वारसा : प्राचीन डोलारा पूल Print

संजीव देशपांडे, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
९०१११६५०७९

प्राचीन वास्तू-अवशेष म्हटलं म्हणजे डोळ्यांपुढं येतात ते किल्ले, मंदिरं, लेण्या किंवा मूर्ती. हे अवशेष मूळ स्वरूपात किंवा काळाच्या ओघात जे स्वरूप प्राप्त झालं असेल त्या स्वरूपात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत त्या काळाची साक्ष पटवून देत राहतात. या अवशेषांनी विदर्भभूमी समृद्ध तर आहेच, पण या अवशेषांशिवाय महाराष्ट्रात इतर कुठंही न आढळणारे असे खास अवशेषही विदर्भातच आहेत व त्यातले काही शिल्पनगरी-मंदिर नगरी भद्रावतीत आहेत. हे विदर्भातलं अतिप्राचीन नगर. या नगरीत भारतीय शिल्पकलेच्या सुवर्णकाळाचं प्रतिबिंब पहायला मिळतं. या नगरीत मंदिरं व लेण्यांसोबतच आहे एक अतिप्राचीन पूल. हा पूल डोलारा पूल या नावानं प्रसिद्ध आहे.
चंद्रपूर-नागपूर मार्गावरील भद्रावतीच्या नव्या बसस्थानकापासून चंद्रपूरकडे जाणाऱ्या मार्गावर अगदी अध्र्या किलोमीटर अंतरावर हा तलाव. तो रस्त्यावरून दिसत नाही. मार्गाच्या उजव्या बाजूला हा तलाव आहे. तलावाच्या आजूबाजूला वस्ती आहे. तलावाला वळसा घालून छोटय़ा-छोटय़ा कच्च्या रस्त्यांनी पुलापर्यंत जाता येतं. तलावाचं नावही ‘डोलारा’ तलाव. डोलारा हा शब्द ‘डोलणारा’ याचा अपभ्रंश वाटतो. पाण्यानं तलाव पूर्ण भरला म्हणजे हा पूल अक्षरश: पाण्यावर दगड टाकून केला असावा, असा भासत असेल म्हणजेच पाण्यावर दगड तरंगत आहेत, ‘डोलत आहेत’ असं वाटत असेल म्हणून हा पूल म्हणजे ‘डोलारा’ पूल व तलाव म्हणजे डोलारा तलाव.
तलावाच्या काठापासून तलावात असणारं एक बेट यांना पूल जोडतो. तलावाची एकंदर रचना व आकार पहाता तलाव हा तयार केलेला, बांधलेला वाटतो. तलावाला घाटही असावेत, कारण काही ठिकाणी घाटाचे, घाटाच्या दगडी पायऱ्यांचे अवशेषही दिसतात. या तलावात असणाऱ्या बेटाची निर्मितीही कदाचित भर घालून केलेली असावी. या बेटावर मंदिर होतं, याचे पुरावे बेटावरच दिसतात. बेटावर झाडा-झुडुपात मंदिराचे अनेक अवशेष लपलेले आहेत.
पाण्याची जागा असल्यामुळे बेटावर सर्वत्र झुडुपांचेच राज्य आहे. झुडुपांखाली मंदिराचे असतात तसे चौथरे लपलेले आहेत. स्तंभावरचे तीर-तुळ्या, तसेच स्तंभांचे अवशेष दिसतात. शिखराच्या अगदीवर असते तशी गोल दगडी चकती ज्याला ‘आमलक’ असे म्हणतात तेही पडलेले दिसते. बेटावर एका शिवपिंडीसह एक दोन अन्य प्रतिमाही पडून आहेत. ज्या ओळखता येऊच नयेत, अशा स्थितीत आहेत. बेटाचा आवाका अगदी छोटा आहे, पण बेट मोठं टुमदार आहे.
हे बेट आणि तलावाचा काठ यांना जोडणारा पूल म्हणजे विदर्भातली एक आश्चर्यकारक वास्तू. दुर्दैवानं या पुलाकडे मात्र कोणाचंच लक्ष नाही. हा पूल साधा पहायला येणं तर दूरच या पुलाचं अस्तित्वही हे गाव ओळखणाऱ्यांना माहीत नाही. प्रथमदर्शनीच पूल स्वत:च्या प्राचीनतेचा पुरावा देतो. पूल अत्यंत मजबूत आहे. नाव जरी ‘डोलारा’ पूल असलं तरी पुलाचा एकही दगड हलत सुद्धा नाही. पूल साहजिकच स्तंभांवर उभा आहे. स्तंभांची रचना दुहेरी. दोन स्तंभांची एक, अशा पंधरा रांगा जरी आज दिसत असल्या तरी आणखी कि मान दोन तीन रांगा तरी मातीत दबल्या आहेत, तरीसुद्धा पुलाचं काहीच बिघडत नाही. असे पुलाला एकंदर चौतीस ते छत्तीस स्तंभ असावेत. ज्यातले तीस तर दिसतातच. पुलाची रुंदी अंदाजे सव्वादोन मीटर व लांबी चाळीसेक मीटर. एखादा प्राचीन पूल अस्तित्वात असू शकतो, पण एवढा प्रचंड पूल काहीही क्षती न झालेला इतरत्र कुठंही नाही.
पुलाचे दर दोन स्तंभ वर आडव्या तुळ्यातीर टाकून सांधलेले आहेत. त्यावर आडवे दगड अशी पुलाची रचना. वरून चालताना तोल जात आहे किंवा हे दगड डगमगत आहे यापैकी काहीच संभवत नाही. अगदी काल बांधल्यासारखा व तेवढाच मजबूत पूल आहे. वर आडव्या टाकलेल्या दगडांची संख्याही जवळपास सत्तर असेल. पुलाचे स्तंभ हे साधारण मंदिराच्या स्तंभासारखेच आहेच. तलावात पाणी भरून असल्यानं हे स्तंभ अर्धे पाण्यातच बुडालेले असतात. एवढय़ा प्रचंड व मजबूत पुलाचा पाया कसा असेल, कसा असावा, हा विचार करून असा पूल प्रत्यक्ष साकार करणारे ते वास्तुशास्त्रज्ञ धन्य. वरच्या आडव्या दगडांची रचनाही वैशिष्टय़पूर्ण आहे. दगडाच्या एका बाजूच्या रुंदीपेक्षा दुसऱ्या बाजूची रुंदी दोन चार इंचांनी कमी म्हणजे एका बाजूनं निमुळते दगड. या दगडांच्या निमुळत्या बाजू परस्परांविरुद्ध ठेवलेल्या म्हणजे हे दगड कोणत्याही परिस्थितीत ढळणार नाहीच, पण नाही म्हणायला बेटाजवळचा फक्त एक आणि एकच दगड तेवढा परागंदा झाला आहे.
बेटावरचं मंदिर कशाचं असावं, हे कळायला मार्ग नाही. भद्रावती नगरीवर अनेक राजवंशांनी राज्य केलं. त्यापैकीच एखाद्या राजवंशानं हे मंदिर व हा पूल निर्माण केला असेल. तलाव, तलावाकाठी वनराई, मध्ये बेट, बेटावर मंदिर आणि मंदिरापर्यंत जाणार पूल, असं स्वप्न पहाणारा राजा व ते साकार करणारे हे खरे कलावंत. कदाचित, या साऱ्या मागं एखादी प्रेरणा असेल, एखादं कारण असेल, एखादा दगड ही कहाणी आनंदानं भाळी गोंदून मंदिराच्या भिंतीवर सजलाही असेल, पण हे ‘असेल-नसेल’ सर्वच आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे.
पुलाचं स्थापत्य पहाता पूल साधारणत: अकराव्या शतकातला असावा, असं वाटतं. आलेल्या पावसानं, नद्यांच्या पुरानं वाहून जाणाऱ्या पुलांच्या काळातही हा पूल उभा आहे, हे विशेष.
हा पूल स्वत:च्या मजबुतीनं काळावर आपली मोहोर उमटवतील, यात शंका नाही. तशी ती त्यानं उमटवलीही आहेच, तरीही त्या काळाची साक्ष पटवणाऱ्या या पुलाकडे वर्तमानाचं लक्ष नाही व त्यात आपलं काही नुकसान आहे, असंही वर्तमानाला वाटत नाही.