दखल : अभ्यासक, वाचकांसाठी महामंदीचा आलेख महत्वाचा Print

प्रमोद लेंडे-खैरगावकर, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
९७६७६३६२९१
अतुल कहाते हे नाव माहिती तंत्रज्ञान व जागतिक अर्थशास्त्र या विषयाशी जुळलं आहे. विविध वृत्तपत्रं मासिकं, दूरचित्रवाणी, आकाशवाणी व इतर अनेक माध्यमांमधून त्यांनी अर्थशास्त्रीय विश्लेषण केलं आहे. ‘महामंदीतून सुटका’ हे कहातेंचं पुस्तक जगाला आर्थिक महामंदीतून मुक्त करण्याचा विश्वास व्यक्त करणारं आहे. एकूणच यातील ६० प्रकरणांमध्ये अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्यानं महामंदीची भीषणता, अर्थशास्त्रज्ञांचं युद्ध, द ग्रेट डिप्रेशन आणि केन्सवाद, महामंदीमागचं अर्थकारण, फिशर आणि मिन्स्की यांचं महत्त्व, अमेरिकेवरचं कर्ज, महामंदीची सुरुवात, लिक्विडिटी ट्रॅप, युरोपवरच्या संकटांची पाश्र्वभूमी, युरोपमधली भीषण परिस्थिती इत्यादी प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. समारोपादाखल अर्थकारणाचा शेवट हा मथळाही लेखक कहातेंनी दिला आहे. बेचाळीस संदर्भसूची, संकेतस्थळं व ब्लॉगयांचीही नोंद ते घेताना दिसून येतात.
प्रत्यक्षात महामंदीतून सुटका करणारा असा अल्लाउद्दीनचा चिराग नाही, मात्र प्रयोगात्मक पद्धतीनं केलेल्या मांडणीतून मंदीतून सुटका होऊ शकते, हा विश्वास महत्त्वाचा आहे. मंदीमध्ये देशावर निर्माण झालेलं आर्थिक संकट ही नक्कीच चिंतनाची व चिंतेचीही बाब आहे. भारतीय व्यापार जगतामध्ये ओढवलेलं आर्थिक संकट व अर्थशास्त्राचा धांडोळा लेखकानं घेतला आहे. अनंत गरजा आणि मर्यादित साधनं यांच्यामध्ये नेहमीच युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे. १९२९-३० ची अमेरिकेतील महामंदी ग्रेट डिप्रेशन होती, असं कहाते म्हणतात. महामंदीची भीषणता या प्रकरणात युरोपियन राष्ट्रांवरील बेकारी दर्शविणारे आलेख, सारणी, तक्ता, आकडेवारी, टक्केवारी व वर्षे यांची नोंदही ते घेतात. जॉन केन्स या अर्थतज्ज्ञाचं विश्लेषण अमेरिकेतील २००७ ते मार्च २०१२ पर्यंतच्या बेकारीच्या समस्येचे अभ्यासक म्हणून अनेक उदाहरणांद्वारे अतुल कहातेंनी पटवून दिलं आहे. अमेरिकेसोबतच इतरही देश मदामंदीच्या खाईत लोटले गेले, यांचंही विश्लेषण केलं आहे.
अर्थशास्त्रज्ञांचं युद्ध या प्रकरणात जागतिक महामंदीच्या काळातील केन्सनं केलेल्या आर्थिक स्थितीगतीच्या महत्त्वपूर्ण नोंदी लेखकानं घेतल्या आहेत. मंदीतून अर्थव्यवस्था आपोआप बाहेर पडत नाही. मंदीच्या वेळी कुणीही व्यक्ती गुंतवणूक करीत नाही, अशा वेळी सरकारनं कर्ज घेऊन आर्थिक मंदीचा सामना केला पाहिजे, असं केन्स म्हणतो, हे मत उदाहरणासह लेखकानं पटवून दिलं आहे. निव्वळ अर्थशास्त्रीय विश्लेषण असलं तरी तशा शास्त्रीय पद्धती त्यात नाहीत तर अत्यंत सोप्या सुलभ भाषापद्धतीचा अवलंब करून कहातेंनी मंदीविषयीचं विश्लेषण केलं आहे.
युरोप-अमेरिकेसोबतच संपूर्ण जग आर्थिक महामंदीच्या सावटाखाली वावरत आहे. मागील दशकाचा विचार केला असता व समकालीन अर्थशात्रीय पद्धतीचा आढावा घेतला असता ही मंदी कार्पोरेट क्षेत्रात झपाटय़ानं स्थिरावली आहे. त्यातूनच बेरोजगारांच्या फौजा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात मंदी नाही, हे सरकार नेहमीच ऊर बडवून सांगते. त्यांच्या या ऊरबडव्या धोरणातील फोलपणा कसा चव्हाटय़ावर येत गेला, हे संबंध अर्थजगताला माहीत आहे. महामंदीनं अनेक देशांना हादरे दिल्यानंतर अनेक अर्थतज्ज्ञ चिंतीत झाले आहेत. यावर मंथन करून आर्थिक महामंदीची लाट नष्ट करता येते. त्याविषयीचं विश्लेषण विविधांगानं प्रस्तुत पुस्तकात मांडले आहे. महामंदीनं भयाण झालेल्या अभ्यासक, वाचकांसाठी ‘महामंदीतून सुटका’ हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे ठरणारं आहे. महामंदीचा सर्वतोपरी अभ्यास विविध राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं चिंतन करूनच प्रकटला आहे आणि ती मंदी संपविण्याचा दावाही या पुस्तकाच्या निमित्तानं अतुल कहाते यांनी केला आहे, हे विशेष. यामागं त्यांची प्रगाढ जिज्ञासाच दिसून येते व तसा ते आशावादही पेरतात. त्यामागे कृतीशील अर्थशास्त्रीय धोरण किती महत्त्वाचं आहे, हे लक्षात येतं. ‘महामंदीतून सुटका’ हे पुस्तक औरंगाबादच्या साकेत प्रकाशननं प्रकाशित केलं असून ६५२ पृष्ठांचं हे पुस्तक ६५० रुपये किमतीला आहे.