार करू लागलो की, अनेक विचार मनात यायला लागतात. आपल्याला बरेच गुरू आहेत. सगळ्यांचचं ऋण कसं फेडायचं? कोणाशी तरी बरंच काहीतरी बोलायचं राहून गेलंय, कधी बोलायचं? कोणाचा कधीतरी रागाच्या भरात अपमान केलेला असतो त्याची माफी मागायची राहून गेलेली होती, कधी आणि कशी मागायची? जवळच्या एखाद्या व्यक्तीला कधीतरी तिखट शब्दांनी घायाळ केलं होतं, त्या दुरावलेल्या नात्याला पुन्हा जवळ करायचं राहून गेलंय, कसं करायचं? आपल्या आवडत्या मित्र-मत्रिणीला घट्ट मिठी मारायची राहून गेलीय, कधी घेणार? अशा नाना प्रश्नांची उत्तरं आपल्याला लगेचच सापडतात.
पेंचला गेल्यावर या बॅकवॉटरच्या माझ्या नेहमीच्या जागेवर उभं राहिलं की, मन असं करायच्या राहून गेलेल्या गोष्टींनी भरून जातं. मग नागपूरला परतल्यावर या सगळ्या गोष्टी क्रमाक्रमानं पार पाडायच्या, असा निश्चय करून मी माघारी फिरतो. सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडल्या जातात. पुन्हा त्या जागेवर आलं की, दुसऱ्याच गोष्टी, नवीन ध्येयं मनपटलावर नाचायला लागतात. विचारचक्र अगतिमान झालं की, मग मी भानावर येतो. भविष्याचा वेध घेण्याचं सामथ्र्य निसर्ग आपल्याला प्रदान करत असतो. पेंचला आल्यावर मला प्रत्येक वेळेला या गोष्टींची अनुभूती येते अन् नवं स्वप्न उराशी बाळगून नेमानं कामाला लागतो.
सध्या ‘सोसायटी फॉर वाईल्डलाईफ कॉन्सव्‍‌र्हेशन, एज्युकेशन अँड रिसर्च’ या निसर्ग संस्थेच्या माध्यमातनं पेंच व्याघ्र प्रकल्पात गिधाड संवर्धनाचं काम हाती घेतलं आहे. गिधाडांच्या घरटय़ांचा अभ्यास करून नागपूरला परतताना ही गिधाडं पुढच्या वेळेला घरटय़ात परत दिसतील की नाही, याची शाश्वती वाटत नसते, परंतु बॅकवॉटरच्या परिसरातील माझ्या नेहमीच्या जागेवर गेलो की, सगळी मरगळ झटकून माझा दृष्टीकोन अधिक दृढ आणि सकारात्मक होतो. काहीही झालं तरी गिधाडं वाचवायचीच, ही प्रेरणा घेऊन मी नागपूरला पोहोचतो आणि अधिक जोमानं प्रयत्न करायला सुरुवात करतो.