मूर्तस्वरूप कृतज्ञता : ’ ज्ञानिजे जे यज्ञकर्म ’ Print

संध्या दंडे, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
९२२५६६६८९१

भिसी नावाचं चिमूर तालुक्यातलं एक छोटं गाव, तिथल्या निरक्षर आईवडिलांचा एक जिद्दी मुलगा. शिक्षणाची आवड, हुशारी आणि वडिलांचा शिक्षणाला भक्कम पाठिंबा याच्या जोरावर शेतमजुरी, लाकूडफाटा गोळा करणं, तेंदूपत्ता गोळा करणं अशी कामं करत करत दहावीपर्यंत शिकतो, पास होतो तेही ७३ टक्के गुणांनी. या जिद्दी मुलाचं नाव डॉ. दादाराव बनकर. बनकर सरांच्या वडिलांनी शेतमजुरी करून पैसा साठवून शेती घेतली आणि शेतीतला नफा, दूरदृष्टीनं मुलांच्या शिक्षणासाठी बँकेत ठेवत गेले. एका निरक्षर, शेतमजुरी करणाऱ्या व्यक्तीची शिक्षणाबद्दलची आस्था आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैशाचं नियोजन खरंच कौतुकास्पद आहे.
मॅट्रिकनंतर सर वरोऱ्याच्या आनंदनिकेतन महाविद्यालयात सायन्स शाखेत दाखल झाले. पहिल्यांदाच इंग्रजी माध्यमातून शिकत असूनही सरांनी पहिला वर्ग मिळवला. विद्यार्थी सहाय्यक समिती, वरोराद्वारा संचालित वसतिगृहात सर राहत असत. स्वयंपाक स्वत: करावा लागायचा. आता हे वसतिगृह सरकारी मदतीनं इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास होस्टेल नावानं चालवलं जातं. वसतिगृहात गरीब, होतकरू मुलांनाच प्रवेश दिला जात असे. आनंदवनामध्ये शिकत असताना सर प्रा. उपलेंचवारांच्या संपर्कात आले आणि सरांना खरा मार्गदर्शक गवसला. बी.एस्सी.ला ७० टक्के गुण मिळवून बनकर सर नागपूर विद्यापीठाच्या मेरिट लिस्टमध्ये झळकले. आता शिक्षकाची नोकरी करायची की, पुढं शिक्षण घ्यायचं, हा प्रश्न सरांपुढं होता. पुढील शिक्षणासाठी नागपुरात यावं लागणार होतं. पुन्हा राहण्याचा प्रश्न. या टप्प्यावर सरांना योग्य मार्गदर्शन आणि मदत केली ती उमरेडच्या जीवनविकास शाळेतील बाकडे गुरुजींनी. बाकडे गुरुजींच्या सल्ल्यानं सरांनी एम.एस्सी. करण्याचा निर्णय घेतला. बाकडे गुरुजींनीच सरांना धंतोलीतील रामकृष्ण मठाच्या वसतिगृहात राहण्यास सांगितलं आणि दोन्हीकडील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून रामकृष्ण मठाच्या पवित्र वातावरणात सरांचं पुढील शिक्षण सुरू झालं. नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्राच्या पदव्युत्तर विभागातून सरांनी आपली गुणवत्ता सिद्ध करीत एम.एस्सी.चं शिक्षण पूर्ण केलं. १९७९ मध्ये सर विद्यापीठात दुसऱ्या क्रमांकाचे मेरिट होते.
सी.एस.आय.आर.ची संशोधन शिष्यवृत्ती मिळाल्यावर धरमपेठ विज्ञान महाविद्यालयातील नोकरी सोडून सर पीएच.डी. साठी संशोधन करू लागले. या टप्प्यावर सरांचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड डॉ. उत्तरवार यांचा पाठिंबा मिळाला. १९८३ मध्ये डॉ. दारा यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. मिळाली. व्हीएमव्ही महाविद्यालयात विभाग प्रमुख म्हणून नोकरीही मिळाली. १९९८ मध्ये प्रा. उपलेंचवार सरांच्या माजी विद्यार्थ्यांनी वरोऱ्यात आपल्या गुरूंचा षष्ठय़ब्दी सोहळा भव्य प्रमाणात साजरा केला. त्यावेळी त्या व्यासपीठावरून बनकर सरांनी गुरूंना जाहीर वचन दिलं, ‘वरोऱ्यात गरीब, होतकरू मुलांसाठी जशी सोय आहे तशी नागपुरात गरीब विद्यार्थ्यांसाठी अन्न, वस्त्र, निवारा, वह्य़ा, पुस्तकोंची सोय मी करेन.’ १९९९ साली रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हपलमेंट असो. ऑफ इंडिया हा ट्रस्ट रजिस्टर करून ५ सप्टेंबर १९९९ शिक्षक दिनाचा मुहूर्त साधून बनकर सरांनी कृतज्ञता वसतिगृह सुरू केलं. केवळ तीन विद्यार्थी त्यावेळी होते. सरकारी मदत न घेता केवळ जनसहाय्यानं आज कृतज्ञता वसतिगृह व इतर व्याप वाढत आहे. वसतिगृहात विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका, आर्थिक परिस्थिती यांची कागदपत्रं बघून मुलाखतीद्वारा प्रवेश दिला जातो. अट एकच, नापास झाल्यास वसतिगृह सोडावं लागेल. इथं सर्व काम, किराणा, भाजी आणणं, वसतिगृहाची दैनंदिन सफाई विद्यार्थीच करतात.
बुटीबोरीच्या एम.आय.डी.सी.मध्ये २०११ पासून स्वत:च्या जागेत कृतज्ञता व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र सुरू केलं आहे. इथं गरीब, पण सर्वसाधारण बुद्धीच्या मुलांना दहावी-बारावीनंतर व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. ७० दिवसांच्या प्रशिक्षण काळात त्यांचे प्रशिक्षण, राहणे, जेवण सर्व मोफत असते. व्हॅल्यू एज्युकेशन, संगणक प्रशिक्षण, स्पोकन इंग्लिश इत्यादी अभ्यासक्रम घेतले जातात. आतापर्यंत १०० वर विद्यार्थी शिकून गेले. बिहार, मध्यप्रदेश, नक्षलवादी भागातूनही मुलं येतात. नागपूर, कामठी, बुटीबोरी इथं कृतज्ञता वसतिगृहं चालवली जातात. यातील ३० विद्यार्थी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत. लवकरच ‘कृतज्ञता अस्थिविकलांग पुनर्वसन केंद्र’ सुरू होत आहे. सुमारे ११००० चौरस फुटाचं दुमजली बांधकाम होत असून पहिला मजला तयार झाला आहे. संस्थेतील कोणीही ट्रस्टी मानधन घेत नाही व येणारा प्रत्येक पैसा संस्थेच्या कामातच खर्च होतो म्हणून आम्ही इतकं काम करू शकतो, असं सर अभिमानानं सांगतात. सरांना शिरीष प्रधान, आर्किटेक्ट रवींद्र सावजी, प्रभू नवघरे, उषा कुंडले (वय ७६, बुटीबोरी वसतिगृहाच्या आई, आजी) यांचं मोलाचं सहकार्य लाभतं. ‘उजव्या हातानं देवाला फूल वहा, डाव्या हातानं आम्हाला रद्दी द्या’ असं सरांचं आवाहन असतं. आज नागपुरातील ४००-५०० घरातून सर नियमितपणे वर्तमानपत्रांची रद्दी नेतात. ती विकून वसतिगृहातील मुलांचं धान्य आणलं जातं. काही दाते वर्षभरासाठी मुलांना फळं, दूध पुरवतात, तर कुणी नवी कोरी मारुती व्हॅन ‘नाव टाकायचं नाही’ हे बजावून सरांच्या दारात उभी करतो. एखादा दाता ‘छोटेसे योगदान’ असे चेकच्या पाकिटावर लिहून एक लाखाचा चेक सरांना देतो. आज सरांना मदत करणारे सर्व दाते मानवता व कृतज्ञतेच्या नात्यानं बांधले गेले आहेत. प्रत्येकानं केलेल्या मदतीबद्दल इथं कृतज्ञता आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात, यासाठी सर आता योजना आखत आहेत. वरोऱ्याचे वसतिगृह आनंदनिकेतन व रामकृष्ण मठ हे माझे प्रेरणास्रोत आहेत, असं डॉ. बनकर कृतज्ञतेनं सांगतात.        

बुटीबोरीच्या एम.आय.डी.सी.मध्ये २०११ पासून स्वत:च्या जागेत कृतज्ञता व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र सुरू केलं आहे. इथं गरीब, पण सर्वसाधारण बुद्धीच्या मुलांना दहावी-बारावीनंतर व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. ७० दिवसांच्या प्रशिक्षण काळात त्यांचे प्रशिक्षण, राहणे, जेवण सर्व मोफत असते. व्हॅल्यू एज्युकेशन, संगणक प्रशिक्षण, स्पोकन इंग्लिश इत्यादी अभ्यासक्रम घेतले जातात. आतापर्यंत १०० वर विद्यार्थी शिकून गेले.