गार्डनिंग : घरातील बाग Print

सीमा रमेश मामीडवार, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
९८९०२८५२८६

घर सजविण्यासाठी घरात बाग फुलविली तर नवनिर्मितीचा आगळावेगळा आनंद आपल्याला मिळविता येतो. शहरात जागेअभावी फ्लॅटमध्ये राहत असताना निसर्ग आपल्या घरातच फुलवावा, ही अनेकांची मनोमन इच्छा असते. घराबाहेर झाडे लावायला जागा नाही म्हणून घरात बाग फुलवावी. रंगीबेरंगी पानांचे क्रोटन्स, सुंदर सीझनल्सची कुंडी पाहून मन आनंदित झाल्याशिवाय राहणार नाही. घरात झाडे ठेवण्याची पद्धत ही तशी जुनीच आहे. अमेरिका, युरोप, जापानमध्ये घरातील बाग करण्याची पद्धत खूपच लोकप्रिय झालेली आहे. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात अनेकांच्या मनावर नेहमी ताणतणाव दिसून येतो. अशावेळी रंगीबेरंगी पानांनी व मनमोहक फुलांनी मनाला प्रसन्नता आल्याशिवाय राहत नाही. आपल्या बागेतील काही झाडांची पाने जी आकर्षक दिसत असतील ती घरात नक्कीच उठून दिसतात.
घरात झाडे ठेवतांना त्याची नीट मांडणी करावी म्हणजे उंच झाडाशेजारी बुटके झाड ठेवावे. काही मडकी पेंट करून ठेवावी. बगळे, काही प्राणी, काही मॉडेल्स घरात असतील तर तीही त्या झाडांजवळ ठेवावी. फर्न व्हरायटी, पाम, मारांटा, मनीप्लांट, ट्रॅडेन्स्क्शीया, अ‍ॅथ्युरियम, बिगोनिया, जरेबरा, रीवनग्रास, अशा झाडांची निवड घरातील बाग करताना करावी. जी झाड सावलीत छान दिसतात ती घरातल्या बागेत दोन तीन महिन्यांकरिता आपण ठेऊ शकतो. घरातील सुंदर पानाफुलांची कुंडी ठेवतांना ती घरातल्या रंगाशी, घरातल्या ठेवणीशी शोभून दिसेल अशी ठेवावी. ख्रिसमस ट्री, लीली, बारीक बांबू, कोलियसची झाडे आकर्षकरित्या मांडली की छान दिसतील. लिहिण्याच्या टेबलावर बुटकी बोनसाय आणि रंगीत बारीक पानांची झाडे चांगली दिसतील. बेंझामीना फायकसचे बोनसाय, अ‍ॅडेनियमचे बोनसाय, रीवनग्रास, अ‍ॅसपरगस, कोलियससारखी रंगीबेरंगी पानांची छोटीसी कुंडी ठेवावी, जेवणाऱ्या, टेबलवर मेडन, हेअर फर्न सेन्सेवेरिया, ट्रेडेन्सेकशिया, मनीप्लांट असे एखादे झाड निवडावे. स्वयंपाकघरात झेड प्लांट, कॅकटाय, सॅक्युलंटस जातीतील झाडे ठेवावीत. स्नानगृहात मनीप्लांट, ऑर्*डय़, ट्रॅडेन्केशिया अशी झाड लावावीत. एखादी हँगिंग बास्केटही पिटोनिया, क्लोरोफायटमची चांगली दिसेल. झोपण्याच्या खोलीत लहान पानांची झाडे ठेवावीत. तुळस ही रात्रीही प्राणवायूचा पुरवठा करते म्हणून तुळशीचे बोनसाय बेडरूममध्ये रात्री ठेवावे. शोभिवंत पानांच्या कोलियसच्या कुंडय़ा देवघराची शोभा वाढवील.
व्हरांडय़ात फ्लोरीबंडा, लॅटीना, एक्झोरा, शेवंती, जरबेराला चांगली फूलं येतील. घरातील भिंतीजवळ कोपऱ्यात, खिडकीत आय. व्ही. क्रिपर चांगले दिसते. जेवढय़ा आवडीने आपण घरात झाडांची मांडणी करतो तेवढय़ाच आवडीने त्या झाडांकडे लक्ष द्यायला पाहिजे. वाळलेली पाने काढून टाकत जावीत. निसर्गदृश्य तयार करूनही घर सुशोभित करता येईल. मिनीएचर लॅडस्केपिंगनी निसर्ग सान्निध्याचा घरच्या घरी आस्वाद आपण घेऊ शकतो. एखादी पसरट कुंडी घ्यावी. मागच्या बाजूला ज्युनियर्सची लहान झाडे व समोरच्या बाजूला अरेलिया, लॅटीनासारख्या पानांची आकर्षक झाडे लावावीत. रंगसंगतीला व प्रमाणबद्धतेला महत्त्व द्यावे. सुंदर निसर्गदृश्य तयार होईल. शेतकरी, त्याचे घर, पाळीव प्राणी, बैलगाडी, एखादे बोनसाय झाडे ठेऊन निसर्गदृश्यच तयार करावे. काही महिने आत व काही दिवस व्हरांडय़ात ठेवावे. पानाफुलांचे निरनिराळे रंग आणि फुलांच्या सुगंधांनी घरातले वातावरण प्रसन्न राहू शकते. ड्रेसिनाच्या झाडाला तर सर्वजण घरातील जिवंत शिल्प असे म्हणतात. घरातील झाडांना दारेखिडक्या उघडय़ा ठेवल्याने हवा मिळेल, अशीही घरातील बाग सर्वाना समाधान, शांती देणारी नक्कीच होईल.